Wednesday, April 6, 2016

हा तुझाच आहे मोहर
हे तुझेच आहे अत्तर

ओळीत अडकली कविता
तू दिसून जा ना क्षणभर

पेहेराव निवडु कुठला
तू नसता जगणे लक्तर

विरणार कधी हे रेशिम
वर आठवणींचे अस्तर

हे प्रश्न आपले दाहक
दे चांदणस्पर्शी उत्तर
मनाचा थांग लागेना
तनाचा ठाव संपेना

जरा शिडकाव झाला तर
झळांना गार सोसेना

प्रवासी शोध ना घेतो
उतरण्या गाव लागेना

कसा तू बाद रे झाला
मनावर राज्य होतेना

तनाशी थांबते आहे
मनाचा भार झेपेना
(मनाचा थांग लागेना)
गवसून न हाती येई
असे निसटते काही
अळवाच्या पानावरती
थेंब जळाचा राही

उंबर्यात भास चाहुली
कवितेच्या कातरवेळी
तुकड्यात गाइल्या गेल्या
भंगूर सुखाच्या ओळी