Friday, February 27, 2015

हा रस्ता इतकासा होता इतके स्मरून जा.
ना टळणारा निरोप होता इतके म्हणून जा.
भेटी स्पर्श नि  वचने कधीपण नव्हती तरीही
काळोखाला सांजफकिरी किनार देऊन जा.
अभेद्य भिंतीमधे होऊदे गलका कितीही
कुजबुजता स्वर दारापाशी थोडा ठेवुन जा.
सूर गुंफिले गेले चुकूनच पूरीयामध्ये  
सुरेल नसतो गुंता तू हा भैरव विसरून जा.
नकोच वादळ हस्तामधले उगाच निघताना
असतो नसतो तसाच अलगद श्रावण होऊन जा.
लखलखाट हा किती आभासि वाटे भवतीचा
निरंजनापरि मनगाभारी हलका दिपून जा.
कधीच भेटी नव्हत्या जवळी  दिल्या घेतलेल्या.  
मनात विरघळला तू जितका तितका उरून जा.
किती शोधिले तरिही भुलले आभासांना ह्या
लपल्या कस्तुरिसम तू अंती मनात गवसुन जा.

No comments:

Post a Comment