Sunday, July 16, 2017





कधी सांजवेळी दिवे लागणीला
उदासी अशी खोल दाटून ये
क्षितीजावरी रंग मिसळून गहिरा
तुझी याद हलकेच परतून ये!
तुझी आठवण आज परतून ये!

नभाच्या दिशा कोण लांघून येई
युगांच्या किनारी कुणी  थांबले
खुली सर्व दारे जरी ठेवलेली
तरी चौकटीशी पुन्हा बांधले

रिकाम्याच हातात ओंजळ रिकामी
न आत्मीय काही दिले घेतले
तरी वेदना रंग देऊन गेली
न समृद्ध काही जरी तू दिले

न आदी नि अंतास ना पोचते जी
तयाचे प्रयोजन कसे आकळे
उदासीस ह्या कोणते नाव द्यावे
किती ठाव घ्यावा मला ना कळे

तमाच्या तळाशी हळूवार जेव्हा
फुले आसवांची तुला वाहते
अकस्मात बहरून ये चांदणे जे
तुला ठाव नाही मला गवसते

न अनुबंध कुठले न नाते तरीही 

दुवे कोणते साथ माझ्या तुझ्या?
जशी सांजसंध्या दिवस रात्र सांधे
गहीरी उदासी मधे आपल्या!

No comments:

Post a Comment