Saturday, February 28, 2015

कधीतरी ………


कधीतरी -
आजूबाजूचा गोंगाट
आपल्यापुरता स्तब्ध होऊन
एकमेकांच्या डोळ्यातून ऐकू येईल फक्त
"खूप खूप आधी का नाही भेटलो आपण?"
कधीतरी -
झाडांच्या सावल्या जिथे
चांदण्याची झिरमल
पांघरून असतील अशा
निर्जन रस्त्यावर
हातात हात घेऊन
निमग्नपणे चालत राहू …
कधीतरी -
वळीवानंतर पडलेल्या संधीप्रकाशात
मृद्गंध आणि कॉफीने गंधाळलेल्या वातावरणात
मी फक्त ऐकत राहीन तुझं बोलणं
अनंत काळ …
कधीतरी -
झोप हरवलेल्या हस्तातल्या
पावसाळी रात्री
आपण ऐकत असू एकत्र
एखादं साहिरच गाणं….
कधीतरी –
एखाद्या अथांग सागरतीरावर बसून
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून
डोळे मिटून ऐकत राहीन
उधाणलेल्या समुद्राची गाज…
कधीतरी-
एखाद्या प्रगाढ मिठीतून
आणि उत्कट चुम्बनातून
वाचेन तुला प्रियकरासारखी …
कधीतरी…….
कधीतरी -
लिहीन मीही ह्या सगळ्या असंभव गोष्टी
कवितांमधून……
आणि एक राहीलं ….
कधीतरी -
देईन तुला वाचायला
तुझ्यावर लिहिलेल्या सगळ्या कविता…….

No comments:

Post a Comment