तुझी भरती माझं उधाण
तुझं मौन, मी भाषेच्या पार
मी समुद्र, वारा, रेती
तू दशदिशा आणि काळ
विखुरलेले तुकडे;
तरी एकच दिसते नाळ
प्राशून घेतोस तू
की अस्तित्व जातं विरघळून?
तू दिवा होऊन तेवतोस
की मीच येते उजळून?
मी दुभंगते आणि जुळतेही
कोण असतं आणखी, जे हे बघतंही!
तू जुळतोस आणि दुभंगतोस
कुठली मिट्टी, कुठला गिलावा
जो पुन्हा पुन्हा सांधतोस!
कुठून येतं भरलेपण
आणि कुठून येतं रिकामपण?
तू-मी, मी-तू सगळं एकच वाटतं
एखादा क्षण
- विभा
No comments:
Post a Comment