Saturday, August 1, 2015

वावर




जसे उतरून येते चांदणे हळुवार खिडकीशी.
तसा वावर तुझा अलवार दरवळतो मनापाशी.

कसे तनभर पसरते आणि तरिही स्पर्श ना करते.
तुझ्या अस्पर्श अस्तित्वासवे मन जोडते नाते.

कधी तेजस कधी मध्यम कधी तू शांतसा धूसर.
मनाचा खेळ जिवघेणा नि रात्रीचा उगा जागर.

प्रतीक्षा रोज रात्रीला उन्हाच्या काहिलीनंतर.
तसे असणे तुझे आश्वस्त करते रखरखी नंतर.

जसा पाण्यात होतो भास चंद्राने उतरल्याचा.
तसा पुरवून घेते हट्ट मी तू पास असण्याचा.

जरीहे  दूत आभासी तुझ्यामाझ्यात वसलेले.
तुला ते सांगती काही न लिहीलेले न वदलेले.

तुझे असणे जसे की वास्तवाला स्वप्न पडलेले.
तुझ्यावाचून हे आकाश  वाटे चंद्र नसलेले.


वृत्ताचे नाव :  - वियदगंगा
लगावली :    - लगागागा लगागागा लगागागा लगागागा
 मात्रा - २८

No comments:

Post a Comment