Saturday, February 28, 2015

जेंव्हा ती ओळखीची असते
तेंव्हा माहित असते तिची दिशा, प्रवास
आणि शेवट,
बहुतेक वेळा कागदाच्या पानावर
कवितेत उतरून .....
पण एखाद्या वेळी ती
पिसाटलेल्या वाऱ्यासारखी
धावत राहते सैरावैरा,
पात्र हरवलेल्या नदीसारखी
वाहत येते अनिर्बंध,
खोल खोल पसरत राहते
सगळ्या अस्तित्वावर आपली मुळे,
वाट फुटेल तिथे उसळत राहते
लाव्ह्यासारखी,
धुमसत राहते रानभर,
एखाद्या ठिणगीने पेटलेल्या वणव्यासारखी....
ती मग कागद भिरकावून लावते क्षणार्धात,
कधी गच्च भिजवून टाकते
निळ्या अक्षरांचा रंग मिसळवून,
जखडून टाकते त्याचं अस्तित्व
आपल्या आवेगाच्या गारुडाने,
कठीण निश्चल करून टाकते
एखादा शुभ्र नितळ कागद...
कधी तो उरतो
केवळ चिमुटभर राखेपुरता....
सगळं काही वांझ करून टाकते
एखादी निनावी अस्वस्थता...

No comments:

Post a Comment