Thursday, July 23, 2015

घनघोर दाटुनि येते अन
हलके बरसुन जाते
ती मेघ पांगला कापूस
उगाच पिंजत बसते

तो सागरतीरी येतो
अन रिक्त कोरडा जातो
ती सैरभैरसे वादळ
काठावर झेलू बघते

तो सहजच समोर येतो
अन अभिनय करून जातो.
निर्लेप असे का रुक्ष
ती विशेषणांवर अडते.

तो पूर्णत्वाची धडपड
वळणावळणांवर बघतो.
ती सामावून घेणारा
समुद्र पाहून झुरते.

तो येतो अन जाताना
दशदिशांत मिसळुन जातो.
ती मुक्त स्वैर झालेल्या
दशदिशा समेटुन घेते.

Sunday, July 19, 2015

तळगाळ उपसावा
खणून बघावे सारे स्त्रोत
तरी कळू नये वहातात कुठून
अस्वस्थतेचे लोट.
जिरलेल्या विणी
बदललेल्या वाटा
बंद झालेले रस्ते
की विरलेल्या हाका.
थांबलेले हिंदोळे
उसवलेली गात्र
बोचलेले शब्द
की आणिक काही निमित्रमात्र.
काही काही सापडू नये
सापडलच तर देता येऊ नये नाव
नावानीशीच शोधलं
तर सापडू नये खरा गाव.
खूप खूप शोधत रहावा
बेनाम दुःखाचा ठाव
आणि सापडला नाही की आणावा
सारं आलबेल असल्याचा आव.
घनघोर दाटुनि येते अन हलके बरसून जाते
ती मेघ पांगला कापूस उगाच पिंजत बसते

तो सागरतीरी येतो अन रिक्त कोरडा जातो
ती सैरभैरसे वादळ काठावर झेलू बघते
माझ्या मना माझे नमन आराधना स्वीकार कर.
तू आद्य अन तू अंतही तू आत्मव्यापी सकलकर.

अवहेलना वैफल्य न्यून नि शल्य काही बोचरी.
अपराध किंवा टोचणी काही चुुका झाल्या जरी.
तू व्यक्त हो अन मुक्त हो त्या त्या क्षणी ते रिक्त कर.

पथ कोणता चालायचा वाटेल हे जेंव्हा कधी.
वाटेवरी काटेकुटे घनघोर तम दाटे कधी.
सौंदर्य आणिक सत्यतेची तू सदोदित कास धर.

व्यवहार्यता जपली जरी संवेदना लाभो तुला.
शोषीत दुर्बल वंचितांचे दुःखही समजो तुला.
पंचेंद्रिये सारी उजळ अन मीपणावर वार कर .

मोहास भक्तीची किनार नि प्रेम करूणा वाहते.
ह्या उन्नतीच्या पायऱ्या मानव्य ज्याने सिद्धते.
बेफाम धावे भावरथ मी पार्थ तू सारथ्य कर.
खुशाल उतरावं पाण्यात

आणि लाटांचे सोहळे करावेत.

कधी बसावं किनाऱ्यावरती

आणि विरघळू द्यावेत पाय

निळ्या हिरव्या पाण्यात.

मनमुराद भिजावं

मुसळधार धारांत

आणि रुजून यावं

गात्रा गात्रात.

मात्र कधीतरी दूर यावं..

इतकं दूर कि कळेल

कुठली गलबतं हाकाटली गेली खरंच

आणि कोणत्या शीडांमध्ये

वारं राहिलं भरायचं.

इतकं दूर कि कळेल

पुलाखालून किती पाणी वाहून गेलं...

आणि मोजता येतील पावसाळे

डोळ्याखालून गेलेले..

शेवटी पाणी पाणी म्हणत होतो

ती खरंतर सगळी बंदरं ;

एवढं कळलं कि सोप्पं होतं

पाठ फिरवून निघणं.

तुझ्या शोधात निघताना
तुझा पत्ता म्हणून तुझी एक कविता होती फक्त हातात
अगम्य फाट्याफुट्यांतून माग काढत
कागदावरच्या खाणाखुणा
आणि बऱ्याच पायपिटीनंतर सापडलेलं हे कुंपण
ह्यांच्यात काहीच साधर्म्य सापडेना
तेंव्हा मागे फिरताना
अरंगीत फुलांनी बहरलेला
छोटासा बगीचा दिसला तेंव्हा
तू इथेच राहतेस ह्याची खात्री पटली.
किरकिर वाजणाऱ्या किलकिल्या दरवाजाच्या फटीतून
आत आलो.
माहित नाही कोणत्या ओढीने
एकामागून एक ह्या तळघरात उतरणाऱ्या पायऱ्या
उतरू लागलो.
दर अंतरावर नवनवीन खोल्या
प्रत्येक खोलीत नवनवीन
कल्पनांचे बिलोरी लोलक
अनुभवांचे झगमगाटी आरसे
कुठे तुझे कुठे इतरांचे...
कुठे वाचण्या बघण्यातून
जतन केली गेलेली स्मरणांची झुंबरं,
अस्वस्थतेच्या नि औदासीन्याच्या
भिंतींवर ओढलेले भावनांचे सप्तरंगी पडदे .....
कुठल्याश्या कोपऱ्यात प्रतिभेची इवलीशी दिवटी,
म्हटलं तर अंधार गिळून टाकणारी
म्हटलं तर अपुरेपण दाखवणारी ...
प्रत्येक ठिकाणी तुझ्या पत्त्यातल्या एखाद्या शब्दाचा
मागमूस मिळाला तसा.
पण तू भेटलीच नाहीस शेवटपर्यंत,
किंबहुना तू पूर्णपणे भेटलीच नाहीस कधी.
आत्ता कळलं,
तू म्हणायचीस ते किती खरं होतं...
“कवितेवरून कधीही माणूस शोधायला जाऊ नये !!!” 

खरंच होतं ते 
कवितेवरून कधीही माणूस शोधायला जाऊ नये