Friday, February 27, 2015

 उंबरा 
गंध ओलेत्या मेंदीचा माझ्या  तळहातावर,
रंग त्याच्याच प्रीतिचा सुकलेल्या मनावर।
पळ संपत चालले वेळ झाली मुहूर्ताची,
शेवटच्या क्षणांनाही वाट त्याच्याच येण्याची।
हाती घेउन हा हार दुसरयास पुजायाचे,
गंध प्रेमाच्या फुलांचे स्मृतींमधे जपायचे।
सप्तपदी चालताना साथ सातही जन्माची,
शेवटच्या पावलाला आस आठव्या जन्माची।
नावासवे लिहिताना नाव आणखी कोणाचे,
त्याचे नाव एकदाही मनी येऊ ना द्यायचे।
माप ओलांडले दारी आता उम्बरा मनास,
बंद दारे नि कवाडे मान गोकुळ घरास।
जड़ जोड्व्यांनी आता सावरायाचे पायांना,
काळ्या मण्यांनिहि कधी भुलायचे ना रंगांना।
पावा ऐकताना आता नाही बेधुंद व्हायचे,
राधेनहि निघताना उम्बरयाशी थांबायचे।

No comments:

Post a Comment