Friday, February 27, 2015

कितीदा मना बांध मी घालते अन कितीदा मनानेच नाकारते.
जरी हट्ट केले मनाने नव्याने तरीही नव्याने किती भांडते.

कधी वाटते की जुने तेच ल्यावे, कधी मुक्त वारे बरे वाटते.
कधी वाटते खोल ज्ञेयात जावे कधी ती भरारी हवी वाटते.

"असे जन्म ज्याचा खरा वाहणे हा कसे सावरावे तयाला तरी
हजारो युगांची खरी संस्कृती की मनाचीच आदीम इच्छा खरी."

जरी द्वंद्व चाले असेही तसेही कशी आकळे पावलांना दिशा?
समेटून घेती पिसाऱ्यात साऱ्या दिशा ना परि मोहवीती जशा!

न मोहीत होता कशी चालती राजमार्गेच ती हे मनी जाणते.
समाजात आहे अस्तित्व माझे म्हणुनीच का लोभ मी टाळते.

परंतू तरी कोण एकांत समयी पहाऱ्यास असतो उभा ठाकुनी.
कसा सूत्रधारासवे तो विचारस मार्गस्थ करितो पन्हाळीतुनी.

समाजास भिउनि सदोदीत मीही जरी मोहमाया न नाकारिते.
तुझा अंश आत्म्यामधूनी वसे जो प्रचीती कितीदा तशी लाभते.

No comments:

Post a Comment