Monday, April 27, 2015

संथ वाहतो प्रवाह आता
आणिक सखोल असते काही
असे कुठे का असते तरिही
भवरे नाही तरंग नाही.
अजून नाही पाय मोकळे
अजून गुंता उकलत नाही
परंतु आता अडखळताना
ठेच जिव्हारी लागत नाही.
दहा दिशांचा किती पसारा
खुणवत नाही भुलवत नाही
जरा काहीसे नजीक जाता
निरर्थकाचे वारे वाही.
भेट तुझी पण अजून स्मरते
तरिही तितकी तगमग नाही
भेटीवाचून जन्म आपला
चुकला नाही अडला नाही.
कुठे जायचे काय न्यायचे
आदिम प्रश्नांचे वेटोळे
प्रवास केवळ शाश्वत इतके
सत्य याहुनी दुसरे नाही.

Monday, April 20, 2015

बियास नदीच्या काठावरून .....


हा संथ चढणीचा रस्ता,
लांबवरून वळणं घेणारा घाट
आपला डौलदारपणा सोडत सोडत
उंच उंच सडपातळ होत जाणाऱ्या
देवदार वृक्षांची जंगलं.
फिकं फिकं ऊन
भिनत जाणारी थंडी
निळसर दिसणाऱ्या हिमालयाच्या रांगा
खुणावणारी चकचकीत हिमशिखरे
चेरी ब्लॉसमची आठवण करून देणाऱ्या
पांढर्या गुलाबी रंगाच्या फुलांची
दुतर्फा बहरलेली सफरचंदाची झाडं
हलक्याश्या वार्यानेही भुरभुरणाऱ्या
त्यांच्या मुलायम पाकळ्या ...
आणि अगदी शेवटपर्यंत
रस्त्याच्या कडेकडेने सोबत करणारी
खळखळणारी बियास नदी.
ही नक्की तुझी आठवण आहे कि आणखी काही ?
रस्त्याच्या कडेकडेने जाणारी.....
अखंड सोबत करणारी ....
कि तीच तेवढी वाहणारी
आणि हा रस्ताच शेवटपर्यंत -
तिच्या काठाकाठावरून जाणारा !!!

Saturday, April 18, 2015



ते म्हणतील भिंगरी...
म्हणूदेत!
घेत राहा गिरक्या
तालात आणि नादात
तेही फिरतातच आहेत ना,
कशा न कशाभोवती!
एकदा लयीतला आत्मरंग
गवसला कि  
गरज नाही भासत कोणत्याच रंगांभोवती फिरण्याची!
हे स्वयंभूपण, हे आत्मप्रेम
गवसत नाही भल्याभल्यांना
कस्तुरीमृगासारखं !
.................................................
ते कदाचित म्हणतील
पाण्यावरच्या अवखळ लाटा,  
खळखळाट करणाऱ्या...
तेंव्हा ते फक्त बघत असतील पाण्याचा पृष्ठभाग
पण प्रत्येकाच्या आतमध्ये एक खोल गहिरा समुद्र असतो  
कोणत्याच लाटांच्या खळखळाटाशिवाय,  धीरगंभीर आणि अचल  
आत्ममग्न, आत्मप्रेमी
सगळं काही सामावून घेणारा.....
असा समुद्र जिथे प्रकाशही नाही पोहोचत....  
ऑक्सिजनच्या सहाय्याने फिरणाऱ्या पाणबुड्या
समुद्रातली फार फार तर रंगीबेरंगी दुनिया बघतात.
पण समुद्राचा तळ मात्र  देवमासेच तेव्हढे गाठू शकतात.  

विभावरी