Saturday, February 28, 2015

पार्क मधली खेळणी बघून अंदाज घेते ती जरासा...
मग फारशी गर्दी नसलेल्या घसरगुंडीवर जाते,
तीही रिकामी व्हायची वाट बघत थांबते
आणि मग धीमेपणाने खेळत राहते.
धक्काबुक्की नाही, आपणच पाहिले जायची घाई नाही.
आणि कोणी केलीच धक्काबुक्की तर
शांतपणे बाजूला होते.
झोक्यावर नंबर यायची वाट बघत राहते.
आणि मिळाला कि आपल्याच नादात
उंच उंच हेलकावे घेत राहते.
कोणी दिसलंच नंबर लावून थांबलेलं तर
आपसूकच झोका थांबवते,
अगदी लहान होती तेंव्हापासून !
मलाच हवा ह्याचा अट्टाहास न करता.
जंगलजीम वगैरे अवघड गोष्टींच्या वाटेला
तिला अज्जिबात जायचं नसतं.
पण मी हट्ट करते म्हणून
चढते अगदी बेताबेताने.
कोणी लहान रडताना दिसलं
कि स्वतःच कावरीबावरी होते.
एवढ्या गलक्यातही तिला ऐकू येतात
बागेतल्या पक्षांचे वेगवेगळे आवाज
आणि दिसत राहतात चिमुरडी फुलपाखरं.
अगदी सूक्ष्म लक्ष असतं तिचं सगळीकडे.
आणि खेळायच्या नादात सुद्धा लक्ष ठेवून असते
मी नजरेआड होत नाहीये ना ह्याकडे.
खेळून दमली कि वाळूमध्ये शोधत राहते शंख आणि शिंपले.
मग मी मुद्दामच जरा नजरेआड होते.
आणि तिच्या ठरलेल्या जागी
मी दोन क्षण जरी नाही दिसले
तरी कावरीबावरी होते टी केवढी !
डोळ्यात साठलेले टप्पोरे थेंब मी दिसल्यावर बरसतातच शेवटी.
आणि मग येऊन बिलगतेच मला.
नेहमीचीच बाग, नेहमीच जाऊन काही माणसंही ओळखीची.
मग तिच्या रडण्यावर मी नाराज होते, खूपच !!!
ओरडतेच तिला ! आणि लेक्चर देत राहते जरा धीट हो म्हणून !
अखेर घरी येताना जिन्याच्या पायऱ्या चढता चढता
मी मनाशीच म्हणते .....
‘कशी अगदी माझं प्रतिबिंब आहे ती .... !’

No comments:

Post a Comment