Friday, May 3, 2019


सावरकर – प्रखर बुद्धिवाद आणि उत्कट कवित्वाचा अनोखा मिलाफ!
अट्टल गुन्हेगारांनीही फाशी दया पण काळ्या पाण्याची शिक्षा नको असं असं जिच्याबद्दल सांगितलंय ती शिक्षा त्यांना दिली आहे. अंदमानच्या एका छोट्या कोठडीत ते बंद आहेत. ‘सागरा प्राण तळमळला’ सारखं उच्च उत्कट हातून लिहिलं गेलं आहे. राष्ट्रीय साहित्य निर्मिती आधीही झाली आहे आणि अजूनही खूप व्हायची बाकी आहे. बैलाऐवजी तेलाच्या घाण्याला त्यांना जुंपलं आहे. कोलू फिरता फिरता त्यांचं विचारचक्र चालूच आहे. खूप वर्षांच्या शिक्षेनंतर त्यांना कोणीतरी विचारलं, ‘हे कसं सहन केलंत? अंदमानमध्ये कसे राहिलात?’ त्यावर ते म्हणालेत,’मी अंदमान मध्ये कुठे होतो? मी तर माझ्या ‘कल्पनेत’ होतो.”
मार्सेलिसच्या बोटीवरून निसटण्याच्या प्रयत्नानंतर आपला अमानुष छळ होणार हे गृहीत आहे. स्वतःला धैर्य देण्यासाठी आपली  ‘कल्पना’ आपल्याला पुष्कळ आहे. ‘अनादी मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगतिं असा कणव जन्मला.’ म्हणत त्यांनी त्या छळा पासून स्वतःला संरक्षित करून घेतलंच आहे. आता ही कल्पनाच  सोबत आहे. ही ‘कविता’ च तारक आहे. खरंतर फाशीची शिक्षाच व्हायची! त्यासाठी बरोबरीचे  देशभक्त ज्यांची सुटका व्हायची शक्यता आहे त्यांच्या बरोबर कवितेतून ‘पहिला हफ्ता’ पाठविला गेला आहे. “मानुनि घे साची | जननी गे| मानुनि घे साची | अल्प स्वल्प तरि| सेवा अपुल्या  अर्भक बालांची| ........ अशी तीस कोटी तव सेना | ती आम्हांविना थांबेना | परि करुनी दुष्ट दलदलना | रोविलची स्वकरी | स्वातंत्र्याचा हिमालयावरी झेंडा जरतारी |”   
दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावली आहे. दिवसभराच्या सक्त मजुरीनंतर दोन क्षण बरोबरच्या कैद्याशी संवाद होत आहे. तेवढ्यात संध्याकाळची घंटा झाली आहे. ही तीच परिचित घंटा जिने ‘हाही एक दिवस संपला’ अशी जाणीव करून दिलीय. मन आता बंदिवासातून निघून सूक्ष्म वाटेने स्वप्नांच्या रथाने पृथ्वी, जल, आकाश असे सर्वत्र फिरून येणार आहे. ही सायंकाळची घंटा कवितेतून अशी उतरत आहे.
दिवस संपल्याच्या जाणीवेनंतर आता केवळ एकच सांगाती उरली आहे ती म्हणजे निद्रा!  जी स्वप्नांतून प्रियजनांशी भेटी घडवून आणत आहे. ‘मी मनापासून उपकृत आहे त्यामुळे ‘ये निद्रे ये’ तुझ्या आगमनाची वार्ता माझ्या शिरांमधून जात आहे’.  
कल्पनाच फक्त जागृत आहे. कविताच सोबत आहे. कारागृहाच्या असह्य थंड भिंतींवर सुचातीये, शिक्षा म्हणून जी बेडी पायात घातलीये तिच्यावरही सुचातीये.
“फोडुनी तोडूनी जी जाळावी|
तीच कशी उजळावी |
आपण अपुलीची | रे बेडी?”
जी बेडी फोडून टाकावी वाटतीये तिला साफ स्वच्छ करत बसावं लागतंय. कारण नाही केली तर ती गंजून पायांना अधिकच त्रास देईल, वर निरीक्षकाकडून शिक्षा मिळेल ती वेगळीच. आमच्या इच्छास्वातंत्र्याच्या पायात ही बेडी आणि वर ती स्वच्छ करायचा जुलूम हा विरोधाभास कविमनात धुमसणार नाही तर अजून काय.... तशीच अवस्था ‘कोठडी’ कवितेतून मांडलेली...
खोल्यांची अदलाबदल झाली आहे. कारागृहाच्या काळकोठडीत लोखंडी साखळ्यांनी हात बांधले आहेत. ह्या नव्या कोठडीमध्ये खूप उंच वर एक छोटी खिडकी आहे. महिने, तिथी, वार काही माहित असण्याचं कारण नाहीये. आणि फारा दिवसांनी  खिडकीत एक चंद्रकोर दिसू लागली आहे. आणि तिला बघून लहानपणीची ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ ही कविता आठवत आहे, त्यानिमित्ताने मुक्त बालपणाच्या आठवणींनी मन काहुरलं आहे.
“लोहगजाची जी जाळी| कोठडीस मम तीखाली|
टाकुनि कांबळी मी अपुली| टाकीत अंगा तों दिसली
समोरची नाभिं मज देखा | चमकत चिमुकली शशिलेखा
‘शशिलेखा रे शशिलेखा !| माववू शकुनि न त्या हरिखा”
पुन्हा पुन्हा मी लुटीत सुखा| गाई चांदोबा भागलास का?
स्मृतिचित्रे ती विजेपरी| चमकत उठती परोपरी
चांदोबा चांदोबा, भागलास का|
लिंबूणीच्या झाडाखाली लपलास का?|”
ह्या साखळदंडाची ओझी वाहत कारागृहाच्या भिंतींवर ‘विजनवासी’ कडून ‘कमला’ कोरले गेलेय. ‘विरहोच्छ्वास’, ‘महासागर’ अशी अनेक खंडकाव्ये लिहिली गेली आहेत. कोणी बंदिवान येऊन तक्रार करेल, इथल्या भिंतींवरून ही काव्ये मिटली जातील. पण कोणी ‘कविता’ मिटवू शकणार नाही.
हे १९१३ साल आहे. सध्या कातड्याचे सोन्धणे गुंडाळून कोळसे भरायचं काम माझ्याकडे आहे. एक आनंदाची बातमी पोहोचालीये. कवी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ ला सर्वोकृष्ट काव्यासाठी जगातलं सर्वोच्च नोबेल प्राईझ मिळालं आहे. ह्या आनंदाच्या प्रसंगी कवितेतून त्यांचं अभिनंदन करणं स्फुरलं नाही तर प्रतिभा काय कामाची! भारतमातेनं तिच्या स्वातंत्र्यासाठी यज्ञ चालविला आहे. तिच्या पूजेसाठी अनेक फुलांची आवश्यकता आहे. रवींद्रनाथांच्या रूपातली ही कळी भारतमातेच्या केसांत विलसत आहे. त्याच यज्ञाच्या अग्नीत जळण्यासाठी एक कवी  इथे असताना एका भारतीयाने हा सन्मान मिळविला ही बातमी कृतार्थ करणारी आहे. अभिनंदनास पात्र आहे.
खरोखर रवींद्रनाथांच्या ताकदीचा हा कवी! नोबेल न मिळू दे पण सहाणेवर चंदनासारखा झिजला! प्राणांतिक वेदनेने त्याने अजरामर काव्य रचली. त्याच्या कवितेला चाल लावली म्हणून हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतील नोकरी गमवावी लागली. त्याची खूप महत्त्वाची काव्ये जिथे लिहिली त्या काव्यपंक्ती अंदमानमधून मणी शंकर अय्यरने काढून टाकल्या. पण उत्कटतेचं नातं आत्म्याशी असतं आणि ते तोडलं, फोडलं, जाळलं जाऊ शकत नाही, ते उरतंच.
हे इतके  कोमल, इतके उत्कट, हळवे कवी ! पण  अंदमानमधून सुटल्यावर मागच्या कोणत्याही क्लेशकारी अनुभवांचं प्रतिबिंब उमटवू न देता रत्नागिरीमधून समाजसुधारक सावरकर म्हणून काम करत असताना त्यांनी प्रखरतेनं विज्ञानवाद आणि बुद्धिवाद जपला. धर्माची चिकित्सा करताना आपलं हळवं कवित्व आड येऊ दिलं नाही. पण अंदमानचे दिवस ह्याच हळव्या कवित्वाने निभावले गेले असतील. प्रखर विज्ञानवाद आणि बुद्धिवाद आणि तितकंच टोकाचं हळवं उत्कट कवित्व असा अनोखा मिलाफ असणाऱ्या बुद्धिवादी कवीस आज जयंतीनिमित्त अंतःकरणपूर्वक अभिवादन!  विभावरी बिडवे    

No comments:

Post a Comment