Thursday, April 16, 2020


हा व्यवधानांचा व्याप
तू जलधारी उःशाप
उजळावी चमकुन विजला
तू कधी स्मरावे मजला

भेटींचे निष्ठुर अंतर
दे मृद्गंधीसा दरवळ
मन होउन जावे सुजला
तू कधी स्मरावे मजला

अनंत वेळा अनंत जागी
अवचित दर्शन देउन जाशी
अनंत रुपांमध्ये भेटशी
अनंत नावे घेउन येशी

किती ठिकाणी तुला शोधिते
आणिक करते अखंड धावा
तरी नेमक्या गोंगाटातच
ऐकू येतो सुरेल पावा

किती शिंपले उचलुन घ्यावे
कधी व्हायच्या मौक्तिक माला
अथांग खनिजांमध्ये कोणता
गवसून हाती परिस यावा

नित्याने जो वेचत असता
सुवर्ण होतो एखादा कण
नकळत हातातून निसटतो
दगडांमध्ये परीसक्षण

किती वहावे अर्घ्य तुला मी
की शोधावे स्वत: स्वतःला
पंचभूतांसह मिसळून जावे
द्वैत नुरावे तीन्हीसांजेला
As small as seven sisters
and as grand as King Shivaji's empire;
the States became integral
and she witnessed the revival.
As ancient as Brahma
and as modern as Lordships;
doctrines emerged
and the position reestablished.
As rustic as Birsa Munda
and as polished as the General or Admiral;
People showed unity
And she rejuvanated with integrity
As enchanting as the ruins of Hampi
and as dreamy as the Ayoddhya Temple;
Glory went n come completing the circle.
As tall as Himalaya
and as boundless as oceans;
Time stood beside and
Nation faced the resurgence.
किती योजने पार पाडून अंतर
किती धावले भोवताली तुझ्या
जरा सांधले व्यक्त होवून काही
तरी लाख वर्षे दुरावा पुन्हा

जशी पाहिली संयमाची परिक्षा
तसा सोसला मुक्त आवेगही
तरी ठेविला ताण राखून मधला
अलिंगन जरी कैकदा मोहवी

अताशा मितीपारचे वेध येता
दिशांनी दिली हूल बेभान समयी
असे वाटले की निमिषांत व्हावे
तुला जाणुनी मग मर्याद मी

तुटू लागले बंध अनिवार्य जेव्हा
फिरावे कसे पावलांनी पुन्हा
मनाचाच कोसळ मनाच्याच वेगा
न थोपावले हा झाला गुन्हा

न बंधातले राहिले काही हाती
कुठे सृजनमाला गळा घातली
अता तोडुनी बद्ध कक्षेस उरले
तुझ्या अंगणी फक्त अवशेष मी

विभावरी
जरा मजा.... आवडते कवी संदीप खरे यांची शतश: क्षमा मागून!

तोऱ्यामधे निघालेला एक घडीधारी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
दिखावाच आहे तसा फार खरे नाही
माफी कशी मागू लेका मला तोंड नाही
सांगायची आहे माझ्या गेल्या शिलेदारा
बुडालेल्या जहाजाची कहाणी तुला

आटपाट नगरात बारा दावेदार
एकएका झटक्यात केले गपगार
माझ्या गादीलाच जेव्हा दिलीस टशन
मोठे होऊ दिले नाही एक मी पुष्कळ
जरी पेरला मी द्वेष जातींचा पुरेसा
तरी कसा झालो रे मी शर्यतीतिल ससा?
राजा उरे मागे पुढे नवीस चालला
असा वर्मी शर आणि असा वार आला
बुडालेल्या जहाजाची कहाणी तुला....

असे केले मातीशी मी सोयरे ईमान
खऱी माय जरी तरी झालो मी मालक
वनवासी हटवले मोडुनिया घरा
हस्तगत केली सारी लुटलेली धरा
सिंचनाची, धरणांची केली ऐशी तैशी
मोजुनिया थकलो रे धनांच्या या राशी
नोटाबंदीमध्ये जरी मोडलाना कणा
महसूल सहकार सोडवेना बाणा
शिक्षणाचा सुरु केला बाजार मी जरी
ऊलट्या पावली आल्या चुकामुका दारी
स्टँप्स झाला, स्पेक्ट्रम झाला दिला राजीनामा
चारा, शिक्षण आदर्शाला दिली जरा हवा
प्रधानमंत्री होण्यासाठी पक्ष केला नवा
क्षण गेले निसटून केला जरी धावा
समाजाच्या माध्यमांनी घात कसा केला
बुडालेल्या जहाजाची कहाणी तुला....

मोठेपण गेले माझे गुज निसटून
घड्याळाचे काटे कसे उलटे फिरून
एक एक जागा गेली अशीच विझून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधून
माझे नाव गेले आणि तुझे पद गेले
राजे गेले सिंह गेले उरले ना चेले

जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून सारे हरवेल का रे?
मोठेपणी सारे तुला आठवेल का रे?
सभेमध्ये जाता जाता उंबरठ्यामध्ये
पक्षासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये?

सांगायची आहे माझ्या गेल्या शिलेदारा
बुडालेल्या जहाजाची कहाणी तुला

- विभावरी
०५/०९/२०१९
किती आल्या वेळा जेव्हा
आपसूक होते सावरले
तिचेच होते हात तेव्हा
जेव्हा जेव्हा बावरले
बहर, मोहर, आवेग, जिवलग
तिच्याचबरोबर अनुभवले
सल, निराशा, दुःख, वेदना
ती असल्याने रिचवले
सहअनुभूती, सहवेदना
तिचा नी माझा प्रवास सोबत
आणि कधीही अडखळताना
पार करुनी दिला अडसर
आता दूरच्या क्षितिजापाशी
नवे विश्व प्रकाश नवा
नसे पुरेसा हात तिचा
तिथला अंधकार नवा
नसते ती भवताली आता
आतून आतून तुटताना
एकटा प्रवास, नव्या वाटा
जोखताना नि नवनिर्मिताना
आपल्यामागे आता आपण
कवितेचा हात सुटताना
आतून आतून तुटताना

अता सांज समयी जरा दूर होई
मनाभोवतीची दिवा काजळी
अता सांधते ज्योत दिन रात्र दोन्ही
स्वतःच्याच तेजामधे राहुनी

नभाच्या पटावर विखुरल्या न दिसती
अता सांडलेल्या सुट्या तारका
अता तारकापुंज एकात्म दिसती
कुणी ओवल्या मुक्त माला जशा

धरा वायु अग्नी जलाच्या सभोती
दिशांचा पसारा अताशा दिसे
दिवसरात्र चक्रे अखंडीत सत्ये
किनाऱ्यावरूनी अता पाहते

किती विश्वव्यापून आकाशगंगा
तुझी भव्यता नी तुझे शून्य हे
कितीदा फिरावे तरीही चिरंतन
तुझे स्पर्श सानिध्य विश्राम रे

सुखामागुनी दुःख येते भराला
न मी फक्त साक्षी, समर्पीत मी !
अता वाहते अर्घ्य माझे मला मी
तुझ्या राऊळाची शिला न्यस्त मी

तुझ्या मोहपाशी तुझा माग घेता
अमूर्तात अस्तित्व सामावते
दुजाभाव सरता अता फक्त उरुनी
तुझा आरसा अन् प्रतीबिंब मी

सहस्पंदनांचे नवे अर्थ ओठी
दिवसरात्रीच्या सांजकाठावरी
दुरावा नि भेटी अता लांघू जाता
विरहवेदनांच्या व्यथा पांगती

आगापिछा आधार सोबत नसलेली
मनातली एखादी शून्य भावना,
दिवस रात्रीचा आधार नसलेल्या शून्य तिन्हीसांजेच्या प्रहरी,
हेलकावत राहते...
ह्या अंतापासून त्या अनंतापर्यंत...
तू दिलेलं नाहीस
हे तुटलेपणही...
तेही माझं माझंच
त्याला माझ्या अस्वस्थ मनाचा पाश मिळूदे...
त्याला माझ्याच दुःखाचा आधार मिळूदे...

दया आली त्यांची
जिथे प्रकाश पोहोचत नव्हता...
दया आली त्यांची
ज्यांना प्रकाश माहितच नव्हता..
त्यांचीही दया आली ज्यांनी
डोळे बंद करून घेतले होते...
आणि त्यांचीही आली
ज्यांना त्यांचा प्रकाश 'प्रकाश' वाटत होता..
(मीही त्यात असेन.. माझीही आलीच...)
आणि अखेरीस त्यांचीही दया आली
ज्यांनी प्रकाश वाटला नाही...
त्यांचा प्रकाश उजळवला नाही...


कधी रस्ते छेदणारे
आणि वेगळे आकाश
कधी क्षणांच्याच भेटी
आणि अखंड प्रवास

कधी ऊन पावसाचा
आकस्मित शिडकावा
जसा 'निसर्ग' चकवे
तसा मानवी चकवा

कधी गर्द सावल्यांचा
पळभराचा विसावा
अशी कंच देवराई
तिथे कवितेचा थांबा

टायटॅनिक आता पूर्णतः एका बाजूला कललंय
बरोब्बर मध्यावर तुटण्याच्या आधीपर्यंत
व्हायोलीनचं एक पथक आजूबाजूच्या तांडवाकडे दुर्लक्ष करून
बघ एक मंद धून वाजवत आहे.
नाझींच्या Concentration Camp मध्ये गीडोला
आपल्या बायको आणि मुलासह आणलं गेलंय ....
आणि तिथे तो आपल्या लहानग्याला कळू देत नाहीय प्रसंगाचं गांभीर्य
सांगितलंय त्यानं आपण एका खेळात सहभागी झालो आहोत
आणि देतोय हालअपेष्टांना सहन करण्याची ताकद
खेळत जिंकल्यावर एक रणगाडा बक्षीस मिळणार आहे त्यांना.
कुणी एक जर्मन शिंडलर व्यक्ती
कित्येकांना अशीच कारखान्यात कामाला दाखवून एक लिस्ट करतेय
आणि त्याद्वारे सुमारे हजार एक ज्यूंना वाचवतेय.
आजही रस्त्यावरचा भिकारी टाळ्या वाजवतोय.
आणि अजून एक म्हातारी
तिच्या प्लास्टिकच्या खोपटाबाहेर बसून थाळी वाजवतेय.
अशा वेळेस मंदिर बंद झालं तरी
कटीवरचे हात खाली घेऊन विटेवरून खाली कसा उतरू रकुमाई!
ना कृष्णाने आपली बासरी खाली ठेवली आहे,
ना हनुमान अवघडलेली स्थिती सोडून थोडा मोकळा झाला आहे,
लक्ष्मणही कुठे गेलाय उर्मिलेला भेटायला थोडा वेळ मिळाला म्हणून....
बंद दाराआड आपण असेच आहोत कमरेवर हात ठेवून
हे माहित आहे त्यांना
आणि म्हणूनच उभे आहेत ते आजही....
मंदिरं उघडी... मंदिरं बंद....
मंदिरं येतील.. मंदिरं जातील...
पण पुन्हा पुन्हा उघडली जातील...
पुन्हा पुन्हा बांधली जातील....
खरंतर कुठलेच दरवाजे नाहीत
त्यांच्यात आणि आपल्यात ..
श्रद्धेचे हे धागे त्या पलीकडे दरवाजापार
म्हणूनच चांगल्यांचा चांगल्यावरचा विश्वास आहे
तोपर्यंत कमरेवरचे हात खाली नाही घेता येणार...
विटेवरून खाली नाही उतरता येणार....
- विभावरी

ते शेजारती करतात तशीच भूपाळीही गातात
उन उन पाणी, साखर घालून दूध,
तिन्ही त्रिकाळ महाप्रसाद ...
येताना घंटा वाजवतात
जाताना पाठ होऊ देत नाहीत
मोगरा असला की मोगरा वाहतात
काहीच नसेल तर अक्षता तरी वाहतात
थंडी आली की लोकरीची वस्त्र नेसवतात
आणि उन्हाळ्यात वाळ्याची आरास...
थंडीत गरम गरम शिरा करतील
तर उन्हाळ्यात द्राक्षांची माळ घालतील
सगळे ऋतूंचे सोहळे...
जसे त्यांचे तसेच आपलेही
मग त्यांचे दरवाजे बंद तसेच आपलेही
त्यांची भेट बंद, तशी आपलीही
आपण नाही कुणी पूर्णतः वेगळे
आपण त्यांचा सखा, मित्र
आपला अंश त्यांच्यामध्ये, छे!
आपण सर्व एकाच तत्त्वाचे अंश
हे ते जोवर मानत राहतील
तोवर दरवाजे लागले
तरी बासरी वाजवणं
थांबवता नाही येणार राधे....
- विभावरी