Friday, February 27, 2015

जेवढं ह्या शहरापासून
दूर दूर
तितकंच स्वतःच्या जवळ...
शहरात भटकताना नसते उसंत..
ती धावपळ, त्या वेळा गाठणं,
ती ट्रॅफिक, तो गोंगाट, तो कोलाहल...
बाहेर पडून जेवढं भटकावं
तेवढंच सापडत रहावं स्वतःला
आत खोल खोल...
शांत शांत...
मन एखादा घनगंभीर डोह
आणि मग येत रहाव्यात अंतस्थ उर्मी
बुडबुड्यांप्रमाणे पृष्ठभागावर...
खोल खोल तळाशी गाडलेल्या इच्छा आकांक्षा ..
मुद्दाम विस्मरणात टाकलेल्या
चुका, पराभव, अपमान, सल,
आणि माणसंदेखील..
टिकाव धरून असण्याची कारणं,
जगतोहोत पण प्रयोजन,
सुरवात प्रवास नि शेवट,
भिरभिरण्याचे आणि स्तब्धतेचे प्रयोग,
उद्देश आणि सार्थकता...
कितीतरी निरुत्तर प्रश्न!
...........!
किती हे तरंग आणि
किती हा कल्लोळ !
सगळं अंतर्बाह्य ढवळून काढणारा !
छे ! ह्यापेक्षा स्वतःला हरवून टाकणारा
तो शहरातला कोलाहल कितीतरी सुसह्य !

No comments:

Post a Comment