Thursday, April 16, 2020

किती योजने पार पाडून अंतर
किती धावले भोवताली तुझ्या
जरा सांधले व्यक्त होवून काही
तरी लाख वर्षे दुरावा पुन्हा

जशी पाहिली संयमाची परिक्षा
तसा सोसला मुक्त आवेगही
तरी ठेविला ताण राखून मधला
अलिंगन जरी कैकदा मोहवी

अताशा मितीपारचे वेध येता
दिशांनी दिली हूल बेभान समयी
असे वाटले की निमिषांत व्हावे
तुला जाणुनी मग मर्याद मी

तुटू लागले बंध अनिवार्य जेव्हा
फिरावे कसे पावलांनी पुन्हा
मनाचाच कोसळ मनाच्याच वेगा
न थोपावले हा झाला गुन्हा

न बंधातले राहिले काही हाती
कुठे सृजनमाला गळा घातली
अता तोडुनी बद्ध कक्षेस उरले
तुझ्या अंगणी फक्त अवशेष मी

विभावरी

No comments:

Post a Comment