Friday, February 27, 2015

हजार होतील आता
इथल्या तिथल्या बाता
दहा दिशांच्या वदशील
कुठल्या कुठल्या वार्ता.

तू पुसता मज हाल
मी मजेत देईन उत्तर
अशीच चालत राहील
देवघेव ही वरवर.

शब्दांच्या उपस्यानंतर
क्षण निघून जातील फक्त
निघताना असेल तरीही
ओंजळ अंती रिक्त.

संपून जातील मिनिटे
संपून जातील तास
मागे केवळ उरतील
तुझे रिकामे भास.

परंतु तरल पटाशी
जे दिले घेतले जाईल.
अव्यक्ताच्या सीमेपाशी
ओथम्बुन वाहील.

उरेल अंती तेंव्हा
मनात जडसे काही.
जे कळले परस्परांना
पण वदले गेले नाही.

No comments:

Post a Comment