Thursday, April 16, 2020

टायटॅनिक आता पूर्णतः एका बाजूला कललंय
बरोब्बर मध्यावर तुटण्याच्या आधीपर्यंत
व्हायोलीनचं एक पथक आजूबाजूच्या तांडवाकडे दुर्लक्ष करून
बघ एक मंद धून वाजवत आहे.
नाझींच्या Concentration Camp मध्ये गीडोला
आपल्या बायको आणि मुलासह आणलं गेलंय ....
आणि तिथे तो आपल्या लहानग्याला कळू देत नाहीय प्रसंगाचं गांभीर्य
सांगितलंय त्यानं आपण एका खेळात सहभागी झालो आहोत
आणि देतोय हालअपेष्टांना सहन करण्याची ताकद
खेळत जिंकल्यावर एक रणगाडा बक्षीस मिळणार आहे त्यांना.
कुणी एक जर्मन शिंडलर व्यक्ती
कित्येकांना अशीच कारखान्यात कामाला दाखवून एक लिस्ट करतेय
आणि त्याद्वारे सुमारे हजार एक ज्यूंना वाचवतेय.
आजही रस्त्यावरचा भिकारी टाळ्या वाजवतोय.
आणि अजून एक म्हातारी
तिच्या प्लास्टिकच्या खोपटाबाहेर बसून थाळी वाजवतेय.
अशा वेळेस मंदिर बंद झालं तरी
कटीवरचे हात खाली घेऊन विटेवरून खाली कसा उतरू रकुमाई!
ना कृष्णाने आपली बासरी खाली ठेवली आहे,
ना हनुमान अवघडलेली स्थिती सोडून थोडा मोकळा झाला आहे,
लक्ष्मणही कुठे गेलाय उर्मिलेला भेटायला थोडा वेळ मिळाला म्हणून....
बंद दाराआड आपण असेच आहोत कमरेवर हात ठेवून
हे माहित आहे त्यांना
आणि म्हणूनच उभे आहेत ते आजही....
मंदिरं उघडी... मंदिरं बंद....
मंदिरं येतील.. मंदिरं जातील...
पण पुन्हा पुन्हा उघडली जातील...
पुन्हा पुन्हा बांधली जातील....
खरंतर कुठलेच दरवाजे नाहीत
त्यांच्यात आणि आपल्यात ..
श्रद्धेचे हे धागे त्या पलीकडे दरवाजापार
म्हणूनच चांगल्यांचा चांगल्यावरचा विश्वास आहे
तोपर्यंत कमरेवरचे हात खाली नाही घेता येणार...
विटेवरून खाली नाही उतरता येणार....
- विभावरी

No comments:

Post a Comment