Saturday, February 28, 2015

पार्क मधली खेळणी बघून अंदाज घेते ती जरासा...
मग फारशी गर्दी नसलेल्या घसरगुंडीवर जाते,
तीही रिकामी व्हायची वाट बघत थांबते
आणि मग धीमेपणाने खेळत राहते.
धक्काबुक्की नाही, आपणच पाहिले जायची घाई नाही.
आणि कोणी केलीच धक्काबुक्की तर
शांतपणे बाजूला होते.
झोक्यावर नंबर यायची वाट बघत राहते.
आणि मिळाला कि आपल्याच नादात
उंच उंच हेलकावे घेत राहते.
कोणी दिसलंच नंबर लावून थांबलेलं तर
आपसूकच झोका थांबवते,
अगदी लहान होती तेंव्हापासून !
मलाच हवा ह्याचा अट्टाहास न करता.
जंगलजीम वगैरे अवघड गोष्टींच्या वाटेला
तिला अज्जिबात जायचं नसतं.
पण मी हट्ट करते म्हणून
चढते अगदी बेताबेताने.
कोणी लहान रडताना दिसलं
कि स्वतःच कावरीबावरी होते.
एवढ्या गलक्यातही तिला ऐकू येतात
बागेतल्या पक्षांचे वेगवेगळे आवाज
आणि दिसत राहतात चिमुरडी फुलपाखरं.
अगदी सूक्ष्म लक्ष असतं तिचं सगळीकडे.
आणि खेळायच्या नादात सुद्धा लक्ष ठेवून असते
मी नजरेआड होत नाहीये ना ह्याकडे.
खेळून दमली कि वाळूमध्ये शोधत राहते शंख आणि शिंपले.
मग मी मुद्दामच जरा नजरेआड होते.
आणि तिच्या ठरलेल्या जागी
मी दोन क्षण जरी नाही दिसले
तरी कावरीबावरी होते टी केवढी !
डोळ्यात साठलेले टप्पोरे थेंब मी दिसल्यावर बरसतातच शेवटी.
आणि मग येऊन बिलगतेच मला.
नेहमीचीच बाग, नेहमीच जाऊन काही माणसंही ओळखीची.
मग तिच्या रडण्यावर मी नाराज होते, खूपच !!!
ओरडतेच तिला ! आणि लेक्चर देत राहते जरा धीट हो म्हणून !
अखेर घरी येताना जिन्याच्या पायऱ्या चढता चढता
मी मनाशीच म्हणते .....
‘कशी अगदी माझं प्रतिबिंब आहे ती .... !’
तो रिमझिम रिमझिम येतो
तनमनात श्रावण झरतो.
अदमास किती लावावे
पाऊस जीवाला छळतो.

मी चिंब चिंब होताना
तो उन्हें पांघरी भगवी.
मी रिक्त रिक्त होताना
तो इंद्रधनु सतरंगी.

मी ओथंबून जाताना
तो निर्जल एकल कान्हा.
मी निःसंगी अनुरागी
तो स्पर्शातुरसा पावा.

मी व्यक्त व्यक्त होताना
तो निर्मोही घननीळा.
मी सावरताना सारे
तो व्याकुळ काजळकाळा.

हा लपाछपीचा श्रावण
अन अदमासातील अर्थ
लपण्यातील मधु अनुबंध
कळण्यात न जावे व्यर्थ.
आयुष्य ग्रीष्म होता आहे तुझा निवारा
उद्दीप्त वेदनेवर जालीमसा उतारा.
सगळ्याच वादळांचा उसळून अंत झाला.  
जेथे विसावलेला होता तुझा किनारा.
एकेक मालवीता  अंधार फार झाला.
आश्वस्त उत्तरेला फुलला टिपूर तारा.
गेला असाच जेंव्हा शोधून जन्म वाया.
तुझिया मिठीत आला उमगून स्वर्ग सारा.
चुकला  प्रवास सारा, फिरले तृषार्त जेंव्हा  
कळताच अमृताच्या झरल्या विमुक्त धारा.
नको नको रे पावसा
असा आसेला लावूस
माझी भिजूदे झोपडी
उभी तुझ्या स्वागतास.
नको येऊ तडातडा
इथे नको तिथे पड
नको भलत्याच वेळी
तुझी वैतागाची झड  
असा कुठलाही बोल
तुला लावणार नाही.
मनमुराद तू ये रे.
हाती राखू नको काही.
चंद्रमौळी छतातून
थेंब थेंब पडतील.
चुली भोवताली सुद्धा
आगीसवे खेळातील.
पण धन्यच्या डोळ्यात
तुला पाहण्यापरीस
किंवा सालभर चूल
जी न पेटण्यापरिस
आता ये रे कोसळत
नको लावू आता आस.
माझी भिजूदे झोपडी
उभी तुझ्या स्वागतास
ह्या बोचऱ्या थंडीमध्ये
सखे तू किती पांघरलयेस धुकं
आपल्या दोघांमध्ये....
धुक्यामध्ये दिसत नाहीत
पुढे केलेले हात,
धुक्यामध्ये कळत  नाही
येतीये का साद ,
विझू विझू होते
निखार्यातली धग
हरवून जाते शेकोटीची
उरली सुरली उब.
कसा होणार रस्ता पार,
कसे जाणार पुढे,
सखे तू किती पांघरलयेस धुकं
आपल्या दोघांमध्ये....
स्वच्छ सूर्यप्रकाश,
मोकळी हवा
राहूदेत दोघांमध्ये.
लपंडावाचे असुदेत
डाव मजेपुरते
अबोल्याचे आता
विरुदेत थोडे पडदे
सखे तू किती पांघरलयेस धुकं
आपल्या दोघांमध्ये....
गंज निघाले फाटक आणिक झुडुपे वेली तृणे माजली. 
कुण्या काळच्या आलिशानशा घराभोवती मुक्त पसरली.
किरकिरणारा झोपाळा जो निर्जनतेचे दुखः साहतो.
दारावरच्या घंटेसोबत वाट  पाहुनी थकून जातो.
कुंद सावळे घरकुल आणिक रया उतरल्या केवळ भिंती.
सुन्न सोडले अबोल पडदे प्रकाश वारे अडवून धरती.
जीर्ण जुनेसे किमती जाजम केविलवाणे पडून असती.  
धुरकटलेल्या शोभित वस्तू गतकाळाच्या खुणा सांगती.
दिवस मोकळा भकास वाटे स्वप्नांवाचून उरली रात.
उगाच केवळ सूर्य उगवतो म्हणून म्हणती त्यास पहाट.
उगा जराशी फक्त सकाळी माजघराला येते जाग.
नंतर केवळ वेळ काढणे कधी कुणाचा नसतो माग.
अशा उदासीन घरामध्येही उरते काही चकचकीतसे.
हार घातली भिंतीवरची फोटोचौकट लख्ख दिसे.
कसा सहावा घरदाराने काळाने केलेला वार.  
तरुण मुलाच्या म्रृत्यूनंतर जीवन केवळ शिष्टाचार.
जरा चांदण्याचे बघू काय होते.
जसे ह्या उन्हाचे बघू काय होते.

अवेळीच दाटून आभाळ आले.
अता मोहराचे बघू काय होते.

अकस्मात गेलास  मोडून स्वप्ने.
तुझ्या वास्तवाचे बघू काय होते.

तुझ्या आठवांचेच ओझे निमाले.
तरी विसरण्याचे बघू काय होते.

तुझे दुःख माझे न झाले तरीही.
अशा हासण्याचे बघू काय होते.
दबक्या पावलांनी ऊन येतं थंडीला कवेत घ्यायला.
मध्यान्हीलाही कळत नाही कोणी कोणाला विळखा घातला.
छे! ह्या कोमलतेचा काही भरवसा नाही!
सारख्याच आवेगाने
माझ्याकडे येणाऱ्या
अथांग पसरलेल्या ह्या
काळ्या, करड्या, शुभ्र वाटा.
अधोगती, प्रगती आणि उन्नती
अशी कोणतीच निवड
ह्या खेचाखेचीत
होत नाही तेंव्हा
उभी राहते ह्या ठिकाणी....
शरीर मन आणि बुद्धी ह्या तिठ्यावर
घर तर येतं बांधता
पण एक खंत उरते कि
थांबून जातो प्रवास ......
असा कुठला दुवा, कुठल्या लहरी
कुठले कोश असतील
जे न बोलता, न लिहिता
तुझ्यापर्यंत काही पोहोचवतील
माझ्याकडे काही घेऊन येतील .....
असे कुठले दूत, कुठला मेसेंजर
कुठल्या जाणीवा असतील  
कोणत्याही संगाव्याशिवाय
कोणत्याही निरोपाशिवाय
मला तुझी आठवण तर येतेच
पण तुला माझी आठवण येतीये
हे मला कळेल.....
असा कुठला सहवास असेल
जो न भेटता,
अस्पर्श चांदण्यासारखा तनभर पसरेल
आणि मनभर खोल खोल झिरपेल.....
तशी तर येतेस तू,
भेटतेस, हातात हात घेतेस,
थोड्याफार गप्पा आणि
थोडाफार सहवासही देतेस,
आपण फोटोही काढतो
(वॉलवर टाकतो)
अगदीच नाही असं नाही....
तक्रार तरी कशी करू ?
पण धावत येशील,
श्वास गुदमरून जातील
अशी मिठी मारशील,
सगळं संचित डोळ्यांच्या कडातून
बाहेर पडेल....
कोणी कोणी नसेल बघायला,
असा क्षण जो मी कोणाबरोबर
वाटूनही नाही घेणार,
फक्त तू आणि मी !
खरंच कधी भेटशील एवढ्या उत्कटतेने ?
कविते.....

प्रवासी


अनभिज्ञ काहीसे गुंते
रेशीमपाश अन गाठी
त्या अवघड वळणावरती
मी सोडून आलो पाठी.
मळलेल्या वाटेवरती
पण तरी लागते ठेच
विस्मरणाsस चकविती
हे आठवणींचे पेच.
हुळहुळते जखम कशाने  
मी कितीक आलो पुढती.  
रांगोळी  काचफुलांची
सरलेल्या वाटेवरती !
आयुष्य उधळून द्यावे
ह्या अथांग क्षितिजावरती
एखादा तुकडा तुटतो
ह्या सोडविता निरगाठी.  
अश्रूंनी ओंजळ भरता
जरी वळलो विनसायासी
मी निर्गमनास अधुरा  
बीनपरतीचा प्रवासी.
जेंव्हा ती ओळखीची असते
तेंव्हा माहित असते तिची दिशा, प्रवास
आणि शेवट,
बहुतेक वेळा कागदाच्या पानावर
कवितेत उतरून .....
पण एखाद्या वेळी ती
पिसाटलेल्या वाऱ्यासारखी
धावत राहते सैरावैरा,
पात्र हरवलेल्या नदीसारखी
वाहत येते अनिर्बंध,
खोल खोल पसरत राहते
सगळ्या अस्तित्वावर आपली मुळे,
वाट फुटेल तिथे उसळत राहते
लाव्ह्यासारखी,
धुमसत राहते रानभर,
एखाद्या ठिणगीने पेटलेल्या वणव्यासारखी....
ती मग कागद भिरकावून लावते क्षणार्धात,
कधी गच्च भिजवून टाकते
निळ्या अक्षरांचा रंग मिसळवून,
जखडून टाकते त्याचं अस्तित्व
आपल्या आवेगाच्या गारुडाने,
कठीण निश्चल करून टाकते
एखादा शुभ्र नितळ कागद...
कधी तो उरतो
केवळ चिमुटभर राखेपुरता....
सगळं काही वांझ करून टाकते
एखादी निनावी अस्वस्थता...
तरलपणाची किंमत  मोठी चुकती करतो प्राजक्त
सकाळ होता सडाचांदणे निपटुन बसतो प्राजक्त.  
उंची उंची अत्तरातही अवचित कुठली सय येते.
कधी मनाच्या कोपऱ्यात हा मग दरवळतो प्राजक्त.  
रंगबिरंगी फुलांsस देतो दिन तेजोमय फुलण्याला
रात्रीच्या शेवटच्या प्रहरी स्वतः बहरतो प्राजक्त.
फुलदाणी ना, नाही गजरा, ईश्वरचरणी ना जागा 
निःसंगी भगव्या देठांसह गळून पडतो प्राजक्त.
देह मिसळता जाता जाता गंधित माती पण म्हणते  
स्वर्गीयतेला नश्वरतेचा शाप भोगतो प्राजक्त.
सुखाने पाय पसरावे नि शब्दांनी मुके व्हावे
जरासे शांत होताना मनाने दूर का जावे?

कसे नाते हे दुःखाशी जे देते शब्द भरभरुनी.
मनी कल्लोळ जो उठतो रिता होतो शाईमधुनी.

वेदनेची जी मर्यादा स्वतःतून पार होवोनी.
जगाशी नाळ जुळावी नि सुखे दुःखे एक व्हावी.

नको काही ओळखीचे नसावा थांग भावनांचा.
नको गोंजारण्याकरिता डोंगर कल्पित दुःखाचा

निनावी दुःख लाभावे जरासा भाव बदलावा.
कवितेचा लेखणीचा झरा पुन्हा नवा वहावा.

हातांच्या ह्या घट्ट मिठीला
सोडून जेंव्हा दुडदुडलीस तू
स्वैरपणाने, आनंदाने,
आणिक अवचित ठेच लागता
फिरलीस मागे प्रेमभराने, विश्वासाने.
आणि कधी तू घाबरताना
नव्या जगाला, अंधाराला
कधी कोणत्या गोष्टीमधल्या
चेटकिणीच्या शापाला नि क्रूरपणाला,
त्या त्या वेळी जवळी होते
किंवा होते तुला पुरेशी
बालपणीच्या संघर्षाला
तुला पुरेसा धीर द्यायला,
समर्थपणाने.....
परंतु ही तर थोडीसुद्धा
नाही तयारी जगतानाच्या
भविष्यातल्या आव्हानांची,
आला जर का एखादा क्षण
खऱ्याखुरया त्या अंधाराचा
आणि भेटली दुष्ट माणसे
नव्या जगातील खरीखुरी जर,
अनपेक्षितशी ठेच लागता
सावर बाळा आपली आपण.
आणि पूर्णतः कोसळून तू
जाण्याआधी आठव थोडी
आमची शिकवण,
थोडी मागे येऊन, पाहून.
आणि हेही आठव थोडे
असू तेथुनी आशिष आमचे
असतील कायम तुझ्या सभोती
तुझी सावली होऊन.
एखाद्या अव्यक्त आणि निस्तब्ध पहाटे
जाग आल्यानंतर
एकेक तारे मावळून गेल्यानंतरही
खिडकीच्या गजातून झिरपणारं
सौम्य चांदणं
उशीवर अलगद उतरतं तेंव्हा,
मी शोधत राहते
तुझ्या असण्या-नसण्याच्या खाणाखुणा,
तेंव्हा कुठेतरी दूरस्थ लकाकणारा
एक शाश्वत तारा
आश्वासित करतो ...........  
‘मी इथेच आहे, इथेच कुठेतरी आसपास’
कोसो मैलांवरून नित्यनेमाने
चांदण्यांचे असे काही कणभर क्षण हातात येतात,  
आणि मग त्या निस्तब्धतेतही  एक
अनादी अनंत असा हुंकार भरून राहतो.
नकोनकोसे मनात असते हळवे काही.
हवेहवेसे निसटुन झरते हळवे काही.
मुसळधार बरसल्यावरही दाटून येते.
काय नभाच्या मनात उरते हळवे काही?
तू गेल्यावर निष्ठुरतेची शाल ओढली.
तरिही कवितेमधे भेटते हळवे काही.
कितेक वेळा अश्रू पूसते मी एकाकी
ते सावरते तरिही छळते हळवे काही.
शब्दांनीही पाठ फिरवता कवितेमध्ये
उत्कटतेने सोबत करते हळवे काही. 
अशा तर तुझ्या माझ्यापर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या
कितीतरी वाटा असतील.
एखादा राजमार्ग किंवा आडवळण,
एखादा रस्ता चढणीचा, उतरणीचा....
एखादी पाउलवाट, एखादा हमरस्ता....
पण हमसफर होऊ असा कुठलाच रस्ता
कधी दिसत नाही मला....
कारण एकमेकांपासून एकमेकांपर्यंत
अशा कोणत्याही गुंतागुंतीच्या रस्त्यांनी
केलं जरी कितीही अंतर पार
तरी
माझ्या घराभोवतीच्या
आणि तुझ्या मनाभोवतीच्या
ह्या चौकटीचं काय?
नको नको रे पावसा
असा आसेला लावूस
माझी भिजूदे झोपडी
उभी तुझ्या स्वागतास.
नको येऊ तडातडा
इथे नको तिथे पड
नको भलत्याच वेळी
तुझी वैतागाची झड  
असा कुठलाही बोल
तुला लावणार नाही.
मनमुराद तू ये रे.
हाती राखू नको काही.
चंद्रमौळी छतातून
थेंब थेंब पडतील.
चुली भोवताली सुद्धा
आगीसवे खेळातील.
पण धन्यच्या डोळ्यात
तुला पाहण्यापरीस
किंवा सालभर चूल
जी न पेटण्यापरिस
आता ये रे कोसळत
नको लावू आता आस.
माझी भिजूदे झोपडी
उभी तुझ्या स्वागतास.

आस


असा झिम्माड येईन
अंग अंग घुसळत
दणाणत्या आवाजात
छत करेल स्वागत.
असा बेभान येईन
चकवित बरसत
छत्र्यां अडोशांना सुद्धा
चुकवित भिजवित.
ढेकूळल्या मातीमध्ये
विरघळेन मी जेंव्हा
बीज तरारून बघ
नभा भेटेल ग तेंव्हा.
पाट खळाळून आता
वाहतील जागोजागी.
कसणाऱ्याच्या नशिबी
यंदा असेल ग सुगी.
अंगणात कोसळेन
होऊनिया मुक्त धारा 
कोणी सांडला वाटेल
जणु  मोत्यांचाच चुरा.
थोडे राखून ठेवेन
थेंब खिडकीशी काही.
आणि वाचून जाईन
तुझी  कवितांची वही.
बघ घेईल हि धरा
आता मृदगंधी श्वास. 
पागोळ्या नि दिठीतून
ठेव जपून तू आस.
फिनिक्स जसे भरारी मारतात ना
राखेतून जन्म घेऊन
तसेच कधी कधी आपल्या
उध्वस्त स्वप्नांच्या पायावर
उभे राहतात कुणाचे स्वप्नांचे इमले.
एकात एक गुंफलेल्या नात्यांमुळे
त्यांची स्वप्नं पूर्ण व्हावीत
हे देखील असतं आपलं एक स्वप्नं
आणि मग गाडतो आपण स्वतः रचलेले
स्वप्नांचे मनोरे
पाया भक्कम करण्यासाठी ......
पण जेंव्हा कधी माझ्या मनात
त्या दबलेल्या स्वप्नांचा
आणि त्यांच्या पूर्तीचा विचार येतो
तेंव्हा मी एकाच प्रार्थना करते,
हे प्रभू, भूकंपातही भक्कम राहील
असा पाया रचण्याची शक्ती मला दे!
निदान माझ्या एका तरी स्वप्नाची पूर्ती होऊ दे!
लक्ष्मीच्या पावलाने  घरात येताना
जपावी  चैत्रातल्या हिरव्या पानाची कोवळीक,
आणि लगेचच कळावं
प्रेमाच्या झरयातले चार शिंतोडेसुद्द्धा
उडणार नाहीयेत अंगावर,
तेंव्हा मग हरवावी कोवळीक ऑस्तुक्याची,
चेहरा होत जावा शुष्क शुष्क भेगाळलेला,
रंग होत जावा फिका फिका,
होत जाव्यात सगळ्याच छटा करड्या करड्या,
ओठांवरच विरावं गीत बहराचं,
आणि कर्कश्श वाटावी कोकिळेची तानही,
हे आजूबाजूला चालणारे आकांडतांडव !
हे भाजून काढणारं दग्ध वास्तव!
तसाच हा दुष्काळ!
त्यातून रात्र सरावी तळमळत,
आणि सकाळी उठून नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावताना
हात थरथरावा,
तसं नित्यनेमाने वर यावं हे भगभगीत बिंब!
आणि मग दिवस ढकलावा बेभरवशी आषाढाचं
दिवास्वप्नं पहात.
सृजन, प्रतिभा आणि अभिव्यक्ती
ह्या सगळ्याच्या सो कॉल्ड लाटा
अनावर असताना तू दिसत नाहीस कधी….
आणि वाढत्या वयानुसार
पाण्यावर तरंगही उमटत नाहीत तेंव्हा
त्या संथ डोहाच्या पलीकडे
हातात 'लिबिडो' चे उतारे घेऊन
तू छद्मीपणे हसत असतोस
फ्रॉईड ….
वाऱ्यावर लहरत नाही
आकाशी थिरकत नाही.

उन्मळून मी ना पडते
तितकेसे उठवत नाही.

मी किति मोकळीक देते
आताशा हरवत नाही.

घट्ट पकडला पाऊस
तरीही बहरत नाही.

मी आमंत्रण ना देते
अन तेही फिरकत नाही.

आताशा जगण्यावर ह्या
कविताही करवत नाही.
ह्या चिऱ्यांभोवती आता
का फिरकत नाही कोणी.
वाऱ्यावर उडून गेल्या
कवितेच्या कातर ओळी.

महिरपी काच तुकड्यांच्या
आरसे लख्खसे होते.
एखादी तिरीप तरलशी
अन लखलखाटी कवडसे.

समृद्ध नांदत्या महाली
का स्थीर स्तब्धता शिरली.
झगमगत्या भिंतींची का
खंडारे अवचित झाली.

पडक्या अवशेषातून
फिरणार कधी हा वारा ?
जागून कपारीमधुनी
घुमणार कधी हा रावा?

कधीतरी ………


कधीतरी -
आजूबाजूचा गोंगाट
आपल्यापुरता स्तब्ध होऊन
एकमेकांच्या डोळ्यातून ऐकू येईल फक्त
"खूप खूप आधी का नाही भेटलो आपण?"
कधीतरी -
झाडांच्या सावल्या जिथे
चांदण्याची झिरमल
पांघरून असतील अशा
निर्जन रस्त्यावर
हातात हात घेऊन
निमग्नपणे चालत राहू …
कधीतरी -
वळीवानंतर पडलेल्या संधीप्रकाशात
मृद्गंध आणि कॉफीने गंधाळलेल्या वातावरणात
मी फक्त ऐकत राहीन तुझं बोलणं
अनंत काळ …
कधीतरी -
झोप हरवलेल्या हस्तातल्या
पावसाळी रात्री
आपण ऐकत असू एकत्र
एखादं साहिरच गाणं….
कधीतरी –
एखाद्या अथांग सागरतीरावर बसून
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून
डोळे मिटून ऐकत राहीन
उधाणलेल्या समुद्राची गाज…
कधीतरी-
एखाद्या प्रगाढ मिठीतून
आणि उत्कट चुम्बनातून
वाचेन तुला प्रियकरासारखी …
कधीतरी…….
कधीतरी -
लिहीन मीही ह्या सगळ्या असंभव गोष्टी
कवितांमधून……
आणि एक राहीलं ….
कधीतरी -
देईन तुला वाचायला
तुझ्यावर लिहिलेल्या सगळ्या कविता…….
शार्दुलविक्रिडीत सुनीत
कौलारू भवना पुढून निघता आल्या स्मृती दाटुनी
विद्येची पहिली इथेच लिहिली बाराखडी घोकुनी
स्वप्नांचे रचले इथेच इमले कित्येक भारावुनी
पुष्पे ही फुलली कितीक पुढती रूजून मातीतुनी
दारातून तिच्या प्रवेश करता शंका किती ह्या मना.
राहील्या असतील ना हरवल्या का ओळखीच्या खुणा.
माथा हा चरणी सदैव झुकला ती भेट होईलना.
पूर्वीचे स्मरतील ना सहजसा आशीष देतीलना.
काही काळ जरी मधून सरला जागी  स्मृती जाहली.
आनंदे बघता जुन्या गुरुजनां नेत्रेच पाणावली 
काळाचा परि हा असाच महिमा  चुकला कधी का  कुणा?
शिष्येची बघताच उन्नति जरा व्यवहार आला मना.
शाळेची बघ जाहली मज कशी ही  दुर्दशा सांगती.
पाठी हात न ठेविला पळभरी नी  देणगी मागती.
असं नाही की
आकाशापर्यंत पोहोचणारी
एखादी शिडी सापडावी,
किंवा असंही नाही की
हा समोरचा निळा डोह असावा
खूप गहिरा, अथांग
असं नाही की त्या डोहात
खोल खोल उडी जावी.
आणि
एका डुबकीत मिळावेत
मोती असलेले शिंपले
मिळालेच तर मोत्याच्या राशींचे
रचले जावेत ढिगारे !
असं नाही की वाटांवर
बहरून असावीत दुतर्फा
फुलांची झाडे.
आणि असतीलच तर
भरून जावी ओंजळ त्याने.
पण सळसळाटा मध्ये
पानांमागच्या इवल्या पक्षाची
शीळ कधी ऐकू यावी कानी,
आणि रानफुलाचाही सुगंध यावा
केतकीच्या वनी…
वाऱ्याच्याही झुळुकीने
डोहावर हलके तरंग उमटावेत
आणि मिटण्याआधी इंद्रियांनी
मनभरून टिपून घ्यावेत.
कधीतरी एखादं अनाहूत, आगंतुक प्रेम

हातात येतं अलगद

शेवरीच्या कापसासारखं

हळुवार, हलकं हलकं…

इतकं नाजूक, इतकं तरल,

चिमटीत पकडून तळव्यावर ठेवावं

आणि मुठ बंद करावी

तर कोमेजून जायची भीती.

ना विणला जातो त्याचा

एखादा तलम धागा……

पण लहान मुलासारखी

निर्व्याज मनाने

तळहातावर ठेवून

त्यावर मारताही  येत नाही

एखादी निर्मोही फुंकर……
when i met you
I thought
between you and me
there will be a short time comradeship.
So i advanced with smile...
But alas!
You made me to exchange garlands with you.......
Oh the Grief! You misunderstood!
उन्हाचे उसासे
वळीवाची आस
तुझेच आभास
आसपास

कलंडली सांज
हो संधिप्रकाश
वाट ही उदास
दूरवर

रात्र ही विदीर्ण
ओल्या पापण्यास
स्वप्न सहवास
अखंडित

पहाट निमग्न
दव आसपास
कळ्यांचे निश्वास
धुक्यातले

प्रखर सकाळ
प्राजक्ताची रास
विरलेली आस
निरंतर

Friday, February 27, 2015

माझ्या शहरातून तुझ्या गावाकडे
जाणाऱ्या रस्त्यावर पाऊस सारखाच असतो खरंतर!
मात्र तो कधीही आला तरी
त्या टोकाला असते एक विवंचना.
तो कधीही आला तरी घेऊन येतो
टिकावाचा प्रश्न….
वेळेत येईल? आणि आलाच तर पुरेसा?
दुष्काळ, अवर्षण?
मात्र रस्त्याच्या शहरात घेऊन येणाऱ्या
ह्या टोकाला मी असते पाऊस झेलत…
चारदोन गारा वेचत…
पाऊस कधीही आला तरी माझ्यासाठी असतो तो
चित्तवृत्ती बहरून टाकणारा,
मातीच्या वासाने
भावनांना दाहवणारा,
कोणाच्या आठवणी कुरवाळणारा….
माझ्या काल्पनिक सुख दुखाःला गोंजारणारा…
माझ्या अंतप्रेरणेला जागवणारा….
त्यामध्ये मी विसरून जाते पावसाचं तांडव,
ज्या पावसात वाहून गेलेली असते
तुझी टिकावाची मुलभुत गरज….
रस्त्याच्या शहरातल्या ह्या टोकाला मी
आणि त्या टोकाला मला न दिसणारा तू…
अंतप्रेरणे पासून जाणीवांपर्यंतचं हे अंतर
कधी होणार पार मझ्याकडून…. ?
अवकाळी पावसाने
होऊन जाते झाडाझडती
कष्टाने वाढविलेल्या रोपांची…
नुकतीच फुटलेल्या पानांची…
तग धरून नेटाने उभ्या असलेल्या
आवश्यक झुडुपांची,
वाताहत होते जोम धरत असलेल्या
नवीन नवीन धुमारयांची ….
अवकाळी पाऊस उखडून टाकतो
खोल न गेलेली मुळं…
उपटून काढतो सगळेच
निश्चयाचे नाजूक साजूक फुलोरे…
आणि विस्मरणाची मृदगंधी आवरणं……
अवकाळी पाउस शब्दशः फिरवतो सगळ्यावरच पाणी…
अवकाळी पाउस घेऊन येतो
अवकाळी निघून गेलेल्या माणसांच्या आठवणी…
कुठे मनास गुंतवू असा न प्रश्न ह्या मना
कधी कुठे नि मी कसे न गुंतवू कळेचना.

कधी धरा कधी नभासवे फिरे विमुक्त ते
विलोभुनी भरारते कधी दहा दिशात ते.

निसर्ग पाहता जसा क्षणात जीव गुंततो
मनुष्य निर्मितीपुढे तसाच जीव दंगतो.

नवीन भेट उठविते कधी मनोतरंग हे.
कधी कुणा समोर शीर टेकते नमून हे.

किती कला कितेक छंद ओढती मनास ह्या.
किती सुरेख अन सुरेल मोह हे जिवास ह्या.

कसे पुरे पडायचे सदैव जीवनास  ह्या
कसा पुरा पडायचा मनुष्य जन्म एक हा !
कितीदा मना बांध मी घालते अन कितीदा मनानेच नाकारते.
जरी हट्ट केले मनाने नव्याने तरीही नव्याने किती भांडते.

कधी वाटते की जुने तेच ल्यावे, कधी मुक्त वारे बरे वाटते.
कधी वाटते खोल ज्ञेयात जावे कधी ती भरारी हवी वाटते.

"असे जन्म ज्याचा खरा वाहणे हा कसे सावरावे तयाला तरी
हजारो युगांची खरी संस्कृती की मनाचीच आदीम इच्छा खरी."

जरी द्वंद्व चाले असेही तसेही कशी आकळे पावलांना दिशा?
समेटून घेती पिसाऱ्यात साऱ्या दिशा ना परि मोहवीती जशा!

न मोहीत होता कशी चालती राजमार्गेच ती हे मनी जाणते.
समाजात आहे अस्तित्व माझे म्हणुनीच का लोभ मी टाळते.

परंतू तरी कोण एकांत समयी पहाऱ्यास असतो उभा ठाकुनी.
कसा सूत्रधारासवे तो विचारस मार्गस्थ करितो पन्हाळीतुनी.

समाजास भिउनि सदोदीत मीही जरी मोहमाया न नाकारिते.
तुझा अंश आत्म्यामधूनी वसे जो प्रचीती कितीदा तशी लाभते.
वाट, हुरहूर, संपर्क,

संवाद, रुसवा, अबोला,

भेट, निरोप, दुरावा

मैत्र, नातं, प्रेम,

ह्या सगळ्याच्याही पलीकडे

कोसो मैलांवर  दूर असलेल्या

अप्राप्य चंद्रासारखा तू ….

आणि मी इकडे उशीला घेऊन झोपते

पापण्यांच्या तळ्यामधलं  पाणी….

निद्रा आणि  जागृतीच्या अधेमधे

तरळून जाते तुझी प्रतिमा  त्या तळ्यात स्वप्नवत….

चंद्र मुठीत आला आहे असं समजून…

मग मानून घ्यायचं समाधान.

नाहीतर माहित असतंच

हा हट्ट न पुरा होणारा .......
कितीक जन्म यायचे कितीक जन्म जायचे
पुन्हा पुन्हा तुझ्यासवे फिरून रे जगायचे.

नकोच कल्पनेमधील स्वप्नगाठ रेशमी
तुझीच नीरगाठ जी तिलाच ना जपायचे !

जरी  असंख्य बांधली हवेवरी मनोरथे
खऱ्याखुऱ्या घरामधेच ऊन सौख्य ल्यायचे.

कशास  रे सख्या हव्याच तारका नभातल्या. 
असेच बाल्कनीमधून अभ्र पांघरायचे.

उगाच का प्रितीतल्या खुळासवे उडायचे
मृदेत पाय रोवुनी पिलास पंख द्यायचे.

कितीक जन्म यायचे कितीक जन्म जायचे.......
 
ह्या धरतीवर आणि आकाशी
चराचरातून , कणाकणातून
दृश्य आणिक अदृष्यातून
रंगछटेतून पानफुलांच्या
आणिक त्यांच्या सुगंधातून
गुणलेखाच्या गणितामध्ये
उत्क्रांतीच्या प्रवासातही
नाद ताल अन रागामधूनि
जिव्हेवरच्या आस्वादातून
नक्षत्रांच्या आकारातून
नदीकाठच्या वाळूतूनही
दिसते आणिक वसते ती.

त्या बंधाची घडी मोडीता
विखरून जाते तारांगणही
वैचित्र्यातून लोप पावते
भिन्न असे जे खास स्वतःचे.
सरगम होते बेसुरी अन
तालध्वनीची कर्कश होते.
अनपेक्षितसे ज्ञान इंद्रिया
होते कधी जर नसता ती.
विदुषकासम दुनिया दिसते
रंगछटांतून हरवल्यास ती.,

अल्लड नदीसम कधी वाहते
जीवन मुक्त खळाळून पण
काठाकाठांचेही त्याला
असते नित्य लपेटून बंधन.
घाटामधुनी वळणे घेता
तिजसाठी दीपांची माळ.
जरा वाहता बंधन सोडून
'पूरप्रवण' हा माथी आळ.

ठायी ठायी पदोपदी ती
दिसते आणिक अनुभवतेही.
तरीही माझ्या कवितेमधूनी
अजुनी मजला गवसत नाही.

लय - एक pattern

संवेदना




नवऱ्याच्या बाजूने तिची उलटतपासणी घेत असताना
"ह्याचा अर्थ त्यांनी तुम्हाला घरातून जा
असं सांगितलं असं नाही, बरोबर ?"
माझ्या ह्या प्रश्नावर उत्तर देण्याअगोदर
तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तेंव्हा
क्षणभरासाठी माझी जागा बदलली गेली.
मी उभी आता विटनेस बॉक्समध्ये....
"कुठे हरवली ? पुढे काय झालं ?
कधी? केंव्हापासून? १२ वर्षे?
छे! एवढं जुनं नसावं हे सगळं !  
मग किती अलिकडे?
exactly  सांगता येईल?
आठवत नाही? पुन्हा आठव! 
एखादी अलीकडची घटना?
कसं झालं? कोणामुळे?
कशामुळे? सांगावच लागेल!
घटनाक्रम नीट आठव!
पाहिजे तर घे हे काही
उजळणी करायला!
नीट विचार करून बघ.
आणि पुरावा?"
…….
पुरावा?
हा काय, अंगावर वागवत आहे तो काळा कोट!