Friday, February 27, 2015

झाकोळले नभ
गढूळला डोह
अनाम उदास
चराचरी व्योम.
शुष्कतेचा झरा
वाहिला कुठून
आक्रसले अंग
भुई भेगाळून.
नित्य ऋतूतील
निष्क्रियता का ही ?
खोल मातीमध्ये
अंकुरण्यासाठी?
होईल का कधी ?
चैत्र पल्लवित.
धुसर धुराडा
मृदगंध होत?
हिरव्याचे स्वप्न
पडेल का नभा?
शिंपडेल तो का
जरासा गारवा ?
उगमच जेथे
अमृत झर्याचा
अभाव नसावा
तेथे आर्द्रतेचा.
कोरडेपणाची
व्हावी ना सवय.
सरेल का जन्म
ओलाव्याशिवाय?

No comments:

Post a Comment