Sunday, July 16, 2017

दूरवरून कुठून
सूर लहरत आले.
तुझ्या पाव्याने माधवा
शब्द निळेशार झाले.

तुझा काटेरी मुकुट
तुझा भरजरी शेला.
कशी लांघली अंतरे
एका धुनेने केशवा.

अशा समुद्रकिनारी
अशी आर्त हाक कृष्णा.
सागराचा का तुकडा
यमुनेने हिरावला?

तुझे पूर्णत्व अपूर्ण
तुज ज्ञात जे अनंता.
तुझ्या अथांगतेसाठी
माझ्या दुःखाचा किनारा.

तुझा सावळासा रंग
साज मोरपीशी त्याला
तुझा शेला जर्दरंगी
पूरी रंगले श्रीरंगा.

कधी काजळ रेखिता
थरारला जेव्हा हात
तुझी प्रतिमा मोहना
सामावली ह्या डोळ्यात.

तुझा रास मनोहारी
तुझा मोह लडिवाळ.
तुझे नसणे निर्गुणा
चिरवेदना सगुण.

माझे चिरंतन दुःख
तुझे नसणे अटळ
तुझ्या मुरलीने कान्हा
झाला विरह वेल्हाळ.

No comments:

Post a Comment