Tuesday, July 10, 2018

तू म्हणालास म्हणून ह्या कोऱ्या कागदावर
एक भलं मोठं शून्य काढलं
इतकं मोठं की त्याच्या पोकळीत
काढता येईल एखादं सुंदर चित्र
असं तर शून्यातूनच निर्माण होतं म्हणतात
एक संपूर्ण विश्व

मग तू म्हणालास, खोडून टाक
अन् शून्य थोडं लहान कर
तर तसंही करून बघितलं
आणि बाजूने रेखाटत बसले
एक न संपणारी भली मोठी रांगोळी

मग तू म्हणालास हेही नको
एक ठिपका दे फक्त
तर त्या ठिपक्यातूनही निघाल्या
अगणित रेषा
एकमेकांना छेदणाऱ्या

आणि एक दिवस तू म्हणालास
हा कागदंच नको
तर वो भी सही!
घे - हे त्याचे तुकडे, ही जळती काडी
जन्मभराच्या सदीच्छा आणि चिमुटभर राख
हा फकीराचा पंखा, ही मी मारली फुंकर
बाहीवरची थोडी झटक, आणि आयुष्य उजळवून टाक!
तळाशी द्वारका, गोकूळ काठी
मनाचा नाखवा तारून असतो

कुण्या श्रापीत जन्मांवर निपजला
युगंधर आठवा जागून असतो

कधी काळा कधी तो राजहंसी
मनाचा 'पारवा' सांधून असतो

रणाचे शंख घुमताना पसरतो
मुरलिधर शांतवा भारून असतो

आत्ता आत्ताशी तर कुठे....

आत्ता आत्ताशी तर कुठे जरा शांत बसले होते...
जरासे प्रश्न संपले होते,
आता इतक्यातच येईल,
आली की बूट, मोजे भिरकावून देईल,
हेअरबँड एकीकडे, सॅक दुसरीकडे
माझं लक्ष भलतीकडेच भिरकावलेल्या टिफिन बॅगकडे,
डबा संपवला असेल ना...
प्रश्न सुरु..... तिचे वेगळे!
पण आली की तितक्याच वेगाने सुरु होतील
शाळेतल्या गोष्टी,
“हा पेपर, तो पेपर, ऑफ पिरिअड,
ही कॉम्पिटीशन, टीचर बदल, नोटीस इ. इ.
मग ह्यानं ना तसं तसं केलं,
मी त्याच्यासाठी असं असं केलं तरी....
ती ना थांबलीच नाही माझ्यासाठी,
मी थांबले होते तरी...
मला अमुक अमुक नकोय
आणि तमुक तमुक पण नकोय....
सरांनी ऐकूनच घेतलं नाही माझं,
मला उत्तर माहित होतं तरी...
मला ना स्पोर्ट्समध्ये पण जायचंय
आणि डान्समध्ये पण!
मी काहीच केलं नाही
तरी टीचर ओरडल्या मला.
अमुक अमुकचं असं झालं
तर आता तमुक तमुकचं मी काय करू?”
.....................
आता तिला काय उत्तर द्यावीत....

आत्ता आत्ताशी तर कुठे जरा शांत बसले होते...
जरासे प्रश्न संपले होते...

माय माझे बरं झालं बोललीस.

आम्हाला तुझ्यासारखे लोक लागतात... अजूनही लागतात.

इतिहास गवाह है वगैरे वगैरे...

पण आम्ही फार नाही शिकलो इतिहासाकडून...

तुझ्यासारखे जेव्हा जेव्हा म्हणतात ना ‘मी चालले सोडून! मला नको ह्यातलं काहीच! हे विस्कटून टाकायला पाहिजे, ‘फेकून द्यायला पाहिजे, उचकटून टाकायला पाहिजे, मोडून टाकायला पाहिजे.’

तेव्हा कुठे आम्ही म्हणतो, ‘मग असं असं करूया खरंतर. फांद्या तोडूया, आकार देऊया, त्याचं हे हे चांगलं आहे पण हे हे काढून टाकूया.’

आम्हाला तुझ्यासारखे लोक लागतात... अजूनही लागतात.

इतिहास गवाह है वगैरे वगैरे...

पण आम्ही फार नाही शिकलो इतिहासाकडून....
विचार फिरतात चक्रासारखे
होत राहतात त्यांचे पुनर्जन्म..
ना मिळते त्यांना सद्गती,
ना वसवतात ते एखादं गोकुळ
ते फक्त भटके की बेवारस
की आणिक काही?
अशा अनौरस भावनांना दिलेलं पालकत्व
म्हणजे तर कविता नाही?
तू विचारलंस, श्रेयस बोलू की प्रेयस?
मी म्हटलं खरं बोल..
मग तू बोलत राहीलास.
शब्द - जे तुझ्या तोंडून बाहेर पडले ...
असेही तसेही मला प्रेयसच होते ....
मी प्रिय मानून घेतले
माझ्यासाठी तेच हितकारक होतं...
रात्र पटाच्या चौथ्या प्रहरी
भरून आहे गहन चांदणे
धूसर, उत्कट, अद्भूताचे
अस्तित्वावर निर्मम वेढे

अजून जीवन जागे नाही
अजून कोकीळ निजले रान
पहाटवेळा, चांदणस्वप्ने
चांदणनाते काही काळ

अथांग सागर तोलुन आहे
दहा दिशांतून अंधाराला
डोहावरती चंद्र अभासी
आधाराला अवघी माया

जितके तो सामावुन घेई
तितका अथांग आणि महान
रेतीवर ओसरत्या लाटा
लिहून गेल्या नक्षी नाव

जितके अंतर जितकी खोली
तितके आहे गंभीर पाणी
काठांवरती सुख दुःखांची
चमचम खळखळ लाटा गाणी
एक कासव फिरतं
गजबजलेल्या शहरामधून
ते बघतं शहराची गती, अपघात
अंगावर झेलतं ऊन, वारं, पाऊस
सहन करतं कर्णकर्कश्श हॉर्न,
धक्काबुक्की, रेटारेटी
कुठूनतरी कुठेतरी
पोहचायची धडपड,
मग आणखीनच धीम्या गतीनं
ते जातं
शहरालगतच्या टेकडीवर
दूरवरून अधिकच दिसते त्याला
ती धावपळ, मोडतोड.
मग त्याला आठवते
आपली सोशिक झालेली
कडक पाठ..
ते आक्रसून घेतं
आपले हात पाय तोंड.
पाठीवर असं घर घेऊन
कासव जगू शकतं
शे दोनशे चारशे वर्षही!
शहर मोडत विस्कटत
हसत राहतं कासवाला
त्याच्या धीमेपणाला आणि
पाठीवरच्या ओझ्याला..
कासव मात्र पुरून उरतं
गतीला, अपघाताला ..
त्याच्यासमोर मांडू नयेत गाऱ्हाणी, तक्रारी
ना उगाळावा दुःखांचा पाढा
ना विचारवं कुठल्याशा उःशापासाठी
तो दारी यायची वाट बघू नये
भांडू बिंडू नये, मागू नये काहीही
तो संवादाच्या पलीकडे आहे.
त्याला नकोय पंचपक्वान्नाचं ताट
किंवा अगदी मुठभर पोहेही
त्याचं फक्त दर्शन घ्यावं
क्षणभर डोळे मिटावेत
तादाम्य पावावं
एकमेकांत विलीन व्हावं..
मग आत्मन् पूर्ण करतात
हवं नकोचे सगळे व्यवहार
शेवटी भांडून बिंडूनही
फक्त हेच तर हवं असतं.
उभा ठाकला ग्रीष्म दारी पुन्हा अन
पुन्हा लख्ख हळदी उन्हाने झळाळे
तुझे स्पर्श संदर्भ आले, बहरले
पुन्हा दुःख माझे अमलताश झाले

.

कुण्या भावनांच्या अहंमन्य ज्वाळा
सुखाने फुले झाड आरक्त का हे?
तरी सांज होता निराशेत कुठल्या
सडे आसवांचे तळाशी पहुडले?

.

अहंता न काही, मनीषा न कुठली
न सन्मूूख होतो बहर भावनांचा
जसे जर्द रंगातले घोस माथी
अमलताश सजतो अधोमुख फुलांचा
शब्द गीतासार
शब्द हळुवार
शब्द तलवार
रणांगणी

शब्द ऋतुचक्र
शब्द ऊन धुके
शब्द ओले सुके
अव्याहत

शब्दांचेच घाव
शब्दांची जखम
शब्दांचा मलम
देहव्यापी

शब्द विपश्यना
शब्द सोसलेले
शब्द थांबलेले
समाधीस्थ

शब्द कृतिशील
शब्द मौनरंग
शब्द कर्मयोग
होवो आता
मी तमाच्या आर्ततेचे गीत गावे
तू उशाला चांदणी आकाश व्हावे

मी वहावे शब्द अश्रूंचे तरूशी
मौनही तेव्हा तुझे मग मोहरावे

व्यक्त झाले गीत ते वाहून गेले
घातला जो बांध त्याचे प्रेम व्हावे

हेलकावे वादळी साहून अंती
दीपस्तंभाने तुझ्याही सावरावे

व्यक्त केल्या त्या मनाच्या क्षुद्र वांछा
ठेवले तू मर्म मागे प्रेमभावे

बेट ना पाचूप्रमाणे ना किनारे
फक्त काही शिंपले मोती उरावे

श्वास श्वासातून जाताना अखेरी
नाव ओठातून यावे, शांतवावे!
गारगोटीचं सफेद खरखरीत चूर्ण,

त्यातून नवीन असं काहीच निर्माण होत नाही!

ते थंड, निस्तब्ध, निर्जीव

एखाद्या कफनासारखं....

मात्र कधीतरी चिमटीत पकडून

त्याला द्यायचे पानांफुलांचे आकार

आणि भरायचे रंग रंजनातून.

तेही क्षणभंगुरच !

मिळायचेच मातीत कधीतरी!

शाश्वत कुठे काय?

सृजनतेचा खोटा आनंद देणारी

ही खोट्या पानाफुलांची रांगोळी.

ही नक्की रांगोळी आहे

की तुझ्याविषयीची कविता?
वनगर्भ बरसल्या धारा
काळोख्या सर्जनरात्री
मनप्रकाश गुणगुणताना
कित्येक तेवल्या ज्योती

घनगर्द वाहिल्या ओळी
कवितेच्या रानोमाळी
जर्दजांभळ्या अर्थछटा
मोहरल्या पानोपानी

ह्या गच्च आषाढि रात्री
धारांच्या अविरत साक्षी
शिशीरात साठल्या तरिही
शब्दांच्या कोरड राशी

ही कवचकुंडले कुठली
शब्दांतून करिती मुक्त
तू उभा विमुख दे दान
मी याचक पाऊससूक्त!
हमी कसलीच ना मिळते तुझ्या दारात आयुष्या
वळिव हमखास कोसळतो नि मोसम कोरडा जातो
अविचल साजण

घनघन वाजत वारिद धावत
मौक्तिक वर्षत मोसम ये
अविरत कोसळ गुंजत धुंदित
मुक्त खळाळत पाउस ये

भिजुभिजु बीज तरारत अंकुर
वर्धित हो धरतीवरती
हिरवळ दाटत पानफुलांसह
प्रकृति रंग नवे भरती

नभचर हर्षित गात निनादत
आश्रय शोधित ये फिरुनी
मनहर पंख पिसारत नाचत
नीलमनर्तक ये दिसुनी

गगनतलावर तांडव चालत
वीज लकाकत नृत्य करी
बरसत संततधार अनावर
आतुर भेटत प्रेममयी

नभ-वसुधा बघ! मीलन -उत्सुक
पर्व करी मज मेहप्रिया
अविचल साजण! या समयी मग
अंतर हे कसले सखया
रात्रतळ्याच्या पाणवठ्यावर
मृगस्वप्नांचा हलका वावर
किरणशरांच्या घावानंतर
नक्षत्राने द्यावे उत्तर

नक्षत्राने द्यावे उत्तर
मुरलिरवाच्या द्वंद्वाखातर
राधा राधा खोल तळाशी
बाकी सारे पैलतीरावर

बाकी सारे पैलतीरावर
नांगरली पहाटेची नाव
चालू असते यथेच्छ ये जा
जाणीव फुलवी चांदणगाव

जाणीव फुलवी चांदणगाव
क्षणभर बसता मग काठावर
गजबज नुरते ऐलतीरावर
रात्रतळ्याच्या पाणवठ्यावर
रात्रपटाच्या काळोखावर
कुणी पिंजले कापुसमेघा
कुठला पटकर गुंफत आहे
चंद्ररुपेरी घेऊन धागा

हातमाग का विणतो आहे
अवघे जाळे नक्षत्रांचे?
कविता कशिदा करते आहे;
धागे जरदोसी शब्दांचे
दुःख हे गर्भार आहे रिक्त नाही
वाळल्या फांदीस ये उमलून काही

तू हिमातिल पावसाळा अन उन्हाळा
मी नदी होऊन गेले बारमाही

वाहिले अश्रू अता मन शांत हलके
आणि कविता होत गेली भारवाही

भोवरे पाण्यात होते फार तरिही
वेदना वाहून गेली भर प्रवाही

दशदिशांना दान मागत सौख्य फिरले
तख्त होते माणकांचे दुःख शाही