Saturday, February 28, 2015

आस


असा झिम्माड येईन
अंग अंग घुसळत
दणाणत्या आवाजात
छत करेल स्वागत.
असा बेभान येईन
चकवित बरसत
छत्र्यां अडोशांना सुद्धा
चुकवित भिजवित.
ढेकूळल्या मातीमध्ये
विरघळेन मी जेंव्हा
बीज तरारून बघ
नभा भेटेल ग तेंव्हा.
पाट खळाळून आता
वाहतील जागोजागी.
कसणाऱ्याच्या नशिबी
यंदा असेल ग सुगी.
अंगणात कोसळेन
होऊनिया मुक्त धारा 
कोणी सांडला वाटेल
जणु  मोत्यांचाच चुरा.
थोडे राखून ठेवेन
थेंब खिडकीशी काही.
आणि वाचून जाईन
तुझी  कवितांची वही.
बघ घेईल हि धरा
आता मृदगंधी श्वास. 
पागोळ्या नि दिठीतून
ठेव जपून तू आस.

No comments:

Post a Comment