Friday, October 14, 2016

जुलैमधल्या एखाद्या काळोखलेल्या पावसाळ्यात
धीरगंभीर पावलांनी, सर्वांना चुकवत
रात्र होऊन संथपणे ये.
पूर्वेच्या वार्याच्या हाकेला साद न देता
सकाळ डोळे मिटून निजेल.
आणि नेहमीचं सावध निळं आकाश
अंगावर जाडसर मेघांची
दुलई पांघरून असेल.
रानजाई आपलं सळसळ गाणं
निःशब्द ठेवेल,
आणि सगळे दरवाजे
अजूनतरी मिटलेले असतील...
अशा निर्जन रस्त्यावर
तू एकमेव प्रवासी असशील.
मित्रा जिवलगा लक्षात ठेवशील ना
माझ्या घराचे दरवाजे उघडे आहेत कायम,
ओझरत्या स्वप्नासारखा निघून नको जाऊस...

अनुवाद : विभावरी बिडवे
मूळ कविता : गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर

आजि श्रावण घन

IN THE DEEP shadows of the rainy July,
with secret steps, thou walkest,
silent as night, eluding all watchers.

To-day the morning has closed its eyes,
heedless of the insistent calls of the loud east wind,
and a thick veil has been drawn o
ver the ever- wakeful blue sky.

The woodlands have hushed their songs,
and doors are all shut at every house.
Thou art the solitary wayfarer in this deserted street.
Oh my only friend, my best beloved,
the gates are open in my house-
do not pass by like a dream.
जोक्स कोणावर करावेत?
कोणावरच करू नयेत

नवरा बायकोच्या भांडणांवर
सरदारजींच्या खुळचटपणावर
खर्या खर्या वेड्यांवर
समजणार्या शहाण्यांवर

काळ्या पांढर्यावर
लाल निळ्यावर
हिरव्या भगव्यावर
किंवा चित्रविचित्र रंगसंगतीवर

अलोकनाथच्या बापपणावर
निरूपमा रॉयच्या आईपणावर
आलिया भटच्या क्रॅकपणावर
अलका कुबलच्या मुसमुसून रडण्यावर

डॉक्टरांच्या कट वर
वकीलांच्या खोटारडेपणावर ;)
पिएचडी धारकांच्या वयावर
आणि गुरुजींच्या शाळा सोडून जाण्यावर :D

आपवर
आयवर
घड्याळातल्या काट्यांवर
कमळाच्या तळ्यातल्या लाटांवर

अमुक अमुकच्या इंग्रजीवर
तर तमुक तमुकच्या हिंदीवर
अमुक अमुकच्या बोलण्यावर
तमुक तमुकच्या गप्प बसण्यावर

जोक्स कुणावरच करू नयेत
हत्तीवर करू नयेत
त्याहून अधिक मुंगीवर तर आजिबातच करू नयेत.

कारण
जोक्स राहीले नाहीत
ताणलेल्या भुवयांना सैलावण्याचा उपाय
जोक्स राहीले नाहीत कपाळाच्या आठ्यांना इस्त्री करण्याचा मार्ग
आणि हास्यरेषांची आशा एकमेव ..... !

जोक्स देत नाहीत आजकाल निखळ आनंद फार!
जोक्स आजकाल करतात केवळ अस्मितेला धार टोकदार!
एका काळ्याभोर काठावर

पाय सोडून बसले होते

नि थोडं चांदणं आलं होतं हाताशी,

पहाटे वाहून गेलं बहुतेक कुठेतरी,

स्पर्श झालेल्या हातावर

आता फक्त काही ओलेत्या खुणा...

छे .. मी नदीत विरघळून जायला हवं होतं...

मी रात्रच व्हायला हवं होतं...
काजळरात्री कुणी उधळली चांदणरत्ने पटलावरती
की चंद्राचे तुकडे निसटुन जणू विखरले अवतीभवती

असा उमाळा दाटुन येतो विभक्त होता जीव लागुनी
तुकडे तुकडे विरहचांदणे पसरुन राही अथांग गगनी

ह्या तार्यांचा वियोग लेवून रात्र तरीही लुकलुकते
दुःख चिरंतन तुटण्याचे का डोळ्यांमधुनी पाझरते!

आषाढाच्या वर्षावातूनी विरहगीत बरसत येते
अन धरतीवर पानोपानी अंधारातून सळसळते

धरतीवरती घराघरातुन असे नभीचे दुःख विहरते
प्रेम भोग अन् इच्छांमधुनि मनामनातुन मुरते रूजते

कवीमनातून पाझरल्यावर सृजनचांदणे फुलून येते
हृदयामधूनी हळवे काही शब्दांसोबत वाहत येते

11.8.16
अनुवाद - विभावरी बिडवे

IT IS THE pang of separation
that spreads throughout the world
and gives birth to shapes
innumerable in the infinite sky.
It is this sorrow of separation
that gazes in silence
all night from star to star
and becomes lyric among
rustling leaves in rainy darkness of July.
It is this overspreading pain
that deepens into loves and desires,
into sufferings and joys
in human homes;
and this it is that
ever melts and flows
in songs through my poet's heart.

- Rabindranath Tagore
माहितीये ... !!

हा एक पुनर्जन्म होता,

माझ्यापासून निघालेला .. तुटलेला

माझाच एक हिस्सा

न जाणे किती जन्म पार करून

किती किती फेरे युगाब्धांना घालून

माझ्यातच वणवण फिरत होता

बहुतेक तुझ्या बहुपाशातच

त्याला चिरशांती मिळणार होती ...

बहुतेक तुझ्या खांद्यावर डोकं ठेवूनच

त्याला सद्गती लाभणार होती...
उन्हाचे उसासे
वळीवाची आस
तुझेच आभास
आसपास

कलंडली सांज
हो संधिप्रकाश
वाट ही उदास
दूरवर

रात्र ही विदीर्ण
ओल्या पापण्यास
स्वप्न सहवास
अखंडित

पहाट निमग्न
दव आसपास
कळ्यांचे निश्वास
धुक्यातले

प्रखर सकाळ
प्राजक्ताची रास
विरलेली आस
निरंतर
कधी सांजवेळी दिवे लागणीला
उदासी अशी खोल दाटून ये
क्षितीजावरी रंग मिसळून गहिरा
तुझी याद हलकेच परतून ये!

नभाच्या दिशा कोण लांघून येई
युगांच्या किनारी किती थांबले
खुली मुक्त दारे किती ठेवली पण
तरी चौकटीशी पुन्हा बांधले

रिकाम्याच हाती ओंजळ रिकामी
न आत्मीय काही दिले घेतले
तरी वेदना रंग देऊन गेली
न समृद्ध काही जरी तू दिले

न आदी नि अंतास ना पोचते जी
तयाचे प्रयोजन कसे आकळे
उदासीस ह्या कोणते नाव द्यावे
किती ठाव घ्यावा मला ना कळे

तमाच्या तळाशी हळुवार जेव्हा
फुले आसवांची तुला वाहते
अकस्मात बहरून ये चांदणे जे
तुला ठाव नाही मला गवसते

न अनुबंध कुठले न नाते तरीही
कुठले दुवे साथ माझ्या तुझ्या?
जशी सांजसंध्या दिवस रात्र सांधे
गहीरी उदासी मधे आपल्या!