गंज निघाले फाटक आणिक झुडुपे वेली तृणे माजली.
कुण्या काळच्या आलिशानशा घराभोवती मुक्त पसरली.
किरकिरणारा झोपाळा जो निर्जनतेचे दुखः साहतो.
दारावरच्या घंटेसोबत वाट
पाहुनी थकून जातो.
कुंद सावळे घरकुल आणिक रया उतरल्या केवळ भिंती.
सुन्न सोडले अबोल पडदे प्रकाश वारे अडवून धरती.
जीर्ण जुनेसे किमती जाजम केविलवाणे पडून असती.
धुरकटलेल्या शोभित वस्तू गतकाळाच्या खुणा सांगती.
दिवस मोकळा भकास वाटे स्वप्नांवाचून उरली रात.
उगाच केवळ सूर्य उगवतो म्हणून म्हणती त्यास पहाट.
उगा जराशी फक्त सकाळी माजघराला येते जाग.
नंतर केवळ वेळ काढणे कधी कुणाचा नसतो माग.
अशा उदासीन घरामध्येही उरते काही चकचकीतसे.
हार घातली भिंतीवरची फोटोचौकट लख्ख दिसे.
कसा सहावा घरदाराने काळाने केलेला वार.
तरुण मुलाच्या म्रृत्यूनंतर जीवन केवळ शिष्टाचार.
No comments:
Post a Comment