Friday, February 27, 2015

तुझ्या ओढीची एक तीव्र भावना
खोल मनाच्या गाभ्याशी.
हा एक असा अंकुर
ना रुजणारा ना कोमेजणारा.
एक असा धागा
ना गुंफला जाणारा
ना पीळ पडणारा.
एक असा झरा
शांत प्रवाहाखालून वाहणारा
ना कोणाला दिसणारा ना भिजवणारा.
हे एक असं स्वप्नं

 पिंपळपानाला हळुवारपणे उचलून 
वहीत ठेवून दिल्यासारखं.
हिरवेपण सरत सरत भगवेपण पांघरल्यासारख.
त्याला नको कुठला प्रकाश दाखवायला
नको काहीच अन्कुरायला.
व्यवधानांच्या पैलतीरावर
भेट होईल तिन्हीसांजेला
पडली असेल सुरेख जाळी
तोवर पिंपळपानाला.
त्या पानाच्या जाळीतून तेंव्हा
मोह असेल झरलेला अन 
स्नेह असेल उरलेला.

No comments:

Post a Comment