Wednesday, December 16, 2015

वाळवंटातल्या दिलासादायक मृगजळासारखं स्वप्नील,
डोंगरमाथ्यावरच्या झाडासारखं निश्चल,
मिडास राजाच्या हातांसारखं अपूर्व,
उंच मनोऱ्यातल्या खिडकीमधल्या रपुंझेलसारखं अद्वितीय,
उत्तरेच्या शाश्वत तार्यासारखं अढळ,
तमा न बाळगता चक्रव्युहात शिरणाऱ्या अभिमन्यूसारखं निडर
आणि संध्याकाळी सुचलेल्या विरहव्याकूळ कवितेइतकं निस्सीम...
खरं तर एवढंपण वाईट नसतं एकटेपण...
पण एकावेळी एखादंच लक्षण बाळगून असतं
त्यामुळे तसं एकटं पडतं एकटेपण...
बेवारस तारा तुटला आभाळात
आणि पृथ्वीवर येण्याआधीच शांतावून गेला ...
त्याच्या राखेबरोबर निचरा झाला इकडे
न जाणो किती अनौरस इच्छा आकांक्षांचा ... !

Sunday, November 15, 2015

भिरकावून द्यायचा स्वप्नांचा चांदणचुरा
काळ्याभोर चढत्या रात्रीवर
आणि मग कुठल्याशा असोशीने ओवत बसायचं एकेक स्वप्न निगुतिने..
पहाटेची निरगाठ उसवून
तुकडा तुकडा निसटून गेला
की रिकाम्या धाग्याकडे बघत
नसणारं अस्तित्व शोधत
दिवस संपवायचा...
बस् एवढंच ना फक्त?

Sunday, October 11, 2015

दार उन्हाचे मिटता मिटता
क्षितिजावरती सांज खुलावी
रक्तलालिमा लेवून काया
भेटीसाठी अधीर व्हावी.

दिवसाच्या दाहक प्रहराची
मला न कुठली भ्रांत भिती
माझ्याजवळी श्रांत होतसे
रविकिरणांची तप्त मिती

दिवसरात्रीच्या काठी येते
हाती काही पुसट निसटते
सार्थक करूनि ह्या फेर्यांचे
निघता निघता स्पर्शत जाते

अशी रोजची भेट खरी की
हे विरहाचे आभास खरे .
दिवस रात्रीस अशी तोलते
सवाल घेउन युगायुगांचे.

तरि संध्येला त्याच्याभवती
प्रदक्षिणा ही ओवाळावी.
आणिक त्याच्या लाख स्मृतींची
नक्षत्रांकीत रात फुलावी.
ह्या अशांत संध्याकाळी
का हरवत जाते काही
ना जुने सोयरे होते
अन नवीन गवसत नाही.

दिवसाची तुटते नाळ
रात्रीस न धागा जुळतो
ह्या अगम्य अधांतरावर
जिव काहुरतो व्याकुळतो.

ज्या वाटांवरून येतो
अन दिशा आखतो भवती
उरती क्षितिजाचे भास
ह्या अथांग गर्तेपुढती.

मिटलेल्या फूलकळ्यांचे
पसरती दीर्घ उच्छ्वास
अंधार वेढूनि घेतो
उरलेसुरले अवकाश.

तुटलेल्या संध्याकाळी
क्षणभरात दृश्य बदलते
मी पुन्हा रोवते ‘असणे’
अन क्षणात बहरून येते.

हातात दीप घेताना
मन शुभंकरोती गाते
तुळशीच्या सांजदिव्याने
गाभारा उजळत जाते.
मेघ दाटून येतात आणि अंधार होऊन जातो सारा.
सळसळ सळसळ करू लागते माझ्यामधली माझी छाया.
मुक्त विजेचे क्षितिजावरती तांडव चाले लखलखीतसे.
घुमडघुमड हे नभ सामोरे निमंत्रकाचे दूत जसे.

कोण पुकारे? भान हरपूनि, सरसर सरसर धावत जाते.
वर्षावाच्या धुंद सरींना अंगाखांद्यावरी झेलते.
पाण्याच्या थारोळ्या मधुनी थबडक थबडक कशी नाचते.
पाऊस म्हणजे जीवन सारे अशी हरवते अशी बहरते.

हात चिमुकले भिजले थिजले अन स्वप्नाची कोरी नाव.
अशी सोडते पाण्यामध्ये; जणु स्वप्नांना मिळतो गाव!
क्षणात पाणी अन चिखलाचा असा उडविते राळ कुणी.
विरून जाती लाटा स्वप्ने वर स्मरणांचा भार उरी.

तरी सदोदित जाण मनी तू स्वप्नच असते खरे निरंतर.
संपून जाते अनवट धुंदी स्वप्नाच्या पूर्तिनंतर.
किती डगमगो, वाहो, थांबो नकोस विसरू नाव सोडणे .
आणिक विसरायाचे नाही जलधारांनी चिंब नहाणे.
दूरवरून कुठूनशी
सोनसळी केशरी ओढणी घेऊन
केसांच्या मुलायम बटा सांभाळत
मनामध्ये अशी
उतरत उतरत आलीस,
थोडं थांबलीस,
हसलीस जीवघेणी
आणि पुन्हा निघालीस सोडून
जणु मोरपीशी स्पर्श करून
एक कविता भेटून गेली.....
सावळ्या रंगाची एक सांज
मन कातर कातर करून गेली....