Friday, February 27, 2015

निरोप

मित्रा,
रेशमी धागे जीर्ण झाले तरी
कुठे एवढ्या निर्दय पणे तोडून टाकतो आपण.
किती हळुवार पणे हाताळतो आपण,
घड्या बदलत राहतो वारंवार
मऊसुत कापडात गुंडाळून ठेवतो,
आणि वर डांबराच्या गोळ्याही ठेवतो,
झालाच तर उनही देतो अधनं मधनं,
खूप जपतो आपण ट्रंकेच्या तळाशी ठेवून देतानासुद्धा,
आणि एवढं करून कसर लागलीच तरीही
तशीच ठेऊन देतो घडी हळुवार,
आणि फुरसतीच्या क्षणी उलगडत राहतो
त्याचा रेशमी स्पर्श.
घेऊन जातो तो आपल्याला
त्याच्याबरोबरच्या सगळ्या सोहळ्यात,
डांबराच्या गोळ्यांचा वास उडून
कधी अत्तराचा सुगंध यायला लागतो
ते कळतही नाही.
मित्रा ! भूत वर्तमान आणि भविष्याचे
एकत्रित गोफ बांधूनच तर
आपण जगत असतो खराखुरा माणूस होऊन.....
मित्रा!
निरोपाची  वेळ तर आता आलीच  आहे  जवळ,
पण तिलांजली द्यायला तरी थोडा वेळ थांब...............

No comments:

Post a Comment