Sunday, July 16, 2017

दूरवरून कुठून
सूर लहरत आले.
तुझ्या पाव्याने माधवा
शब्द निळेशार झाले.

तुझा काटेरी मुकुट
तुझा भरजरी शेला.
कशी लांघली अंतरे
एका धुनेने केशवा.

अशा समुद्रकिनारी
अशी आर्त हाक कृष्णा.
सागराचा का तुकडा
यमुनेने हिरावला?

तुझे पूर्णत्व अपूर्ण
तुज ज्ञात जे अनंता.
तुझ्या अथांगतेसाठी
माझ्या दुःखाचा किनारा.

तुझा सावळासा रंग
साज मोरपीशी त्याला
तुझा शेला जर्दरंगी
पूरी रंगले श्रीरंगा.

कधी काजळ रेखिता
थरारला जेव्हा हात
तुझी प्रतिमा मोहना
सामावली ह्या डोळ्यात.

तुझा रास मनोहारी
तुझा मोह लडिवाळ.
तुझे नसणे निर्गुणा
चिरवेदना सगुण.

माझे चिरंतन दुःख
तुझे नसणे अटळ
तुझ्या मुरलीने कान्हा
झाला विरह वेल्हाळ.




कधी सांजवेळी दिवे लागणीला
उदासी अशी खोल दाटून ये
क्षितीजावरी रंग मिसळून गहिरा
तुझी याद हलकेच परतून ये!
तुझी आठवण आज परतून ये!

नभाच्या दिशा कोण लांघून येई
युगांच्या किनारी कुणी  थांबले
खुली सर्व दारे जरी ठेवलेली
तरी चौकटीशी पुन्हा बांधले

रिकाम्याच हातात ओंजळ रिकामी
न आत्मीय काही दिले घेतले
तरी वेदना रंग देऊन गेली
न समृद्ध काही जरी तू दिले

न आदी नि अंतास ना पोचते जी
तयाचे प्रयोजन कसे आकळे
उदासीस ह्या कोणते नाव द्यावे
किती ठाव घ्यावा मला ना कळे

तमाच्या तळाशी हळूवार जेव्हा
फुले आसवांची तुला वाहते
अकस्मात बहरून ये चांदणे जे
तुला ठाव नाही मला गवसते

न अनुबंध कुठले न नाते तरीही 

दुवे कोणते साथ माझ्या तुझ्या?
जशी सांजसंध्या दिवस रात्र सांधे
गहीरी उदासी मधे आपल्या!
वाऱ्यावर लहरत नाही
आकाशी थिरकत नाही.

उन्मळून मी ना पडते
पण तितकेे उठवत नाही.

मी किति मोकळीक देते
आताशा हरवत नाही.

घट्ट पकडला पाऊस
तरीही बहरत नाही.

मी आमंत्रण ना देते
अन तेही फिरकत नाही.
कधी संथ चालून पायी निघाले
प्रपातापरि सोडला उंच माथा
कुठे पंख आवेग घेऊन आले
नि झेपावले तेवता दीप बघता

कुठे अष्टमी चांदणे सांडताना
पहाटेस प्राजक्त गंधाळताना
कधी सांजवेळी क्षितीजाकिनारी
विसरले प्रहरही तुला शोधताना

महामार्ग काही कुठे आडवळणे
नि काट्याकुट्यातील पाऊलवाटा
कधी चढ उतरणी सरळमार्ग थोडे
कधी राजरस्ते कधी चोरवाटा

अशी येत गेले कधीही कुठेही
जशी वादळे धूळ वाऱ्यास वाही
किती धावले पण अखेरी थबकले
तुझ्या चौकटी लांघता येत नाही
कुंद कुंद हर प्रहर
पुन्हा ते जुने जहर
लांबलेल्या सावल्या
पुन्हा पुन्हा सुने शहर
घट्ट मुळे रोवून उभ्या असलेल्या एका झाडापासून
कल्पांतापर्यंत बांधलेली एक दोरी,
अगदी स्वप्नांच्या प्रदेशापर्यंत.
असा ताण की अजून थोडी आवळली
तर तुटून जाईल
आणि सैल सोडली तर
निसटून जाईल पकड.
दोन्ही आवश्यक -
जिवंर रहाण्यासाठी.
कल्पनेकडे निघताना
विसरून जायचं दोरीचं
वास्तवाशी मूळ,
पुन्हा परतताना करायची
स्वप्नरंजनाकडे पाठ.
चुकूनही ढळू द्यायचा नाही तोल
की झुकू द्यायचं नाही पारडं
कोणत्याच एका बाजूला.
रेंगाळायचही नाही कुठेच
कारण गती असेल तरच
साधला जाईल मेळ.
खरंतर डोंबार्याचं आयुष्य किती अवघड...
तो ताण, तो काच,
तो सांभाळावा लागणारा तोल
आणि पायांना होणारा जाच
तरी डोंबार्याचं आयुष्य किती सुंदर
त्या येरझार्या, तो अधांतर
ती गती, ती फिरती
आणि कुणाला न दिसणारी स्वतःची अशी मिती..

दीप


हे कुणी सोडले होते
इच्छांचे दीप प्रवाही
गंगेच्या काठांवरती
निःश्वास कुणाचे राही

दुर्दम्य कुणाची स्वप्ने
बांधली कशी धाग्यात
घुटमळे जीव झाडाशी
मन दोलक वर रंगीत

ही रात्र तरंगे अवघी
दिवसाच्या काठावरती
अन मनीषांची नक्षत्रे
मनमळभावर बघ फुलती 

रेतीवर नाव कुणाचे
लाटांनी पुसले नाही
शिंपले कधीचे देती
मोत्यांची  उरली ग्वाही
अवघ्या तनामनाची एकतारी
सूरात लावून आले
तरी छेडली नाहीस तार
की उमटला नाही झंकार...

अवघ्या तनमनाचं वादळ घेऊन
बरस बरस बरसले
तरी कोरडेपण निभावलंस
आतून बाहेरून...

अवघ्या मनाचा देह करून
अशी समोर उभी राहीले
नि साधा हातही घेतला नाहीस हातात ..

अस्पर्श मी, अस्पर्श तू...
अस्पर्श मी की अस्पर्श तू...
सुखेनैव तो रणांगणावर
अपुल्या आयुष्याची वणवण

सुरक्षीतशा भिंतींमागे
लिहीली जाते अवघी तणतण

डोक्याला तो झाला कायम
दिसली नाही कधीच कणकण

---------------------------------------------------
---------------------------------------------------

जखम वाहिली इतकी भळभळ
केली गेली केवळ हळहळ

विस्फोटाच्या कवितेवरती
आधि वाहवा नंतर कळकळ

फांदीवरुनी गेले पिल्लू
पानांची थांबेना सळसळ
राधेस लागली आस, करूनी साज, किनारी आली
पश्चिमा किती रंगात, रवीतेजात, माखुनी गेली

पाखरे फिरुन रानात, पुन्हा घरट्यात, परतुनी आली
दशदिशा अशा निस्तब्ध, तपिशही दग्ध, भराला आली

शांतवे नदीचा घाट,किनारी लाट, संथ कृष्णाई
परतल्या सख्या गवळणी, वाट पाहुनी, निघाल्या गायी

होऊन सांजसावळी, दीप राऊळी, अधिरशी झाली
निस्तब्ध जाहले श्वास,चरण दारास, अजुनही नाही

शोधण्या जीव डोळ्यात, प्राण कानात, नसे चाहुलही
नक्षत्र उभी गगनात, सरेना वाट, न ये मनमोही

मंदिरी मनाच्या भक्त, भाव संपृक्त, मुरलिधर यावा
श्रद्धेस सार्थ विश्वास, सफल हो ध्यास, ऐकू ये पावा
आजकाल ...
पांढऱ्या केसांची
करता येत नाही मोजदाद
डोळ्यांच्या कडेला न हसताही दिसते
एखादी एखादी लकेर
जिभेपेक्षा घड्याळाकडे द्यावं लागतं लक्ष
खाता पिताना,
डोक्यावरच्या उन्हाने डोकं चढतं लगेच...
पण एक बरंय
काही ऐकलंच तर लगेच झिरपत नाही मनात
बघून खातरजमा करेपर्यंत
आणि झिरपलच तर पाझरत नाही डोळ्यांवाटे
निदान चारचौघात
आणि बघितलेलं सगळंच
वाटत नाही खरं नीट ऐकल्याशिवाय
आणि समजा वाटलंच एखादे वेळेस
तर येत नाही ओठांवर
नीट ऐकून खात्री होईपर्यंत...
आजकाल ...!!
Beyond the limits of happiness
in the region of enrichment
broadening my cognizance sphere
you have been meeting me dear ..
But now I find,
the signs are wrecked..
the roads are broken ,
There is no way ahead
footsteps need to take U turn
Its just that all the feathers of my flattering wings
I think are remained there scattered
May be you would come across few and find
I don’t know is it a burden or is it an yield?
What would you do? Rather would you mind ? !
उन, पाऊस, चांदणं, पडल्यावर
अंधार, संधीप्रकाश, इंद्रधनुष्य पडल्यावर
फुलांचा सडा, अळवावरचा थेंब,
झाडावरून पान पडल्यावर
धुकं, दव, गारा, वीजा पडल्यावर,
ठेचकाळून तोंडावर पडल्यावर
किंवा अडखळून हातातून पुस्तक पडल्यावर
अगदी वारा, पडदा, गाणं किंवा
कुणाचं भाषणही पडल्यावर .......

डोळा लागल्यावर
ध्यान लागल्यावर
भर उन्हात तहान लागल्यावर
एखादा पदार्थ गोड लागल्यावर
चालता चालता ठेच लागल्यावर
रेडिओवर अमुक अमुक गाणं लागल्यावर
रस्त्यावर तमुक तमुक गाव लागल्यावर
हसता हसता ढास लागल्यावर
गुदमरून श्वास लागल्यावर...
वाय शेपचा रस्ता लागल्यावर
यु टर्नचे बोर्ड लागल्यावर
बघता बघता हिरव्याचा लाल सिग्नल लागल्यावर
थांबताना गाडीचा करकचून ब्रेक लागल्यावर....

कधीही कुठेही, केव्हाही येते
अशीही, तशीही, कितीही येते...
कमाल तापमान,
किमान थंडी,
अमूक इंच पाऊस,
नवे रस्ते, पूल.. पूर ..
भविष्य,
सांस्कृतिक कार्यक्रम,
सेलिब्रेटीज,
झालंच तर अपघात,
घातपात... !!
सकाळचा पेपर -
अन् जिथे तिथे तुझं शहर!
सकाळ म्हणजे आठवणींचा
पहिला वहिला कोरा प्रहर!


रस्ता तुझा मंजिलही तू
तू स्वप्नही तू जागही
अस्ति तुझी जग व्यापुनि
भेटी दुराव्या पार जी

हाती असो माती कधी
विखरो नभी वा तारका
तू कल्पना तू सत्यता
अवकाश तू, तु वसुंधरा

सौंदर्य जे आहे इथे
तुझियामुळे आहे जणू
तू अंतही आरंभ तू
कारण ही तू सीमाही तू

अनुवाद - विभावरी बिडवे
मूळ कविता - अमृता प्रीतम

"तुम्हारा अस्तित्व हर फासले से बेनियाज है |
तुम्हारा अस्तित्व राह भी है, मंजिल भी
हकीकत की तरह,
धरती पर एक जगह पर भी खड़ा है,
और कल्पना की तरह,
हर जगह हर पसारे में भी...
इस दुनियामें
मुझे जहां भी जो कुछ अच्छा लग रहा है,
यह सब तुम्हारे अस्तित्व के कारण है...
तुम्हारा अस्तित्व इसकी पृष्ठभूमि है,
तुम्हारा अस्तित्व इसका क्षितिज है..."

दुःख उगाळायचं सहाणेवर
आणि टिळा लावून द्यायचा
ज्याने दिलं त्याच्या भाळावर.
उदबत्तीच्या वलयाबरोबर
मग विरून जाते इडापिडा
कविता होऊन जाते प्रार्थना!
उत्कटतेचा रंग कुठला असतो?
काळा-पांढरा? गुलाबी की लाल?
नाही माहित!
किती गहिरा असतो तेही नाही माहित.
माहित नाही त्याचा स्पर्श किती तलम,
रेशीम की वुल!?
आणि ध्वनी किती आर्त.... खर्ज? मधाळ?
आणि गंध? रातराणी की सायली?!
एक मात्र नक्की!
उत्कटतेची चव नेहमीच एकसारखी असते ....
खारट!!!
किती आभाळ भरलेले, किती दाटून आलेले
कसे गेले कुण्या गावी, न दे कुठलेच सांगावे
तुझी वचने तुझी भाषा तुझ्या शब्दात नसलेले
मला कळले! तुला कळले? न लिहिलेले न वदलेले..
वाळवंटातल्या दिलासादायक मृगजळासारखं स्वप्नील,
डोंगरमाथ्यावरच्या झाडासारखं निश्चल,
मिडास राजाच्या हातांसारखं अपूर्व,
उंच मनोऱ्यातल्या खिडकीमधल्या रपुंझेलसारखं अद्वितीय,
उत्तरेच्या शाश्वत तार्यासारखं अढळ,
तमा न बाळगता चक्रव्युहात शिरणाऱ्या अभिमन्यूसारखं निडर
शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखं महान,
यमुनेचा घाट सोडून
द्वारकेच्या समुद्रकिनाऱ्यावर
ऐकू येणाऱ्या मुरलीइतकं आर्त
आणि संध्याकाळी सुचलेल्या
विरहव्याकूळ कवितेइतकं निस्सीम...
एकटेपण चांगलं असतं...

************** पुन्हा भेटलो तर **************



पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
तेच ते नॉब्स फिरवून फिरवून रुळलेले
अंधारातले आकडे कानाकडून शोधलेले
किती खरखर किती घरघर, घसा कोरड, जीव आतुर
बुद्धी, डोळे, कान, मन एकमेकांना फितूर
पुन्हा एकदा झुमरीतलैय्याहून तिच फर्माईश होईल
पुन्हा एकदा लतादीदी कभी कभी गाईल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
**************
एकशे एक, नाईन्टी नाईन, नाईन्टी थ्री point थ्री
ही ऑफर, ती ऑफर, ह्याच्यावर ते फ्री
कसला विचार करतोएस रामैय्या? घराला आणि छताला..
अय्या टारझन तू बाळाराम मार्केटमध्ये कसा?
पुन्हा एकदा लुंकडचा मान्सून सेल लागेल
पुण्यामधली पावसाने मारलेली दडी स्मरेल
एफएमवरती चांदनीतलं ‘फिर वो झडी’ वाजेल
मनात, देहात, गात्रात पाउस कोसळ कोसळ कोसळेल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
**************
खरखर खरखर घरघर घरघर
मेलबर्न, इडनगार्डन, वानखेडे, लॉर्डस्,
गावस्कर, रवी शास्त्री लाइव्ह कमेंट्री फास्ट
सेहेवाग माही, कुंबळे कोहली! किती वाद - काय राहिलं!
क्रिकेट, टेनिस, रग्बी, फूटबॉल कुणी जिंकलं कुणी हरलं
हिरव्यागार लॉनवरती पुन्हा शाहरुख येईल
पुन्हा एकदा अनकही अनसुनी ‘मितवा’ ओळ गाईल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.