Thursday, May 28, 2015

गारुड

तुझ्या  नसण्याचा एका पारड्यात भार आणि
असलेल्या सगळ्या  गोष्टी कशा निमूट उभ्या विनातक्रार!

तू आनंदात सहभागी नाहीस,
दुःखातही नाहीस,
एखाद्या सृजनतेचा आस्वाद घेताना तू नाहीस
आणि निर्मितानाही नाहीस.
वळीवाच्या बेभान पावसात,
सौम्यशांत चांदण्यात,
 मुग्धगूढ थंडीत...
तीन्हीसांजेच्या कातरवेळी आणि
पहाटेच्या आसक्तवेळी.....
निळ्याशार डोहाकाठी आणि
आभाळ कवेत येणार्या पर्वतकड्यावर....
गाजभरल्या समुद्रकाठी आणि
घरामध्ये एखाद्या निरव दुपारी
कुठेच तू नाहीस...
तुझी राहून गेलेली भेट
राहीलेलं हस्तांदोलन, स्पर्श, संभाषण...
तुझ्या साध्या बोलण्यातही  कुठेच नसलेला माझा उल्लेख!
न झालेली नजरानजर,
न घेतलेले हातात हात,
न दिलेली कबुली, आलिंगन, चुंबन
न घेतलेला निरोप आणि तुला कधीच
न येणारी माझी आठवण...

तुझ्या नसण्याचे सर्व संदर्भ
बेलगाम मनावर आरूढ ...
माझ्या खऱ्याखुर्या असण्यावर
तुझ्या नसण्याचेच गारूड..

No comments:

Post a Comment