मी टेकडीच्या उंच टोकावर निश्चल बसून आभाळाच्या कवेत गेले, तेव्हा तुझ्यापर्यंत पोहोचले
आणि हजारो मैल पायपीट करतही अखेरीस तूच सापडलास...
उपवास, कठीण व्रताचे यज्ञयाग,
एकवीस प्रदक्षिणा, सुग्रास महानैवेद्य
जो नंतर मुलांना खाऊ घातला
आणि काहीच नव्हते हातात तेव्हा चार अक्षता फुलं, पानं समजून वाहिली तरी तू भेटलास..
मी माझ्या कामात समरसून जाताना तुझी आठवण राहिली नाही.... तेव्हा तेच तू होतास बहुधा...
आणि रात्रंदिवस तुझी आठवण काढत तुझ्या नावाचा जप केला
तेव्हा साऱ्याचा विसर पडला...
तेव्हाही तूच भेटलास...
मी आत्मसमर्पित होत अभंग गायिले
आणि आत्मभान ठेवून तर्कनिष्ठेने प्राणपणाने झुंजले तरी तुझ्यापर्यंतच आले...
तुझ्या हातातली आर्त स्वराची बासरी आणि त्याच हातातलं सुदर्शन चक्र - सगळं तुझंच
तुझ्यामुळे जोगीण झालेली मीरा - हेही तूच
आणि जोगी व्हायचा राहिलेला अर्जुन... तेही तूच
तुझ्याबद्दल वाटलेलं उत्कट प्रेम ...
आणि उत्कटतेने जगलेल्या प्रत्येक क्षणाचा अर्क...
म्हणजे कालिंदीने तुझा प्राशुन घेतलेला काळा रंग
ह्या अर्कात तू आहेस...
अखेरीस सगळे रस्ते पुन्हा पुन्हा तुझ्यापर्यंतच घेऊन येतात...