Sunday, July 19, 2015

तुझ्या शोधात निघताना
तुझा पत्ता म्हणून तुझी एक कविता होती फक्त हातात
अगम्य फाट्याफुट्यांतून माग काढत
कागदावरच्या खाणाखुणा
आणि बऱ्याच पायपिटीनंतर सापडलेलं हे कुंपण
ह्यांच्यात काहीच साधर्म्य सापडेना
तेंव्हा मागे फिरताना
अरंगीत फुलांनी बहरलेला
छोटासा बगीचा दिसला तेंव्हा
तू इथेच राहतेस ह्याची खात्री पटली.
किरकिर वाजणाऱ्या किलकिल्या दरवाजाच्या फटीतून
आत आलो.
माहित नाही कोणत्या ओढीने
एकामागून एक ह्या तळघरात उतरणाऱ्या पायऱ्या
उतरू लागलो.
दर अंतरावर नवनवीन खोल्या
प्रत्येक खोलीत नवनवीन
कल्पनांचे बिलोरी लोलक
अनुभवांचे झगमगाटी आरसे
कुठे तुझे कुठे इतरांचे...
कुठे वाचण्या बघण्यातून
जतन केली गेलेली स्मरणांची झुंबरं,
अस्वस्थतेच्या नि औदासीन्याच्या
भिंतींवर ओढलेले भावनांचे सप्तरंगी पडदे .....
कुठल्याश्या कोपऱ्यात प्रतिभेची इवलीशी दिवटी,
म्हटलं तर अंधार गिळून टाकणारी
म्हटलं तर अपुरेपण दाखवणारी ...
प्रत्येक ठिकाणी तुझ्या पत्त्यातल्या एखाद्या शब्दाचा
मागमूस मिळाला तसा.
पण तू भेटलीच नाहीस शेवटपर्यंत,
किंबहुना तू पूर्णपणे भेटलीच नाहीस कधी.
आत्ता कळलं,
तू म्हणायचीस ते किती खरं होतं...
“कवितेवरून कधीही माणूस शोधायला जाऊ नये !!!” 

खरंच होतं ते 
कवितेवरून कधीही माणूस शोधायला जाऊ नये

No comments:

Post a Comment