Monday, February 6, 2017

तुझ्या नजरेतली संख्या किती साधी किती सोपी
तरी का मीच शून्यांची रियाजी मांडते आहे
कधी संथ चालून पायी निघाले
प्रपातापरि सोडला उंच माथा
कुठे पंख आवेग घेऊन आले
नि झेपावले तेवता दीप बघता

कुठे अष्टमी चांदणे सांडताना
पहाटेस प्राजक्त गंधाळताना
कधी सांजवेळी क्षितीजाकिनारी
विसरले प्रहरही तुला शोधताना

महामार्ग काही कुठे आडवळणे
नि काट्याकुट्यातील पाऊलवाटा
कधी चढ उतरणी सरळमार्ग थोडे
कधी राजरस्ते कधी चोरवाटा

अशी येत गेले कधीही कुठेही
जशी वादळे धूळ वाऱ्यास वाही
किती धावले पण अखेरी थबकले
तुझ्या चौकटी लांघता येत नाही


कुंद कुंद हर प्रहर
पुन्हा ते जुने जहर
लांबलेल्या सावल्या
पुन्हा पुन्हा सुने शहर
पायाला मउसूत स्पर्श करणारी एखादी लालसर मळवाट,
त्यावरचं सावली देणारं झाड ओलांडून आपण पुढे जातो,
नवीन वाटा शोधत, नवे बहर शोधत.
आणि असल्या नसल्याच्या
हरवल्या गवसल्याच्या
आणि थकल्या थांबल्याच्या तिठ्यावरून
आपल्याला वाटतं ती वाट - ते झाड तसंच असावं
सावली धरणारं, त्याच्या बुंध्यापाशी आपल्यासाठी जागा राखून ठेवणारं.
आपण मागे वळून बघतो,
आणि ते – ते तसंच उभं असतंही...
वर्षानुवर्षे!
कारण झाड हे झाड असतं.
माणसं मात्र माणसं असतात...
आपल्यासारखीच!
घट्ट मुळे रोवून उभ्या असलेल्या एका झाडापासून
कल्पांतापर्यंत बांधलेली एक दोरी,
अगदी स्वप्नांच्या प्रदेशापर्यंत.
असा ताण की अजून थोडी आवळली
तर तुटून जाईल
आणि सैल सोडली तर
निसटून जाईल पकड.
दोन्ही आवश्यक -
जिवंर रहाण्यासाठी.
कल्पनेकडे निघताना
विसरून जायचं दोरीचं
वास्तवाशी मूळ,
पुन्हा परतताना करायची
स्वप्नरंजनाकडे पाठ.
चुकूनही ढळू द्यायचा नाही तोल
की झुकू द्यायचं नाही पारडं
कोणत्याच एका बाजूला.
रेंगाळायचही नाही कुठेच
कारण गती असेल तरच
साधला जाईल मेळ.
खरंतर डोंबार्याचं आयुष्य किती अवघड...
तो ताण, तो काच,
तो सांभाळावा लागणारा तोल
आणि पायांना होणारा जाच
तरी डोंबार्याचं आयुष्य किती सुंदर
त्या येरझार्या, तो अधांतर
ती गती, ती फिरती
आणि कुणाला न दिसणारी स्वतःची अशी मिती ..
हे कुणी सोडले होते
इच्छांचे दीप प्रवाही
गंगेच्या काठांवरती
निःश्वास कुणाचे राही

दुर्दम्य कुणाची स्वप्ने
बांधली कशी धाग्यात
घुटमळे जीव झाडाशी
मन दोलक वर रंगीत

ही रात्र तरंगे अवघी
दिवसाच्या काठावरती
अन मनीषांची नक्षत्रे
मनमळभावर बघ फुलती
अवघ्या तनामनाची एकतारी
सूरात लावून आले
तरी छेडली नाहीस तार
की उमटला नाही झंकार...

अवघ्या तनमनाचं वादळ घेऊन
बरस बरस बरसले
तरी कोरडेपण निभावलंस
आतून बाहेरून...

अवघ्या मनाचा देह करून
अशी समोर उभी राहीले
नि साधा हातही घेतला नाहीस हातात ..

अस्पर्श मी की अस्पर्श तू... 

अस्पर्श मीही, अस्पर्श तूही ... 
तो सहजी जपून आहे
मौनाला दोघांमधल्या
तितक्या सहजच लिहिते
ती मौनावरल्या गझला


सुखेनैव तो रणांगणावर
अपुल्या आयुष्याची वणवण

सुरक्षीतशा भिंतींमागे
लिहीली जाते अवघी तणतण

डोक्याला तो झाला कायम
दिसली नाही कधीच कणकण

---------------------------------------------------
---------------------------------------------------

जखम वाहिली इतकी भळभळ
केली गेली केवळ हळहळ

विस्फोटाच्या कवितेवरती
आधि वाहवा नंतर कळकळ

फांदीवरुनी गेले पिल्लू
पानांची थांबेना सळसळ