काठाकाठावरून फोफावत गेलीस,
खोल खोल रुजत गेलीस,
सर्वदूर पसरत गेलीस,
जेंव्हा पाण्यातल्या प्रतिबिम्बामध्ये
फांद्या खाली आणि मुळे वरती दिसू लागली,
तेंव्हा अवतरलीस सुवर्णयुगात,
आणि सामावून घेत गेलीस
कितीतरी फुटलेल्या शाखा
तुझ्याच असल्यासारख्या,
तुझ्यात एकजीव झालेल्या.
सर्व धर्म समभावाची
तुझ्याच तर फांद्यांफांद्यांवर उमलली फुले.
तू छाया दिलीस चार्वाकाला सुख लालसेसाठी,
आणि तुझ्याच सावलीखाली अंतर्ज्ञान देत गेलीस,
तेंव्हाही संहार बघितलेस
आणि तुझ्या कुशीतून ज्यांनी बघितले
त्यांना तूच दाखवलास
शांतीचा मार्ग,
मात्र उत्थान पतनाच्या चोवीस घटिका
फिरत राहिल्या चक्राप्रमाणे
तेंव्हा परक्यांकडून ओरबडली गेलीस,
निर्दयपणे लुटली गेलीस,
देवळा देवळांच्या तळघरांमधून कोंडली गेलीस,
गोपुरांमधून ढासळली गेलीस,
कोसळणाऱ्या भिंतींमधून गाडली गेलीस,
शिल्पाशिल्पांमधून तडकली गेलीस,
वर्तमानाच्या डोळ्यावर
इतिहासाचे आवरण घालून
जिथे जिथे उरलीस तिथे तिथे
मुलाम्याने दडवली गेलीस,
किंवा कधी साटेलोट्याने विकली गेलीस,
तू झेललिस अंगाखांद्यांवर आक्रमणे
आणि सहन केलेस संकल्पनांचे विध्वंस
मात्र तरीही
तूच एक सत्य कालही होतीस,
आजही आहेस आणि उद्याही असशील,
कारण तू कालच्या खूप खूप आधी खूप खूप आदिम आहेस……
तीस हजार अवशेषांमधून उठून
सत्तेचाळीसच्या ऑगस्टमध्ये
शुभ्र वस्त्रे लेवून
तू आलीस नवजीवन घेऊन
तेंव्हाच मी हे जाणलं होतं……
No comments:
Post a Comment