Friday, May 3, 2019


सावरकर – प्रखर बुद्धिवाद आणि उत्कट कवित्वाचा अनोखा मिलाफ!
अट्टल गुन्हेगारांनीही फाशी दया पण काळ्या पाण्याची शिक्षा नको असं असं जिच्याबद्दल सांगितलंय ती शिक्षा त्यांना दिली आहे. अंदमानच्या एका छोट्या कोठडीत ते बंद आहेत. ‘सागरा प्राण तळमळला’ सारखं उच्च उत्कट हातून लिहिलं गेलं आहे. राष्ट्रीय साहित्य निर्मिती आधीही झाली आहे आणि अजूनही खूप व्हायची बाकी आहे. बैलाऐवजी तेलाच्या घाण्याला त्यांना जुंपलं आहे. कोलू फिरता फिरता त्यांचं विचारचक्र चालूच आहे. खूप वर्षांच्या शिक्षेनंतर त्यांना कोणीतरी विचारलं, ‘हे कसं सहन केलंत? अंदमानमध्ये कसे राहिलात?’ त्यावर ते म्हणालेत,’मी अंदमान मध्ये कुठे होतो? मी तर माझ्या ‘कल्पनेत’ होतो.”
मार्सेलिसच्या बोटीवरून निसटण्याच्या प्रयत्नानंतर आपला अमानुष छळ होणार हे गृहीत आहे. स्वतःला धैर्य देण्यासाठी आपली  ‘कल्पना’ आपल्याला पुष्कळ आहे. ‘अनादी मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगतिं असा कणव जन्मला.’ म्हणत त्यांनी त्या छळा पासून स्वतःला संरक्षित करून घेतलंच आहे. आता ही कल्पनाच  सोबत आहे. ही ‘कविता’ च तारक आहे. खरंतर फाशीची शिक्षाच व्हायची! त्यासाठी बरोबरीचे  देशभक्त ज्यांची सुटका व्हायची शक्यता आहे त्यांच्या बरोबर कवितेतून ‘पहिला हफ्ता’ पाठविला गेला आहे. “मानुनि घे साची | जननी गे| मानुनि घे साची | अल्प स्वल्प तरि| सेवा अपुल्या  अर्भक बालांची| ........ अशी तीस कोटी तव सेना | ती आम्हांविना थांबेना | परि करुनी दुष्ट दलदलना | रोविलची स्वकरी | स्वातंत्र्याचा हिमालयावरी झेंडा जरतारी |”   
दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावली आहे. दिवसभराच्या सक्त मजुरीनंतर दोन क्षण बरोबरच्या कैद्याशी संवाद होत आहे. तेवढ्यात संध्याकाळची घंटा झाली आहे. ही तीच परिचित घंटा जिने ‘हाही एक दिवस संपला’ अशी जाणीव करून दिलीय. मन आता बंदिवासातून निघून सूक्ष्म वाटेने स्वप्नांच्या रथाने पृथ्वी, जल, आकाश असे सर्वत्र फिरून येणार आहे. ही सायंकाळची घंटा कवितेतून अशी उतरत आहे.
दिवस संपल्याच्या जाणीवेनंतर आता केवळ एकच सांगाती उरली आहे ती म्हणजे निद्रा!  जी स्वप्नांतून प्रियजनांशी भेटी घडवून आणत आहे. ‘मी मनापासून उपकृत आहे त्यामुळे ‘ये निद्रे ये’ तुझ्या आगमनाची वार्ता माझ्या शिरांमधून जात आहे’.  
कल्पनाच फक्त जागृत आहे. कविताच सोबत आहे. कारागृहाच्या असह्य थंड भिंतींवर सुचातीये, शिक्षा म्हणून जी बेडी पायात घातलीये तिच्यावरही सुचातीये.
“फोडुनी तोडूनी जी जाळावी|
तीच कशी उजळावी |
आपण अपुलीची | रे बेडी?”
जी बेडी फोडून टाकावी वाटतीये तिला साफ स्वच्छ करत बसावं लागतंय. कारण नाही केली तर ती गंजून पायांना अधिकच त्रास देईल, वर निरीक्षकाकडून शिक्षा मिळेल ती वेगळीच. आमच्या इच्छास्वातंत्र्याच्या पायात ही बेडी आणि वर ती स्वच्छ करायचा जुलूम हा विरोधाभास कविमनात धुमसणार नाही तर अजून काय.... तशीच अवस्था ‘कोठडी’ कवितेतून मांडलेली...
खोल्यांची अदलाबदल झाली आहे. कारागृहाच्या काळकोठडीत लोखंडी साखळ्यांनी हात बांधले आहेत. ह्या नव्या कोठडीमध्ये खूप उंच वर एक छोटी खिडकी आहे. महिने, तिथी, वार काही माहित असण्याचं कारण नाहीये. आणि फारा दिवसांनी  खिडकीत एक चंद्रकोर दिसू लागली आहे. आणि तिला बघून लहानपणीची ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ ही कविता आठवत आहे, त्यानिमित्ताने मुक्त बालपणाच्या आठवणींनी मन काहुरलं आहे.
“लोहगजाची जी जाळी| कोठडीस मम तीखाली|
टाकुनि कांबळी मी अपुली| टाकीत अंगा तों दिसली
समोरची नाभिं मज देखा | चमकत चिमुकली शशिलेखा
‘शशिलेखा रे शशिलेखा !| माववू शकुनि न त्या हरिखा”
पुन्हा पुन्हा मी लुटीत सुखा| गाई चांदोबा भागलास का?
स्मृतिचित्रे ती विजेपरी| चमकत उठती परोपरी
चांदोबा चांदोबा, भागलास का|
लिंबूणीच्या झाडाखाली लपलास का?|”
ह्या साखळदंडाची ओझी वाहत कारागृहाच्या भिंतींवर ‘विजनवासी’ कडून ‘कमला’ कोरले गेलेय. ‘विरहोच्छ्वास’, ‘महासागर’ अशी अनेक खंडकाव्ये लिहिली गेली आहेत. कोणी बंदिवान येऊन तक्रार करेल, इथल्या भिंतींवरून ही काव्ये मिटली जातील. पण कोणी ‘कविता’ मिटवू शकणार नाही.
हे १९१३ साल आहे. सध्या कातड्याचे सोन्धणे गुंडाळून कोळसे भरायचं काम माझ्याकडे आहे. एक आनंदाची बातमी पोहोचालीये. कवी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ ला सर्वोकृष्ट काव्यासाठी जगातलं सर्वोच्च नोबेल प्राईझ मिळालं आहे. ह्या आनंदाच्या प्रसंगी कवितेतून त्यांचं अभिनंदन करणं स्फुरलं नाही तर प्रतिभा काय कामाची! भारतमातेनं तिच्या स्वातंत्र्यासाठी यज्ञ चालविला आहे. तिच्या पूजेसाठी अनेक फुलांची आवश्यकता आहे. रवींद्रनाथांच्या रूपातली ही कळी भारतमातेच्या केसांत विलसत आहे. त्याच यज्ञाच्या अग्नीत जळण्यासाठी एक कवी  इथे असताना एका भारतीयाने हा सन्मान मिळविला ही बातमी कृतार्थ करणारी आहे. अभिनंदनास पात्र आहे.
खरोखर रवींद्रनाथांच्या ताकदीचा हा कवी! नोबेल न मिळू दे पण सहाणेवर चंदनासारखा झिजला! प्राणांतिक वेदनेने त्याने अजरामर काव्य रचली. त्याच्या कवितेला चाल लावली म्हणून हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतील नोकरी गमवावी लागली. त्याची खूप महत्त्वाची काव्ये जिथे लिहिली त्या काव्यपंक्ती अंदमानमधून मणी शंकर अय्यरने काढून टाकल्या. पण उत्कटतेचं नातं आत्म्याशी असतं आणि ते तोडलं, फोडलं, जाळलं जाऊ शकत नाही, ते उरतंच.
हे इतके  कोमल, इतके उत्कट, हळवे कवी ! पण  अंदमानमधून सुटल्यावर मागच्या कोणत्याही क्लेशकारी अनुभवांचं प्रतिबिंब उमटवू न देता रत्नागिरीमधून समाजसुधारक सावरकर म्हणून काम करत असताना त्यांनी प्रखरतेनं विज्ञानवाद आणि बुद्धिवाद जपला. धर्माची चिकित्सा करताना आपलं हळवं कवित्व आड येऊ दिलं नाही. पण अंदमानचे दिवस ह्याच हळव्या कवित्वाने निभावले गेले असतील. प्रखर विज्ञानवाद आणि बुद्धिवाद आणि तितकंच टोकाचं हळवं उत्कट कवित्व असा अनोखा मिलाफ असणाऱ्या बुद्धिवादी कवीस आज जयंतीनिमित्त अंतःकरणपूर्वक अभिवादन!  विभावरी बिडवे    

Wednesday, May 1, 2019

राधेला तुम्ही मुक्त केलंत देवपणातून
कुंती आणि द्रौपदीला दिलात माणूस असण्याचा अभिमान
आणि विस्मृतीत गेलेल्या मैत्रेयीला उभं केलंत
तत्त्वज्ञांच्या रांगेत खांद्याला खांदा लावून
त्यांनी वाद घातला, जाब विचारला देवत्व लाभलेल्या
सख्याला
तेव्हा त्यानेही विचार केला असेल मानवी पातळीवर येऊन.
कधी टागोर आले कवितेबाहेर
आणि महात्मा गेले 'सत्याच्या प्रयोगाच्या' पुढे
देवत्व दिल्या गेल्या सर्वांचे पाय मातीचेच आहेत कळलं तुमच्यामुळे.
ह्यातून त्यांचं मोठेपण मर्त्य नाही झालं.
तर आपले चांगले वाईट गुण घेऊन सामान्य माणूस होऊ शकतो अमर हे दाखवलंत...
तुम्ही माणसांना देवत्वाचं दार उघडून दिलंत ..
#अरुणा_ढेरे_अभिष्टचिंतन
2 फेब्रुवारी
एक मौनाचं झाड उगवून आलं तुझ्यामाझ्यात
त्याला जर चुकून फुटलीच असती थोडीशी पालवी
तर होत राहिली असती जराजराशी सळसळ
आणि नसत्या पक्षांना गेलं असतं निमंत्रण
मग नसता गलका, नसती फडफड, नसते वाद
वर ठेवावी लागली असती पानगळीची मोजदाद
गावी लागली असती बहराची गाणी
आणि शोधावं लागलं असतं मुळांना पाणी
लगडले गेले असते नसत्या सुख दुःखांचे मोहर
भलता काळ, भलती वेळ, भलत्या देशात भलता बहर!
आणि मग झाड झालं असतं गजबजलेला संसार
नसत्या भावनांच्या घरट्यांना
उठवण्याच्या पार....

मौनाच्या झाडाला
जर चुकून फुटलीच असती थोडीशीही पालवी.....
न परतीच्या प्रवाशांना
थांबवू नये उंबरठ्यावर...
उंबरठ्यावर नेहमीच
क्लेश, वेदना...
त्यांना मोकळ्या मनानं जाऊ द्यावं सुखदुःखाच्या पार..
आणि मनावर दगड ठेवून
बंद करावं दार.
परसदारी लावावं त्याच्या कवितांचं एक झाड
जन्मांतरीच्या विस्मृतीनंतर
न जाणो
नवसंजीवनी घेऊन
कुठल्याशा प्रकाशमार्गाने
पुन्हा टपटपतील अज्ञेयाची फुलं
पुन्हा दरवळतील घरामधून..
पुन्हा वाहिली जातील कार्याय...
हे वर्तुळ अटल आहे ना?
भेटी ..
खूप अंतरानी होणाऱ्या
आणि झाल्यावर
भेट होणं आणि भेटणं
ह्यातलं अंतर लख्ख करणाऱ्या
अंतरातली अंतरं मोजून दाखवणाऱ्या..
कालव्यापी , देहव्यापी, मनव्यापी अंतर विस्कटून दाखवणाऱ्या ..
तरीसुद्धा होतात...
हा इत्तेफाक की विधीलिखित?
हे अंतर रँडम की कशाने बद्ध आणि नियमित?
ह्या वाटांवरून जाताना
मी बघितलंय तुला
मोकळं होण्यासाठी आडोसे शोधताना
वाटा मोठ्या होत गेल्या
आणि प्रवास लांबत गेले
तरी तुझ्या हक्काचे आडोसे
दुरापास्तच राहीले.
आणि कधी मिळालेच तर
त्याचंही बाळगावं लागलं
स्वतंत्र ओझं.
ओझं... अश्लाघ्य मजकुराचं....
मोकळेपणातून होणाऱ्या कचऱ्याचं...
पाप पुण्याच्या संकल्पनांचं..
आणि स्वतःच्या घुसमटीच्या अस्फुट हुंकाराचं
भय आणि लज्जा सोडून
तुला होता नाही आलं विमुक्त पुरुषांसारखं...
संस्कारांची सगळी जबाबदारी अखेरीस घेतलीस तू
आणि होत गेलीस भारवाही,
तनातून आणि मनातून...
त्या ओझ्यानं पुन्हा तू नाहीच झालीस मनमोकळी, स्वच्छ!
स्वच्छतागृह एक प्रश्नचिन्ह
पूर्वीही होतं आणि तोपर्यंत राहील
जोपर्यंत तू उतरवणार नाहीस बाईपणाचं ओझं.
मिळणार नाहीत हक्काचे आडोसे
जोपर्यंत तुलाच वाटणार नाही महत्त्वाचा
मोकळं व्हायचा तुझा प्राथमिक अधिकार...

('करम'च्या परवाच्या विषयाधारित काव्यसंमेलनासाठी लिहिलेली कविता. विषय - स्त्रियांचे स्वच्छतागृह एक समस्या)
तुझ्यासाठी जेवायला फक्त खिचडी करेन म्हटलं..
सोबत लिंबाचं लोणचं,
एखादा पापड, बस्स !
भाजण्यापेक्षा तळावा...
किंवा मसाला चुरा
जरासं ताक ..
कढीच करते ना ...!
किंवा सिंधी कढी
आणि डाळीचे गोळे,
बस्स इतकंच!
कमी पडायला नको!
पुऱ्या कराव्यात तिखटमिठाच्या
आणि गरम खीर - गोड म्हणून..
पुऱ्यांबरोबर काय?
कोशिंबीर चालेल पटकन्
एक भरली मिरची तळते,
आणि तूप कढवावं लागेल...
नारळ कोथिंबीर लिंबू खिचडीवर...
की मसालेभातच टाकते!
एकूण एकच.... !
बघ, असं खिचडीभोवती एकेक वाढत गेलं...
माझं तुझ्यात अडकणं भिनत गेलं!
तुझे ऊन आणि तुझ्या चांदण्याला
तोलून आहे तिन्ही सांज होता
कसे अर्घ्य देते किनारी तमाच्या
तुझे दुःख जेव्हा येते भराला

तुझे व्योम आणि तुझी सूर्यमाला
तुझ्या भोवताली तुझी वेधशाळा
भ्रमंती कधीची किती येरझाऱ्या
किती शक्यता तारकामंडलांच्या

तुझे शून्य आणि तुझा हा पसारा
अनिश्चीततेच्या किती धूळवाटा
तरी पावले माग घेती नव्याने
हृदयस्थ त्या सावळ्या आणि गहिऱ्या
हे प्राचीन सुंदर गाणं
मी लिहून गेलेय हजार वर्षांपूर्वीच
काळाची ही दरी पार करून
आता पोहचू शकत नाही मी तुझ्यापर्यंत
म्हणून पाठवते हे शब्दांचे दूत
माझं चिरंजीवी आत्मन् घेऊन तुझ्यासाठी

तू किती पूल बांधलेस,
इमारती की महाल...
मला कर्तव्य नाही
पण सुमधुर संगीत अजून आहे ना आजुबाजूला?
चमकदार डोळ्यांची फुलपाखरं,
आणि भल्या बुऱ्याच्या भोळ्या कल्पना आहेत ना अवतिभवती?
आणि परमात्म्याच्या प्रार्थना
अजून येताहेत ना हृदयामधून?

अजून जगात न आलेल्या,
मला न दिसणाऱ्या माझ्या मित्रा
ज्ञानेशाची अमोघ वाणी वाहणाऱ्या अनुचरा
मी एक कवयित्री होते,
मी तुला कधी बघू शकणार नाही,
ना तुझा हात हातात घेता येईल मला!
काळ आणि अंतरातून मी तुला माझं आत्मन् पाठवतेय...
ते तुला भेटेल, तुला निश्चित समजेल..

मुक्त अनुवाद – विभावरी बिडवे
To A Poet A Thousand Years Hence
by James Elroy Flecker (1884-1919)

I who am dead a thousand years,
And wrote this sweet archaic song,
Send you my words for messengers
The way I shall not pass along.
I care not if you bridge the seas,
Or ride secure the cruel sky,
Or build consummate palaces
Of metal or of masonry.
But have you wine and music still,
And statues and a bright-eyed love,
And foolish thoughts of good and ill,
And prayers to them who sit above?
How shall we conquer? Like a wind
That falls at eve our fancies blow,
And old Maeonides the blind
Said it three thousand years ago.
O friend unseen, unborn, unknown,
Student of our sweet English tongue,
Read out my words at night, alone:
I was a poet, I was young.
Since I can never see your face,
And never shake you by the hand,
I send my soul through time and space
To greet you. You will understand.
जांभळ्या नभाच्या खाली, जांभळी वाट धरताना
उत्कटता निरर्थ आणि
कवितेने मिटले नव्हते
हे रंग अंतरांमधले
सरणार कधीही नव्हते
मी हा समूह सोडून जात आहे.
माझं अमुक अमुक
तुमचं तमुक तमुक
का रे बाबा? थांब जरा
मिसळ करू, भेळ करू
कबड्डी खोखो खेळ करू
जा बाबा, टेक केअर
तुला तुझं प्रिय बर्गर
इथे नाहीतर तिथे भेटू
रमीचा तरी डाव थाटू
आडून पाडून इकडून तिकडून
काय झालं? पुढं गेलं?
काय होणार? कुठं जाणार?
भाजणार, शिजणार
आंबणार, फसफसणार
खेळणार, पडणार
चिडणार, रडणार
कुठे आम्हाला मिळणार खीर?
कधी होणार आम्ही बुद्ध?
कुठल्या बोधीवृक्षाखाली
सापडणार आहे शाश्वत सत्य?
चल तोवर पुन्हा भेटू
जमल्यास पुरणाची पोळी लाटू
थोडं तुझं, थोडं माझं!
सत्य होईल खमंग मस्त!
त्यावर तुपाची धार धरू
आत्म्याला गपगार करू
नाहीच जमल्यास हरकत नाही
ग्रुपमध्ये बुद्धत्व गवसत नाही
मिसळ करू, भेळ करू
कबड्डी खोखो खेळ करू
करमच्या अवयवदान खरे मानव्य कार्यक्रमातली माझी कविता.

सजीव म्हणून जन्माला आल्यानंतर
एकीकडे होती
प्रजननाने साध्य होणारी, सेक्सने संभाव्य होणारी
आपल्यामागे आपला अंश ठेवून जाण्याची
आदिम इच्छा.
आणि दुसरीकडे माणूस म्हणून विकसित होताना
निर्माण झाल्या काही गुंतागुंतीच्या संकल्पना!
संकल्पना नैतिकतेच्या,
समाज व्यवस्थेच्या,
विवाहाच्या,
संकल्पना संयमाच्या,
शुचीतेच्या आणि ब्रह्मचर्याच्याही !
एकीकडे विज्ञान करत आहे माणसाचं आयुष्य
अधिकाधिक विकसित
आणि दुसरीकडे जन्माचं प्रयोजन शोधत आहेत तत्त्वज्ञानी
नवनवीन शोधांनी एकीकडे माणूस झाला दीर्घायू
तर दुसरीकडे जन्माची सार्थकता म्हणजे मोक्ष
ही कल्पना झाली उच्चतम!
एकीकडे क्लोन,
टेस्ट ट्यूब, सरोगसीने
साध्य होत आहे जन्म
तर दुसरीकडे तरीही आहे मातृत्वाची आदिम ओढ
तशीच शिल्लक!
तसं तर कुठलंही अवयवदान म्हणजे
आपल्यामागे आपला
अंश ठेवून जाणं
पण परवा जेव्हा वाचलं
एका आईच्या गर्भाशयाचं तिच्या मुलीच्या उदरात
केलं प्रत्यारोपण
आणि त्यातून जन्माला आला एक जीव
तेव्हा वाटलं प्रकृति म्हणून
मुलीला जन्माला घातल्यावरच कदाचित वाटलं असेल
जन्माचं सार्थक झालं!
पण तिच्याच गर्भाशयातून जेव्हा तिच्या मुलीच्या मुलीनं घेतला जन्म
तेव्हा आदिमाता म्हणून तिच्या आदिम भावनेला पूर्णत्व आलं!
आज विज्ञानाने स्त्रीला मोक्षाचं द्वार उघडून दिलं!

"तुझी भरती माझं उधाण
तुझं मौन, मी भाषेच्या पार
मी समुद्र, वारा, रेती 
तू दशदिशा आणि काळ
विखुरलेले तुकडे; 
तरी एकच दिसते नाळ 
प्राशून घेतोस तू
की अस्तित्व  जातं विरघळून?  
तू दिवा होऊन तेवतोस
की मीच येते उजळून?  
मी दुभंगते आणि जुळतेही
कोण असतं आणखी, जे हे बघतंही!
तू जुळतोस आणि  दुभंगतोस
कुठली मिट्टी, कुठला गिलावा 
जो  पुन्हा पुन्हा सांधतोस! 
कुठून येतं भरलेपण
आणि कुठून येतं रिकामपण?  
तू-मी, मी-तू सगळं एकच वाटतं
एखादा क्षण 
- विभा"
 
 
तुझी भरती माझं उधाण
तुझं मौन, मी भाषेच्या पार
मी समुद्र, वारा, रेती
तू दशदिशा आणि काळ
विखुरलेले तुकडे;
तरी एकच दिसते नाळ
प्राशून घेतोस तू
की अस्तित्व जातं विरघळून?
तू दिवा होऊन तेवतोस
की मीच येते उजळून?
मी दुभंगते आणि जुळतेही
कोण असतं आणखी, जे हे बघतंही!
तू जुळतोस आणि दुभंगतोस
कुठली मिट्टी, कुठला गिलावा
जो पुन्हा पुन्हा सांधतोस!
कुठून येतं भरलेपण
आणि कुठून येतं रिकामपण?
तू-मी, मी-तू सगळं एकच वाटतं
एखादा क्षण
- विभा