Sunday, December 10, 2017

किती आभाळ भरलेले, किती दाटून आलेले
कसे गेले कुण्या गावी, न दे कुठलेच सांगावे
तुझी वचने तुझी भाषा तुझ्या शब्दात नसलेले
मला कळले! तुला कळले? न लिहिलेले न वदलेले..
वाळवंटातल्या दिलासादायक मृगजळासारखं स्वप्नील,
डोंगरमाथ्यावरच्या झाडासारखं निश्चल,
मिडास राजाच्या हातांसारखं अपूर्व,
उंच मनोऱ्यातल्या खिडकीमधल्या रपुंझेलसारखं अद्वितीय,
उत्तरेच्या शाश्वत तार्यासारखं अढळ,
तमा न बाळगता चक्रव्युहात शिरणाऱ्या अभिमन्यूसारखं निडर
शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखं महान,
यमुनेचा घाट सोडून
द्वारकेच्या समुद्रकिनाऱ्यावर
ऐकू येणाऱ्या मुरलीइतकं आर्त
आणि संध्याकाळी सुचलेल्या
विरहव्याकूळ कवितेइतकं निस्सीम...
एकटेपण चांगलं असतं...
**************
पुन्हा भेटलो तर –
**************

पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
तेच ते नॉब्स फिरवून फिरवून रुळलेले
अंधारातले आकडे कानाकडून शोधलेले
किती खरखर किती घरघर, घसा कोरड, जीव आतुर
बुद्धी, डोळे, कान, मन एकमेकांना फितूर
पुन्हा एकदा झुमरीतलैय्याहून तिच फर्माईश होईल
पुन्हा एकदा लतादीदी कभी कभी गाईल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
**************
एकशे एक, नाईन्टी नाईन, नाईन्टी थ्री point थ्री
ही ऑफर, ती ऑफर, ह्याच्यावर ते फ्री
कसला विचार करतोएस रामैय्या? घराला आणि छताला..
अय्या टारझन तू बाळाराम मार्केटमध्ये कसा?
पुन्हा एकदा लुंकडचा मान्सून सेल लागेल
पुण्यामधली पावसाने मारलेली दडी स्मरेल
एफएमवरती चांदनीतलं ‘फिर वो झडी’ वाजेल
मनात, देहात, गात्रात पाउस कोसळ कोसळ कोसळेल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
**************
खरखर खरखर घरघर घरघर
मेलबर्न, इडनगार्डन, वानखेडे, लॉर्डस्,
गावस्कर, रवी शास्त्री लाइव्ह कमेंट्री फास्ट
सेहेवाग माही, कुंबळे कोहली! किती वाद - काय राहिलं!
क्रिकेट, टेनिस, रग्बी, फूटबॉल कुणी जिंकलं कुणी हरलं
हिरव्यागार लॉनवरती पुन्हा शाहरुख येईल
पुन्हा एकदा अनकही अनसुनी ‘मितवा’ ओळ गाईल 

'वो बात क्या है बता' म्हणून पुन्हा एकदा मन विचारेल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
हे कुठले पूल तुटले,
तरी एक रेशमी लड उलगडताना दिसते कधी उत्तररात्री
उशापासचा एक चांदणी धागा सरसर सरसर ओढून घेऊन
हे दोन सुयांवर
कोण काही गुंफतं आपल्यामध्ये
न दिसणारं, न उसवणारं,
पहाटेपर्यंत कुठला उबदार कोश
तुझ्या माझ्या अस्तित्वावर
मला जाणवतो आणि तुलाही जाणवतो
हेही मला कळतं ...
ही माघातली थंडी, हे कोवळे न विझलेले निखारे
आणि अंगावर तुझ्या अस्तित्वाची न विरणारी शाल.
ही केवळ एक कविता असेल तर असुदेत
हा एखादा भ्रम असेल तर असुदेत
आता लख्ख उजाडल्यावर दिसेल
ते तरी कुठे सगळंच सत्य असेल!
आडवाटेला, आडवेळी
अनवट वेदनेचे
काही अस्फूट शब्द
जे तू झेलले नाहीस,
की तुला स्पर्शून गेले नाहीत,
रानवाऱ्यावर घुमले, फिरले
अन् मोकळे मोकळे झाले
हेच त्यांचं संचित....

समोरच्या नितळ कातळावरून ते परत आले,
मनामध्ये पुन्हा झिरपले, सुसंवादले
अस्वीकार्य शिक्का घेऊनही
मनाला मनाचे पटले
आणि मनामध्ये आनंदाने नांदले
हेच त्यांचं फलित....
धुसफुसत्या शहरांमधल्या बाजारातून फिरतो बुद्ध
दुःख दैन्य अन् पीडा पाहून अता अताशा हसतो बुद्ध

जरा, मरण अन दारिद्र्याच्या गोष्टी आता सोप्या झाल्या
आलिशानशा महालांमधली दुःखे वेचित असतो बुद्ध

घोर तपस्येनंतर सुद्धा काय जरासे राहून जाते
कधी सुजाता कधी कृष्णेच्या नैवेद्यात गवसतो बुद्ध

ज्याने त्याने शोधायाचा प्रबुद्धतेचा मार्ग निराळा
आज्ञा, वचने, शास्त्रांपल्याड तसा खरेतर वसतो बुद्ध

सत्याचा शोधात कशाला विसर पडावा युगंधराचा
जर नित्याच्या कर्मामधुनी अवचित भेटू शकतो बुद्ध
स्क्रीनवरून बोट फिरत असताना,
दाहक बातम्या, रखरखीत वास्तव,
भयावह क्लीप्स, त्रासदायक वक्तव्य
ह्यांच्या खाली
मधेच कुठेतरी दिसावी
शाश्वताची मुळे शोधत जाणारी
एखादी कविता
आणि आजूबाजूला फुललेली
अनेकरंगी मनमोहक फुलं....
त्यांच्या स्वर्गीय सुगंधात हरवून जावं न जावं तोच
स्क्रोल करावं आणि
पुन्हा एकदा यावं जमिनीवर...
तशी तर ही सवयीची ओढाताण,
लपाछपी आयुष्यभर
आजकाल बोटंही ताळमेळ साधतात
फिरताना मोबाइलवर...
चल चाळून घेऊया ही रात्र
ओंजळीतल्या शुभ्र चांदण्या तुझ्या
नि त्यातून ठिबकणारा अंधार माझा

रोळून घेऊया माती
त्यातले कांचनकण तुझे
मृगजळाची राळ माझी

नातंही घेऊया निवडून
त्यातलं प्रेम-आस्था तुझी
आणि तितीक्षा माझी
अशी लागते ओढ अनावर ठिणगी पडते नुरते अंतर
तगमगणारे दग्ध निखारे विझता विझता पडते फुंकर

आसक्तीचे धगधग वेढे मानेवरती रूळतो श्वास
संथ लयीचे उत्कट ठोके घुमतो गाभाऱ्याचा आस

अस्फुटणाऱ्या हुंकारांची कंठाला पडलेली भूल
आणिक मिटवू पाहतानाही ओठांची ओठांना हूल

धुसफुसणारे प्रश्न कधीचे कुणी कुणाला द्यावे उत्तर
चुरगळल्यावर फूलपाकळी अवचित हाती येते अत्तर

पहाट होता कायेवरती सरसरतो व्रण निळा जांभळा
विरह वेदना सौख्य हुळहुळे जपताना मग साखरवेळा

भीनत जाते कृष्णनिळाई सावळकान्हा होते जीवन..
अलौकीकशा स्पर्शानंतर राधा राधा होते तनमन..
तशी तर संपून जाते दिवाळी पण
उंबरठ्यावरच्या दिव्यांच्या डागातून
उरल्या सुरल्या रांगोळीच्या रंगांतून
कट्टयावरच्या रिकाम्या पणत्यातून
ड्रायक्लिनिंगला द्यायच्या राहिलेल्या नव्या कपड्यातून
काढून टाकावासा न वाटलेल्या आकाशकान्दिलातून
सप्रेम भेट आलेल्या न फोडलेल्या पाकिटातून
कोपऱ्यात पडलेल्या फुलाबाजीच्या पाकीटामधून
न आलेल्या मेसेजेस कॉल्समधून
राखून ठेवलेल्या
खूप दिवस डब्यात कुडमुडत राहिलेल्या
चार चिरोट्यांमधून
खूप खूप दिवस मागे उरते दिवाळी...
- विभावरी
इमारतीच्या माझ्या थोडे बाजूला
वठलेले हे झाड रोजचे दिसे मला
वेगवेगळ्या पक्षांची त्यावर ये जा
किलबिल, गलका, सूर नवनवा गाण्यांचा

पटलावरती मेघांचे घनगच्च झुले
फेनफुलांचे आभासी जणु रान फुले
उभे राहते सामोरे पण झाड असे
निष्पर्ण तरी बैराग्याला दुःख नसे

मावळतीला रविबिंबाची जादुगरी
धुरकटलेल्या माखुन फांद्या सोनसळी
कधी विलासे चंद्र शुभ्रसा संध्येला
चमचम करते चंदेरी सुकली काया

असेच आहे बहुधा मनही राखाडी
सजवित आहे उगाच मोहक रंगांनी
- विभावरी

तू म्हणालास म्हणून ह्या कोऱ्या कागदावर
एक भलं मोठं शून्य काढलं
इतकं मोठं की त्याच्या पोकळीत
काढता येईल एखादं सुंदर चित्र
असं तर शून्यातूनच निर्माण होतं म्हणतात
एक संपूर्ण विश्व

मग तू म्हणालास, खोडून टाक
अन् शून्य थोडं लहान कर
तर तसंही करून बघितलं
आणि बाजूने रेखाटत बसले
एक न संपणारी भली मोठी रांगोळी

मग तू म्हणालास हेही नको
एक ठिपका दे फक्त
तर त्या ठिपक्यातूनही निघाल्या
अगणित रेषा
एकमेकांना छेदणाऱ्या

आणि एक दिवस तू म्हणालास
हा कागदंच नको
तर वो भी सही!
घे - हे त्याचे तुकडे, ही जळती काडी
जन्मभराच्या सदीच्छा आणि चिमुटभर राख
हा फकीराचा पंखा, ही मी मारली फुंकर
बाहीवरची थोडी झटक, आणि आयुष्य उजळवून टाक!

एक स्फुट ...

हा कुठला निरंतर प्रवास आहे.
खरा आहे की आभास आहे..
जे मुक्काम वाटले होते तेही थांबेच निघाले.
तिथल्या आठवणी आणि कृतज्ञतेच्या शिदोरीसह प्रवास चालूच आहे....
काही थांबे जिथले लोक अनोळखी आणि भाषा अवगत नसणारी होती.
तिथून तर लगेचच निघायचं होतं.
पण ओळखीच्या प्रदेशात, ओळखीच्या भाषेतही कधी संवाद झाला नाही.
तरीसुद्धा एकटेपण वाटू न देणारी ही कुठली भाषा आहे
ज्यातून संवाद अव्याहत चालूच आहे...
वेळोवेळी सूचनाही मिळत आहेत ....
काही थांबे ज्यावर नो एन्ट्री होती,
चुकीच्या platform वर उतरलो.
कारण नसताना घुसलो,
जिथे खूप वेळ रेंगाळावसं वाटलं पण गाडी सुटण्याची भीतीही होती.
शेवटच्या क्षणी कुठूनतरी अलार्म वाजला आणि
कुणीतरी हात दिला,
ही कुठली गाडी होती जी अजूनतरी सुटत नाहीये...
शेवटपर्यंत असतील असं वाटणारे मध्येच उतरले
आणि नवीन स्टेशन्सवर नवीन सहप्रवासी भेटले.
पर्समध्ये अशी कोणती चॉकलेट्स होती सगळ्यांबरोबर वाटता आली
आणि तरीसुद्धा संपत नाहीयेत...
काही काळ्याकुट्ट रात्री हाच मुक्काम शेवटचा वाटला,
सिग्नल नव्हते, ओढून घेणारे हात नव्हते,
तरीसुद्धा गच्च मिटलेले डोळे उघडल्यावर
कुठला नवीन गावातला सूर्य दिसला
ज्याचा उदय अस्त अव्याहत चालूच आहे...
काही काळ्याकुट्ट रात्री काही थांब्यांची भीती वाटली,
ताण आला, बायपास करावेसे वाटले
पण ते अटळ होते.
असे कुठले थांबे खूप खूप मागे पडले
आणि आता अगदी किरकोळ वाटताहेत...
ह्या प्रवासाचा अंत अंतात आहे
की ती एक नवीन सुरुवात आहे....
हा कुठला निरंतर प्रवास आहे.
खरा आहे की आभास आहे.....