Sunday, February 28, 2016

सणासुदीच्या दिवसात...


.
एक गाव असतं ‘नसलेलं’
तुझ्यामाझ्यात वसलेलं.

जिथे पानांफुलांतून होते
मऊसर मलमली रंगांची उधळण
हुळहुळत येतात बोटांवर
आणि माखले जातात चेहऱ्यावर.
बेधुंध होऊन खेळला जातो
राचनाकृत रास
रसभरीत शृंगारगीतं
ज्याला सृजनाचा वास.

स्वप्नातले हे स्वप्नील वारे
गावातुनी जे वाहून येते
उडत्या पिसासम हलकेच होते
अस्तित्व माझे हरवून जाते.

तुझ्या असण्यानेच उजळतं
जिथे निस्तेज अस्तित्व
दिव्यांची आरास निष्प्रभ
आणि संवाद होतात निशब्द.
तिथे झाकोळली जात नाही
कोजागिरीची लक्ख रात्र
देहभर फुलत राहतात
चंद्र, तारे नि अगणित नक्षत्र.
 
हे दोन तुकडे की कल्पनेतील
ना सांधणारे जग हे समांतर
हळव्या मनाला का भास वेडे
हे वास्तवातील मिटवून अंतर !

मी रेखाटते कलाकृती
तू भरतोस रंग.
आठवण, चिंता, हुरहूर कोणीच
करत नाही मनोभंग.
शृंगाराची वसंत पंचमी
आणि सुगीचे दिवस.
जिथे सरत नाही पहाट
आणि संपत नाही असोस.

हटकून येते हटकून जाते
मी उंबऱ्याशी तरते विहरते
स्वप्ने नि सत्ये अस्तित्व माझे
ह्या संयूगाने मी पूर्ण होते.

सृजनाचे सगळे सोहळे
कसे हमखास येतात.
आणि तुझी आठवण येते
सणासुदीच्या दिवसात.
तिथे सगळंच उत्कट, आसक्त, अनिवार
मनानी मनाशी मनासारखं एक चित्र रेखाटलेलं.
असं एक गाव असतं ‘नसलेलं’
तुझ्यामाझ्यात वसलेलं.

भेट

तुझ्या आठवाने जशी गात्र सारी
अशी रात्र यावी झळाळून जावी.
तुझ्यापास बेभान होऊन यावे
अता कोणती अंतरे ना उरावी.

असे धुंद व्हावे असे स्पर्श ल्यावे
तुझा तू नुरावास मीही हरावे.
असा दरवळावास श्वासात तू की
मनाच्या तळाशी तुझे गंध यावे.

पहाटे पहाटे जरा जाग येता
तुझी स्पर्श हळवी मिठी दृढ व्हावी.
धुके दाटलेल्या गुलाबी हिवाळी
अशी उष्ण स्वप्ने दिसावी झरावी.

सकाळी सरावा धुक्याचा पदर अन
दवातून ओथंबुनी भान यावे.
तुझे भास होते अता स्वच्छ सारे
अशा लख्ख वेळी कसे सावरावे.

अता बस तुझ्यासाथ स्वप्नात जगणे
अता बघ घराची कडी खटखटावी.
खरोखर असावास दारी उभा तू
अशी थेट व्हावी अता भेट व्हावी.

12.12.2015

व्रतस्थ

न क्षितिजाचे तुला बंधन तुझे आभाळही मोठे
कसे गवसायचे काही तुझ्या कक्षेत फिरताना.
जमीनीशी जखडलेले कसे विसरायचे नाते
कसे पेलायचे आकाश तुकड्यातून फिरताना.

कधी पंखावरी काही उरावे थेंब पाण्याचे
तुझे आभास भवताली तुझ्या तेजात न्हाताना.
जरी तू राखिले मागे तुझे अस्तित्व रात्रीचे
तरी निस्तेज बघ ना चांदणे तू साथ असताना.

तुझी आवर्तने निश्चित तुझ्याशी बद्ध हे अंतर
कुठे खेळायचे आगीत पुढती राख दिसताना.
मला माझीच चौकट अन तूझे तर दिगंतराचे घर
सदिच्छा फक्त पोचावी प्रवासी दूर असताना.

तुझ्या आत्मीय भेटीचे सकाळी ऊन माखावे
तुझी स्मरणे असावी सांज गहिरी होत जाताना.
अशा स्वप्नील दिवसाच्या क्षणांचे सोहळे व्हावे.
सुचावि व्रतस्थ कविता तू दिशांच्या पार होताना.

सहज गंमत



तू online असणं
किती छान आहे.
नाहीतर हे whatsapp म्हणजे नुसतंच
forwards चं रान आहे.


online ह्या शब्दात
केवढी मिठ्ठास आहे.
नुसत्या ठिपक्यातही
भेटल्याचा भास आहे.

तळघर

अशी तळघरांमागून तळघरं
ओलांडत गेलो
तर काय सापडेल?
सत्वाचं कुठलं आत्मभान
की आदीम प्रकृतिचा सारांश?
हे सापडणं अंधार असेल की प्रकाश!
शेवट असेल की सुरुवात?

कम्फर्ट झोन

पलीकडे दृष्टीक्षेपात असणारं

एवढं मोहमयी काय आहे?

आयुष्य कि मृत्यू?

गिळून टाकणारा अंधार

कि दैदिप्यमान सहप्रवास?

अनामिक आकर्षण....

पण पावलं वळली कितीही

तरी नाही पोचणार मी तिथपर्यंत....

मध्ये आहे ना,

कवितांचा हा विस्तीर्ण प्रदेश!

तुझ्या माझ्या असल्या नसल्या बंधांचा

कम्फर्ट झोन !

दुःख

दुःख कशी आपलेपणाने भेटतात,

चिंब चिंब करून जातात,

मिठी मारतात, ओघळतात, मुरतात,

अगदी आपली असतात...

सुखं का परक्यासारखी भेटतात?

फक्त वाहून जातात कडेकडेने,

सुखं फार फार तर असतात बरसणारी स्वप्न

किंवा ओघळणाऱ्या आठवणी....

कि आपणच घेतो कुठला अडसर,

आपल्याच माथ्यावरती ?

ज्याने दुःख होऊन जातात औरस

आणि सुखं मात्र पोरकी ....

मोहर

हा तुझाच आहे मोहर
हे तुझेच आहे अत्तर

ओळीत अडकली कविता
तू दिसून जा ना क्षणभर

पेहेराव निवडु कुठला
तू नसता जगणे लक्तर

विरणार कधी हे रेशिम
वर आठवणींचे अस्तर

हे प्रश्न आपले दाहक
दे चांदणस्पर्शी उत्तर
हो नाही च्या पैलतीरावर जाऊ
व्यक्त अव्यक्त सीमेपाशी राहू
असण्या नसण्याच्या अथांग नभापल्याड
विरह भेटीच्या पुढचे काही पाहू