Thursday, April 16, 2020

जरा मजा.... आवडते कवी संदीप खरे यांची शतश: क्षमा मागून!

तोऱ्यामधे निघालेला एक घडीधारी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
दिखावाच आहे तसा फार खरे नाही
माफी कशी मागू लेका मला तोंड नाही
सांगायची आहे माझ्या गेल्या शिलेदारा
बुडालेल्या जहाजाची कहाणी तुला

आटपाट नगरात बारा दावेदार
एकएका झटक्यात केले गपगार
माझ्या गादीलाच जेव्हा दिलीस टशन
मोठे होऊ दिले नाही एक मी पुष्कळ
जरी पेरला मी द्वेष जातींचा पुरेसा
तरी कसा झालो रे मी शर्यतीतिल ससा?
राजा उरे मागे पुढे नवीस चालला
असा वर्मी शर आणि असा वार आला
बुडालेल्या जहाजाची कहाणी तुला....

असे केले मातीशी मी सोयरे ईमान
खऱी माय जरी तरी झालो मी मालक
वनवासी हटवले मोडुनिया घरा
हस्तगत केली सारी लुटलेली धरा
सिंचनाची, धरणांची केली ऐशी तैशी
मोजुनिया थकलो रे धनांच्या या राशी
नोटाबंदीमध्ये जरी मोडलाना कणा
महसूल सहकार सोडवेना बाणा
शिक्षणाचा सुरु केला बाजार मी जरी
ऊलट्या पावली आल्या चुकामुका दारी
स्टँप्स झाला, स्पेक्ट्रम झाला दिला राजीनामा
चारा, शिक्षण आदर्शाला दिली जरा हवा
प्रधानमंत्री होण्यासाठी पक्ष केला नवा
क्षण गेले निसटून केला जरी धावा
समाजाच्या माध्यमांनी घात कसा केला
बुडालेल्या जहाजाची कहाणी तुला....

मोठेपण गेले माझे गुज निसटून
घड्याळाचे काटे कसे उलटे फिरून
एक एक जागा गेली अशीच विझून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधून
माझे नाव गेले आणि तुझे पद गेले
राजे गेले सिंह गेले उरले ना चेले

जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून सारे हरवेल का रे?
मोठेपणी सारे तुला आठवेल का रे?
सभेमध्ये जाता जाता उंबरठ्यामध्ये
पक्षासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये?

सांगायची आहे माझ्या गेल्या शिलेदारा
बुडालेल्या जहाजाची कहाणी तुला

- विभावरी
०५/०९/२०१९

No comments:

Post a Comment