Saturday, February 28, 2015


हातांच्या ह्या घट्ट मिठीला
सोडून जेंव्हा दुडदुडलीस तू
स्वैरपणाने, आनंदाने,
आणिक अवचित ठेच लागता
फिरलीस मागे प्रेमभराने, विश्वासाने.
आणि कधी तू घाबरताना
नव्या जगाला, अंधाराला
कधी कोणत्या गोष्टीमधल्या
चेटकिणीच्या शापाला नि क्रूरपणाला,
त्या त्या वेळी जवळी होते
किंवा होते तुला पुरेशी
बालपणीच्या संघर्षाला
तुला पुरेसा धीर द्यायला,
समर्थपणाने.....
परंतु ही तर थोडीसुद्धा
नाही तयारी जगतानाच्या
भविष्यातल्या आव्हानांची,
आला जर का एखादा क्षण
खऱ्याखुरया त्या अंधाराचा
आणि भेटली दुष्ट माणसे
नव्या जगातील खरीखुरी जर,
अनपेक्षितशी ठेच लागता
सावर बाळा आपली आपण.
आणि पूर्णतः कोसळून तू
जाण्याआधी आठव थोडी
आमची शिकवण,
थोडी मागे येऊन, पाहून.
आणि हेही आठव थोडे
असू तेथुनी आशिष आमचे
असतील कायम तुझ्या सभोती
तुझी सावली होऊन.

No comments:

Post a Comment