Friday, February 27, 2015

कितीक जन्म यायचे कितीक जन्म जायचे
पुन्हा पुन्हा तुझ्यासवे फिरून रे जगायचे.

नकोच कल्पनेमधील स्वप्नगाठ रेशमी
तुझीच नीरगाठ जी तिलाच ना जपायचे !

जरी  असंख्य बांधली हवेवरी मनोरथे
खऱ्याखुऱ्या घरामधेच ऊन सौख्य ल्यायचे.

कशास  रे सख्या हव्याच तारका नभातल्या. 
असेच बाल्कनीमधून अभ्र पांघरायचे.

उगाच का प्रितीतल्या खुळासवे उडायचे
मृदेत पाय रोवुनी पिलास पंख द्यायचे.

कितीक जन्म यायचे कितीक जन्म जायचे.......

No comments:

Post a Comment