Sunday, July 16, 2017

कमाल तापमान,
किमान थंडी,
अमूक इंच पाऊस,
नवे रस्ते, पूल.. पूर ..
भविष्य,
सांस्कृतिक कार्यक्रम,
सेलिब्रेटीज,
झालंच तर अपघात,
घातपात... !!
सकाळचा पेपर -
अन् जिथे तिथे तुझं शहर!
सकाळ म्हणजे आठवणींचा
पहिला वहिला कोरा प्रहर!


रस्ता तुझा मंजिलही तू
तू स्वप्नही तू जागही
अस्ति तुझी जग व्यापुनि
भेटी दुराव्या पार जी

हाती असो माती कधी
विखरो नभी वा तारका
तू कल्पना तू सत्यता
अवकाश तू, तु वसुंधरा

सौंदर्य जे आहे इथे
तुझियामुळे आहे जणू
तू अंतही आरंभ तू
कारण ही तू सीमाही तू

अनुवाद - विभावरी बिडवे
मूळ कविता - अमृता प्रीतम

"तुम्हारा अस्तित्व हर फासले से बेनियाज है |
तुम्हारा अस्तित्व राह भी है, मंजिल भी
हकीकत की तरह,
धरती पर एक जगह पर भी खड़ा है,
और कल्पना की तरह,
हर जगह हर पसारे में भी...
इस दुनियामें
मुझे जहां भी जो कुछ अच्छा लग रहा है,
यह सब तुम्हारे अस्तित्व के कारण है...
तुम्हारा अस्तित्व इसकी पृष्ठभूमि है,
तुम्हारा अस्तित्व इसका क्षितिज है..."

दुःख उगाळायचं सहाणेवर
आणि टिळा लावून द्यायचा
ज्याने दिलं त्याच्या भाळावर.
उदबत्तीच्या वलयाबरोबर
मग विरून जाते इडापिडा
कविता होऊन जाते प्रार्थना!
उत्कटतेचा रंग कुठला असतो?
काळा-पांढरा? गुलाबी की लाल?
नाही माहित!
किती गहिरा असतो तेही नाही माहित.
माहित नाही त्याचा स्पर्श किती तलम,
रेशीम की वुल!?
आणि ध्वनी किती आर्त.... खर्ज? मधाळ?
आणि गंध? रातराणी की सायली?!
एक मात्र नक्की!
उत्कटतेची चव नेहमीच एकसारखी असते ....
खारट!!!
किती आभाळ भरलेले, किती दाटून आलेले
कसे गेले कुण्या गावी, न दे कुठलेच सांगावे
तुझी वचने तुझी भाषा तुझ्या शब्दात नसलेले
मला कळले! तुला कळले? न लिहिलेले न वदलेले..
वाळवंटातल्या दिलासादायक मृगजळासारखं स्वप्नील,
डोंगरमाथ्यावरच्या झाडासारखं निश्चल,
मिडास राजाच्या हातांसारखं अपूर्व,
उंच मनोऱ्यातल्या खिडकीमधल्या रपुंझेलसारखं अद्वितीय,
उत्तरेच्या शाश्वत तार्यासारखं अढळ,
तमा न बाळगता चक्रव्युहात शिरणाऱ्या अभिमन्यूसारखं निडर
शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखं महान,
यमुनेचा घाट सोडून
द्वारकेच्या समुद्रकिनाऱ्यावर
ऐकू येणाऱ्या मुरलीइतकं आर्त
आणि संध्याकाळी सुचलेल्या
विरहव्याकूळ कवितेइतकं निस्सीम...
एकटेपण चांगलं असतं...

************** पुन्हा भेटलो तर **************



पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
तेच ते नॉब्स फिरवून फिरवून रुळलेले
अंधारातले आकडे कानाकडून शोधलेले
किती खरखर किती घरघर, घसा कोरड, जीव आतुर
बुद्धी, डोळे, कान, मन एकमेकांना फितूर
पुन्हा एकदा झुमरीतलैय्याहून तिच फर्माईश होईल
पुन्हा एकदा लतादीदी कभी कभी गाईल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
**************
एकशे एक, नाईन्टी नाईन, नाईन्टी थ्री point थ्री
ही ऑफर, ती ऑफर, ह्याच्यावर ते फ्री
कसला विचार करतोएस रामैय्या? घराला आणि छताला..
अय्या टारझन तू बाळाराम मार्केटमध्ये कसा?
पुन्हा एकदा लुंकडचा मान्सून सेल लागेल
पुण्यामधली पावसाने मारलेली दडी स्मरेल
एफएमवरती चांदनीतलं ‘फिर वो झडी’ वाजेल
मनात, देहात, गात्रात पाउस कोसळ कोसळ कोसळेल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.
**************
खरखर खरखर घरघर घरघर
मेलबर्न, इडनगार्डन, वानखेडे, लॉर्डस्,
गावस्कर, रवी शास्त्री लाइव्ह कमेंट्री फास्ट
सेहेवाग माही, कुंबळे कोहली! किती वाद - काय राहिलं!
क्रिकेट, टेनिस, रग्बी, फूटबॉल कुणी जिंकलं कुणी हरलं
हिरव्यागार लॉनवरती पुन्हा शाहरुख येईल
पुन्हा एकदा अनकही अनसुनी ‘मितवा’ ओळ गाईल
पुन्हा एकदा तोच रेडीओ तेच स्टेशन लागेल
पुन्हा एकदा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून व्हावं लागेल.