Tuesday, August 21, 2018

तो वृक्ष प्रवाही होता
रानाशी कुजबुजणारा
पावसात सळसळ थोडी
वाऱ्याशी कुरकुरलेला

मोहरला पान फुलांनी
घनदाट सावली धरली
पक्षांनी गजबजताना
वृक्षाने किलबिल केली

उबदार कोवळी थंडी
पानांनी ओंजळ भरली
वाहिली कृतज्ञतेने
अर्घ्यासम नदीस काही

चटक्यात उन्हाचा झाला
चमचमला चांदणरात्री
तो वादळवाऱ्यामध्ये
उन्मळून पडला नाही

तो झाला भवतालाचा
पण मनात जपून होते
त्याच्या मातीशी त्याचे
जन्माचे आदिम नाते
हे कुठले पूल तुटले,
तरी एक रेशमी लड उलगडताना दिसते कधी उत्तररात्री
उशापासचा एक चांदणी धागा सरसर सरसर ओढून घेऊन
हे दोन सुयांवर
कोण काही गुंफतं आपल्यामध्ये
न दिसणारं, न उसवणारं,
पहाटेपर्यंत कुठला उबदार कोश
तुझ्या माझ्या अस्तित्वावर
मला जाणवतो आणि तुलाही जाणवतो
हेही मला कळतं ...
ही माघातली थंडी, हे कोवळे न विझलेले निखारे
आणि अंगावर तुझ्या अस्तित्वाची न विरणारी शाल.
ही केवळ एक कविता असेल तर असुदेत
हा एखादा भ्रम असेल तर असुदेत
आता लख्ख उजाडल्यावर दिसेल
ते तरी कुठे सगळंच सत्य असेल!
- विभा