Thursday, April 16, 2020


अता सांज समयी जरा दूर होई
मनाभोवतीची दिवा काजळी
अता सांधते ज्योत दिन रात्र दोन्ही
स्वतःच्याच तेजामधे राहुनी

नभाच्या पटावर विखुरल्या न दिसती
अता सांडलेल्या सुट्या तारका
अता तारकापुंज एकात्म दिसती
कुणी ओवल्या मुक्त माला जशा

धरा वायु अग्नी जलाच्या सभोती
दिशांचा पसारा अताशा दिसे
दिवसरात्र चक्रे अखंडीत सत्ये
किनाऱ्यावरूनी अता पाहते

किती विश्वव्यापून आकाशगंगा
तुझी भव्यता नी तुझे शून्य हे
कितीदा फिरावे तरीही चिरंतन
तुझे स्पर्श सानिध्य विश्राम रे

सुखामागुनी दुःख येते भराला
न मी फक्त साक्षी, समर्पीत मी !
अता वाहते अर्घ्य माझे मला मी
तुझ्या राऊळाची शिला न्यस्त मी

तुझ्या मोहपाशी तुझा माग घेता
अमूर्तात अस्तित्व सामावते
दुजाभाव सरता अता फक्त उरुनी
तुझा आरसा अन् प्रतीबिंब मी

सहस्पंदनांचे नवे अर्थ ओठी
दिवसरात्रीच्या सांजकाठावरी
दुरावा नि भेटी अता लांघू जाता
विरहवेदनांच्या व्यथा पांगती

No comments:

Post a Comment