Friday, February 27, 2015

प्रिय,

मी येतेय थोड्याच अवधीत.
अनाहूत पण अटळ.
असेलच तुला आठवण.
होतही असेल चलबिचल!
लागलीयेस ना आता आवरायला थोडे पसरलेले फुलोरे?
आणि आवरशील ना विखुरलेले अस्ताव्यस्त कानेकोपरे?
छाटून घे थोडी स्वप्नांची देवराई
आणि राहूदेत मोजकीच स्वच्छ निट नेटकी झाडं झुडपं.
नाराज होतील कदाचित फांद्यांफांद्यांवरचे झुले
पण हिंदोळ्यावर धुंद होऊन झुलायचे दिवस संपले आता.
आणि मनात येणाऱ्या प्रत्येक लहरीवर वाहत
जायचे दिवसही नाही राहिलेत.
आता आरूढ होऊ द्यायची आत्ममग्नता स्वतःवर
आणि सुरु करायचा प्रवास खोल खोल, तळ सापडेपर्यंत ….
आत्तापर्यंत स्वतःला अजमावून बघण्यासाठी
भटकली असशील कितीतरी
किंवा बघितलं असशील स्वतःचं प्रतिबिंब इतरांच्या नजरेत
आणि एव्हाना जाणवलं असेल तुला कि
ती तर होती एकप्रकारे फारकतच तूच तुझ्याशी घेतलेली.
मात्र आता भेटशील तू तुझ्यातल्या तुला,
बघशील स्वतःच प्रतिबिंब स्वतःच्याच नजरेत
मग म्हणशील हेच खरं!
ते सापडलं तुला तरच कदाचित
शोधू शकशील आणखी अनमोल काही….
जे भल्याभल्यांना गवसत नाही………
आणि लक्षात ठेव आता नाही तर कधीच नाही.
आणि हो, मी येण्याच्या आधी हलकी कर काही ओझी,
काही सोडून दे सरळ आणि काही रिकामी कर इतरांच्या पाठीवर.
कारण फक्त मोकळ्या हातांनीच स्वागत करू शकशील तू माझं छानसं.
आणि पुढचा सह प्रवास होईल आपला सहज सोप्पा!
मात्र ह्या ओझ्यांबरोबरच ह्या भेटीत
तुला विसरावी लागेल तुझी स्वतःची एक जुनी खूण
माझ्याजवळ जी असेल एक कसोटी.
ती ठेवताना माझ्याजवळ तू हुरहुरशील, हळहळशील आत्ता.
पण सरतेशेवटी खूपच सोप्प जाईल तुला आवराआवरी करणं !
कारण जाताना सगळी ओंजळ रिकामीच तर करून जावी लागणार आहे !
म्हणूनच मी येत आहे एक stepping stone घेऊन तुझ्यासाठी……
ह्या तीरावरून त्या तीरावर जाताना तुला अलगद हात देण्यासाठी………
आता मी येईपर्यंत आणखी एक कर अगदी शेवटचं,
समजून घे जाणिवांच्या पातळीवर तरी
कुठलेच मुक्काम नसतात कायम……
प्रवास हाच काय तो एक शाश्वत…….

तुझीच चाळीशी.

No comments:

Post a Comment