Tuesday, June 28, 2016

गवसून न हाती येई
असे निसटते काही
अळवाच्या पानावरती
थेंब जळाचा राही

उंबर्यात भास चाहुली
कवितेच्या कातरवेळी
तुकड्यात गाइल्या गेल्या
भंगूर सुखाच्या ओळी
जाणार्याला थांब म्हणावे का
अजून काही सांग म्हणावे का

जरि आहे स्वच्छ नितळसे सारे
लागत नाही थांग म्हणावे का

न परतिच्या वाटा विभिन्न झाल्या
पण भेटू वरपांग म्हणावे का

मनाचे तुटलेच आहे नाते
पण शरिराला नांद म्हणावे का

सुकल्या झाडाशी आला पक्षी
झाली आहे सांज म्हणावे का

उत्कटतेला वर करूण झालर
कवितेला मग भांग म्हणावे का
तू नसण्याचं दुःख ...

कातळावर कोरलं
रेतीवर रेखाटलं
आभाळभर माखलं
हातावर गोंदलं

तू नसण्याचं दुःख ....

भाजीबरोबर चिरलं
पोळीमधे करपलं
तेलातुपात माखलं
लोणच्यामधे मुरवलं

तू नसण्याचं दुःख ...

डोळ्यांनी पुसलं
कंठाने गिळलं
ओठांनी लपवलं
मनामधे रूजवलं

तू नसण्याचं दुःख ...

अक्षरातून गिरवलं
शब्दातून सांडलं
ओळींतून पाझरलं
कवितांतून रिचवलं

तू नसण्याचं दुःख ...