Friday, July 26, 2024

 

सुख येते म्हणते दारी
घर सजते प्राणपणाने
पण सरता संपत नाही
हा असोस - वाट पहाणे
घर पानगळीचा मोसम
घर चैत्रपालवी मंतर
घर वळीव कोसळणारा
घर आषाढातील सर
दाराशी पायरवांचे
कुजबुजते काही भास
घर गंधित गंधित ताजे
घे उत्कंठेने श्वास
कुठल्याही ग्वाही विना
सुख हलके मागे फिरते
अन जन्मभराचे होते
ह्या फारकतीशी नाते
सुख मोहमयीशी भूल
येऊन पुन्हा फिरल्यावर
घर लख्ख लख्ख दरवेळी
मन शिळेपाक उंबर्यावर

 

मी टेकडीच्या उंच टोकावर निश्चल बसून आभाळाच्या कवेत गेले, तेव्हा तुझ्यापर्यंत पोहोचले
आणि हजारो मैल पायपीट करतही अखेरीस तूच सापडलास...
उपवास, कठीण व्रताचे यज्ञयाग,
एकवीस प्रदक्षिणा, सुग्रास महानैवेद्य
जो नंतर मुलांना खाऊ घातला
तेव्हाही तूच होतास
आणि काहीच नव्हते हातात तेव्हा चार अक्षता फुलं, पानं समजून वाहिली तरी तू भेटलास..
मी माझ्या कामात समरसून जाताना तुझी आठवण राहिली नाही.... तेव्हा तेच तू होतास बहुधा...
आणि रात्रंदिवस तुझी आठवण काढत तुझ्या नावाचा जप केला
तेव्हा साऱ्याचा विसर पडला...
तेव्हाही तूच भेटलास...
मी आत्मसमर्पित होत अभंग गायिले
आणि आत्मभान ठेवून तर्कनिष्ठेने प्राणपणाने झुंजले तरी तुझ्यापर्यंतच आले...
तुझ्या हातातली आर्त स्वराची बासरी आणि त्याच हातातलं सुदर्शन चक्र - सगळं तुझंच
तुझ्यामुळे जोगीण झालेली मीरा - हेही तूच
आणि जोगी व्हायचा राहिलेला अर्जुन... तेही तूच
तुझ्याबद्दल वाटलेलं उत्कट प्रेम ...
आणि उत्कटतेने जगलेल्या प्रत्येक क्षणाचा अर्क...
म्हणजे कालिंदीने तुझा प्राशुन घेतलेला काळा रंग
ह्या अर्कात तू आहेस...
अखेरीस सगळे रस्ते पुन्हा पुन्हा तुझ्यापर्यंतच घेऊन येतात...

 

खणपेटीतिल मनमोत्यांची माळ हरवली
जगते आहे पण जगण्यातिल शान हरवली
तुझ्या बोलण्यानंतर पडले ऊन लख्खसे
पण माझी त्या मंद धुक्यातिल वाट हरवली
तंत्र चकचकित, काना मात्रा शब्द तासले
पण चिमटीतून पकडायाची तार हरवली
(कवितेमधली होती नव्हती जाण हरवली)

 

Surya on Sunday
Shankar on Monday
Ganesha on Tuesday
Krishna on Wednesday
Datta on Thursday
Lakshmi on Friday
Hanumān on Saturday
Bow down your head
Fold your hands and say
This is how my Grandma
teaches me to pray
All goes to HIM
All belongs to HIM
Let it any day
Let it any way

 

दुःख हे गर्भार आहे रिक्त नाही
वाळल्या फांदीस ये उमलून काही
तू हिमातिल पावसाळा अन उन्हाळा
मी नदी होऊन गेले बारमाही
वाहिले अश्रू अता मन शांत हलके
आणि कविता होत गेली भारवाही
भोवरे पाण्यात होते फार तरिही
वेदना वाहून गेली भर प्रवाही
दशदिशांना दान मागत सौख्य फिरले
तख्त होते माणकांचे दुःख शाही

 

कमाल तापमान,
किमान थंडी,
अमूक इंच पाऊस,
नवे रस्ते, पूल.. पूर ..
भविष्य,
सांस्कृतिक कार्यक्रम,
सेलिब्रेटीज,
झालंच तर अपघात,
घातपात... !!
सकाळचा पेपर -
अन् जिथे तिथे तुझं शहर!
सकाळ म्हणजे आठवणींचा
पहिला वहिला कोरा प्रहर!

 

कुठलाही द्वेष, क्रोध किंवा प्रतिशोध नाही..
कारुण्याने ओथंबलेले
आणि जगासाठी अपरंपार प्रेम असलेले तुझे डोळे..
सर्वांना आपलं म्हणणारं तुझं मंद स्मित..
दगडातून हे काय साकार झालंय देवा?
तुझ्या चिरंतन असण्याचं रहस्य
की जगाची "माया" आठवून
तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हास्य?
हा युगानुगुगांच्या हिंदुत्वाचा हुंकार
की जीन्समधल्या
सर्वेपि सुखीन: सन्तु चा साक्षात्कार?

 

उभा ठाकला ग्रीष्म दारी पुन्हा अन
पुन्हा लख्ख हळदी उन्हाने झळाळे
तुझे स्पर्श संदर्भ आले, बहरले
पुन्हा दुःख माझे अमलताश झाले
.
कुण्या भावनांच्या अहंमन्य ज्वाळा
सुखाने फुले झाड आरक्त का हे?
तरी सांज होता निराशेत कुठल्या
सडे आसवांचे तळाशी पहुडले?
.
अहंता न काही, मनीषा न कुठली
न सन्मूूख होतो बहर भावनांचा
जसे जर्द रंगातले घोस माथी
अमलताश सजतो अधोमुख फुलांचा
.

 

मी तमाच्या आर्ततेचे गीत गावे
तू उशाला चांदणी आकाश व्हावे
मी वहावे शब्द अश्रूंचे तरूशी
मौनही तेव्हा तुझे मग मोहरावे
व्यक्त झाले गीत ते वाहून गेले
घातला जो बांध त्याचे प्रेम व्हावे
हेलकावे वादळी साहून अंती
दीपस्तंभाने तुझ्याही सावरावे
व्यक्त केल्या त्या मनाच्या क्षुद्र वांछा
ठेवले तू मर्म मागे प्रेमभावे
बेट ना पाचूप्रमाणे ना किनारे
फक्त काही शिंपले मोती उरावे
श्वास श्वासातून जाताना अखेरी
नाव ओठातून यावे, शांतवावे!

 

शांततेची एक चिमूट
नसावी आपल्या भाळासाठी
म्हणून ही वणवण
हा शाप की पूर्वसुकृत
की वजा होतंय एकेक कर्म
आणि मिळाली तर पुन्हा
तीच दुःख त्याच यातना..
पेक्षा करावं स्वीकार, नको आनंदाने
नाहीतर पुन्हा भर आणि पुन्हा भोग -उपभोग
पेक्षा दे अजून
आणि अजून दे निर्वीकारत्व
सुख दुःख समेतकृत्वा
वाटेल न वाटेल हीच शांतता
दुःख उगाळता यावं सहाणेवर
आणि टिळा लावून द्यावा का
ज्याने दिलं त्याच्या भाळावर.
उदबत्तीच्या वलयाबरोबर
मग विरून जावी उरली सुरली
शांततेसाठीची इच्छा
कविता होऊन जावी प्रार्थना!
- विभा

 

कसा येतो कळवळा ज्याला आदि अंत नाही
आधी भाव अधांतरी त्यात तरंगत्या डोही
अशी शोधायची ओल तळ विचारांचे खोल
हाती लागल्या मातीचे तरी करायचे मोल
कधी वाटले असावे बंध कुठल्या जन्माचे
शून्यातून शून्य जाता हाती नसणे शून्याचे
कळवळ्याच्या उर्मिचे आता होत नाही काही
चंद्र, भाजी, गंध, स्पर्श तिला पैलतीर नाही
तिचे शब्द अनौरस तिचे सूर बेवारस
वागीश्वरी मागे जाय, मागे घेतसे आशिष
तिच्या निनावी फुलांना जागा नसावी चरणी
तिचे निर्माल्यही नाही हीच परिणिती तिची
अशा कल्लोळल्या वेळी साथ कविता नसावी
आता मिटवावे मन तीच परिसिमा त्याची
विभा