Sunday, July 16, 2017

दीप


हे कुणी सोडले होते
इच्छांचे दीप प्रवाही
गंगेच्या काठांवरती
निःश्वास कुणाचे राही

दुर्दम्य कुणाची स्वप्ने
बांधली कशी धाग्यात
घुटमळे जीव झाडाशी
मन दोलक वर रंगीत

ही रात्र तरंगे अवघी
दिवसाच्या काठावरती
अन मनीषांची नक्षत्रे
मनमळभावर बघ फुलती 

रेतीवर नाव कुणाचे
लाटांनी पुसले नाही
शिंपले कधीचे देती
मोत्यांची  उरली ग्वाही

No comments:

Post a Comment