Monday, February 6, 2017

कधी सांजवेळी दिवे लागणीला
उदासी अशी खोल दाटून ये
क्षितीजावरी रंग मिसळून गहिरा
तुझी याद हलकेच परतून ये!

नभाच्या दिशा कोण लांघून येई
युगांच्या किनारी किती थांबले
खुली मुक्त दारे किती ठेवली पण
तरी चौकटीशी पुन्हा बांधले

रिकाम्याच हाती ओंजळ रिकामी
न आत्मीय काही दिले घेतले
तरी वेदना रंग देऊन गेली
न समृद्ध काही जरी तू दिले

न आदी नि अंतास ना पोचते जी
तयाचे प्रयोजन कसे आकळे
उदासीस ह्या कोणते नाव द्यावे
किती ठाव घ्यावा मला ना कळे

तमाच्या तळाशी हळुवार जेव्हा
फुले आसवांची तुला वाहते
अकस्मात बहरून ये चांदणे जे
तुला ठाव नाही मला गवसते

न अनुबंध कुठले न नाते तरीही
कुठले दुवे साथ माझ्या तुझ्या?
जशी सांजसंध्या दिवस रात्र सांधे
गहीरी उदासी मधे आपल्या!
तुझ्या नजरेतली संख्या किती साधी किती सोपी
तरी का मीच शून्यांची रियाजी मांडते आहे
कधी संथ चालून पायी निघाले
प्रपातापरि सोडला उंच माथा
कुठे पंख आवेग घेऊन आले
नि झेपावले तेवता दीप बघता

कुठे अष्टमी चांदणे सांडताना
पहाटेस प्राजक्त गंधाळताना
कधी सांजवेळी क्षितीजाकिनारी
विसरले प्रहरही तुला शोधताना

महामार्ग काही कुठे आडवळणे
नि काट्याकुट्यातील पाऊलवाटा
कधी चढ उतरणी सरळमार्ग थोडे
कधी राजरस्ते कधी चोरवाटा

अशी येत गेले कधीही कुठेही
जशी वादळे धूळ वाऱ्यास वाही
किती धावले पण अखेरी थबकले
तुझ्या चौकटी लांघता येत नाही


कुंद कुंद हर प्रहर
पुन्हा ते जुने जहर
लांबलेल्या सावल्या
पुन्हा पुन्हा सुने शहर
पायाला मउसूत स्पर्श करणारी एखादी लालसर मळवाट,
त्यावरचं सावली देणारं झाड ओलांडून आपण पुढे जातो,
नवीन वाटा शोधत, नवे बहर शोधत.
आणि असल्या नसल्याच्या
हरवल्या गवसल्याच्या
आणि थकल्या थांबल्याच्या तिठ्यावरून
आपल्याला वाटतं ती वाट - ते झाड तसंच असावं
सावली धरणारं, त्याच्या बुंध्यापाशी आपल्यासाठी जागा राखून ठेवणारं.
आपण मागे वळून बघतो,
आणि ते – ते तसंच उभं असतंही...
वर्षानुवर्षे!
कारण झाड हे झाड असतं.
माणसं मात्र माणसं असतात...
आपल्यासारखीच!
घट्ट मुळे रोवून उभ्या असलेल्या एका झाडापासून
कल्पांतापर्यंत बांधलेली एक दोरी,
अगदी स्वप्नांच्या प्रदेशापर्यंत.
असा ताण की अजून थोडी आवळली
तर तुटून जाईल
आणि सैल सोडली तर
निसटून जाईल पकड.
दोन्ही आवश्यक -
जिवंर रहाण्यासाठी.
कल्पनेकडे निघताना
विसरून जायचं दोरीचं
वास्तवाशी मूळ,
पुन्हा परतताना करायची
स्वप्नरंजनाकडे पाठ.
चुकूनही ढळू द्यायचा नाही तोल
की झुकू द्यायचं नाही पारडं
कोणत्याच एका बाजूला.
रेंगाळायचही नाही कुठेच
कारण गती असेल तरच
साधला जाईल मेळ.
खरंतर डोंबार्याचं आयुष्य किती अवघड...
तो ताण, तो काच,
तो सांभाळावा लागणारा तोल
आणि पायांना होणारा जाच
तरी डोंबार्याचं आयुष्य किती सुंदर
त्या येरझार्या, तो अधांतर
ती गती, ती फिरती
आणि कुणाला न दिसणारी स्वतःची अशी मिती ..
हे कुणी सोडले होते
इच्छांचे दीप प्रवाही
गंगेच्या काठांवरती
निःश्वास कुणाचे राही

दुर्दम्य कुणाची स्वप्ने
बांधली कशी धाग्यात
घुटमळे जीव झाडाशी
मन दोलक वर रंगीत

ही रात्र तरंगे अवघी
दिवसाच्या काठावरती
अन मनीषांची नक्षत्रे
मनमळभावर बघ फुलती