Saturday, February 28, 2015

पार्क मधली खेळणी बघून अंदाज घेते ती जरासा...
मग फारशी गर्दी नसलेल्या घसरगुंडीवर जाते,
तीही रिकामी व्हायची वाट बघत थांबते
आणि मग धीमेपणाने खेळत राहते.
धक्काबुक्की नाही, आपणच पाहिले जायची घाई नाही.
आणि कोणी केलीच धक्काबुक्की तर
शांतपणे बाजूला होते.
झोक्यावर नंबर यायची वाट बघत राहते.
आणि मिळाला कि आपल्याच नादात
उंच उंच हेलकावे घेत राहते.
कोणी दिसलंच नंबर लावून थांबलेलं तर
आपसूकच झोका थांबवते,
अगदी लहान होती तेंव्हापासून !
मलाच हवा ह्याचा अट्टाहास न करता.
जंगलजीम वगैरे अवघड गोष्टींच्या वाटेला
तिला अज्जिबात जायचं नसतं.
पण मी हट्ट करते म्हणून
चढते अगदी बेताबेताने.
कोणी लहान रडताना दिसलं
कि स्वतःच कावरीबावरी होते.
एवढ्या गलक्यातही तिला ऐकू येतात
बागेतल्या पक्षांचे वेगवेगळे आवाज
आणि दिसत राहतात चिमुरडी फुलपाखरं.
अगदी सूक्ष्म लक्ष असतं तिचं सगळीकडे.
आणि खेळायच्या नादात सुद्धा लक्ष ठेवून असते
मी नजरेआड होत नाहीये ना ह्याकडे.
खेळून दमली कि वाळूमध्ये शोधत राहते शंख आणि शिंपले.
मग मी मुद्दामच जरा नजरेआड होते.
आणि तिच्या ठरलेल्या जागी
मी दोन क्षण जरी नाही दिसले
तरी कावरीबावरी होते टी केवढी !
डोळ्यात साठलेले टप्पोरे थेंब मी दिसल्यावर बरसतातच शेवटी.
आणि मग येऊन बिलगतेच मला.
नेहमीचीच बाग, नेहमीच जाऊन काही माणसंही ओळखीची.
मग तिच्या रडण्यावर मी नाराज होते, खूपच !!!
ओरडतेच तिला ! आणि लेक्चर देत राहते जरा धीट हो म्हणून !
अखेर घरी येताना जिन्याच्या पायऱ्या चढता चढता
मी मनाशीच म्हणते .....
‘कशी अगदी माझं प्रतिबिंब आहे ती .... !’
तो रिमझिम रिमझिम येतो
तनमनात श्रावण झरतो.
अदमास किती लावावे
पाऊस जीवाला छळतो.

मी चिंब चिंब होताना
तो उन्हें पांघरी भगवी.
मी रिक्त रिक्त होताना
तो इंद्रधनु सतरंगी.

मी ओथंबून जाताना
तो निर्जल एकल कान्हा.
मी निःसंगी अनुरागी
तो स्पर्शातुरसा पावा.

मी व्यक्त व्यक्त होताना
तो निर्मोही घननीळा.
मी सावरताना सारे
तो व्याकुळ काजळकाळा.

हा लपाछपीचा श्रावण
अन अदमासातील अर्थ
लपण्यातील मधु अनुबंध
कळण्यात न जावे व्यर्थ.
आयुष्य ग्रीष्म होता आहे तुझा निवारा
उद्दीप्त वेदनेवर जालीमसा उतारा.
सगळ्याच वादळांचा उसळून अंत झाला.  
जेथे विसावलेला होता तुझा किनारा.
एकेक मालवीता  अंधार फार झाला.
आश्वस्त उत्तरेला फुलला टिपूर तारा.
गेला असाच जेंव्हा शोधून जन्म वाया.
तुझिया मिठीत आला उमगून स्वर्ग सारा.
चुकला  प्रवास सारा, फिरले तृषार्त जेंव्हा  
कळताच अमृताच्या झरल्या विमुक्त धारा.
नको नको रे पावसा
असा आसेला लावूस
माझी भिजूदे झोपडी
उभी तुझ्या स्वागतास.
नको येऊ तडातडा
इथे नको तिथे पड
नको भलत्याच वेळी
तुझी वैतागाची झड  
असा कुठलाही बोल
तुला लावणार नाही.
मनमुराद तू ये रे.
हाती राखू नको काही.
चंद्रमौळी छतातून
थेंब थेंब पडतील.
चुली भोवताली सुद्धा
आगीसवे खेळातील.
पण धन्यच्या डोळ्यात
तुला पाहण्यापरीस
किंवा सालभर चूल
जी न पेटण्यापरिस
आता ये रे कोसळत
नको लावू आता आस.
माझी भिजूदे झोपडी
उभी तुझ्या स्वागतास
ह्या बोचऱ्या थंडीमध्ये
सखे तू किती पांघरलयेस धुकं
आपल्या दोघांमध्ये....
धुक्यामध्ये दिसत नाहीत
पुढे केलेले हात,
धुक्यामध्ये कळत  नाही
येतीये का साद ,
विझू विझू होते
निखार्यातली धग
हरवून जाते शेकोटीची
उरली सुरली उब.
कसा होणार रस्ता पार,
कसे जाणार पुढे,
सखे तू किती पांघरलयेस धुकं
आपल्या दोघांमध्ये....
स्वच्छ सूर्यप्रकाश,
मोकळी हवा
राहूदेत दोघांमध्ये.
लपंडावाचे असुदेत
डाव मजेपुरते
अबोल्याचे आता
विरुदेत थोडे पडदे
सखे तू किती पांघरलयेस धुकं
आपल्या दोघांमध्ये....
गंज निघाले फाटक आणिक झुडुपे वेली तृणे माजली. 
कुण्या काळच्या आलिशानशा घराभोवती मुक्त पसरली.
किरकिरणारा झोपाळा जो निर्जनतेचे दुखः साहतो.
दारावरच्या घंटेसोबत वाट  पाहुनी थकून जातो.
कुंद सावळे घरकुल आणिक रया उतरल्या केवळ भिंती.
सुन्न सोडले अबोल पडदे प्रकाश वारे अडवून धरती.
जीर्ण जुनेसे किमती जाजम केविलवाणे पडून असती.  
धुरकटलेल्या शोभित वस्तू गतकाळाच्या खुणा सांगती.
दिवस मोकळा भकास वाटे स्वप्नांवाचून उरली रात.
उगाच केवळ सूर्य उगवतो म्हणून म्हणती त्यास पहाट.
उगा जराशी फक्त सकाळी माजघराला येते जाग.
नंतर केवळ वेळ काढणे कधी कुणाचा नसतो माग.
अशा उदासीन घरामध्येही उरते काही चकचकीतसे.
हार घातली भिंतीवरची फोटोचौकट लख्ख दिसे.
कसा सहावा घरदाराने काळाने केलेला वार.  
तरुण मुलाच्या म्रृत्यूनंतर जीवन केवळ शिष्टाचार.
जरा चांदण्याचे बघू काय होते.
जसे ह्या उन्हाचे बघू काय होते.

अवेळीच दाटून आभाळ आले.
अता मोहराचे बघू काय होते.

अकस्मात गेलास  मोडून स्वप्ने.
तुझ्या वास्तवाचे बघू काय होते.

तुझ्या आठवांचेच ओझे निमाले.
तरी विसरण्याचे बघू काय होते.

तुझे दुःख माझे न झाले तरीही.
अशा हासण्याचे बघू काय होते.