Sunday, October 11, 2015

दार उन्हाचे मिटता मिटता
क्षितिजावरती सांज खुलावी
रक्तलालिमा लेवून काया
भेटीसाठी अधीर व्हावी.

दिवसाच्या दाहक प्रहराची
मला न कुठली भ्रांत भिती
माझ्याजवळी श्रांत होतसे
रविकिरणांची तप्त मिती

दिवसरात्रीच्या काठी येते
हाती काही पुसट निसटते
सार्थक करूनि ह्या फेर्यांचे
निघता निघता स्पर्शत जाते

अशी रोजची भेट खरी की
हे विरहाचे आभास खरे .
दिवस रात्रीस अशी तोलते
सवाल घेउन युगायुगांचे.

तरि संध्येला त्याच्याभवती
प्रदक्षिणा ही ओवाळावी.
आणिक त्याच्या लाख स्मृतींची
नक्षत्रांकीत रात फुलावी.
ह्या अशांत संध्याकाळी
का हरवत जाते काही
ना जुने सोयरे होते
अन नवीन गवसत नाही.

दिवसाची तुटते नाळ
रात्रीस न धागा जुळतो
ह्या अगम्य अधांतरावर
जिव काहुरतो व्याकुळतो.

ज्या वाटांवरून येतो
अन दिशा आखतो भवती
उरती क्षितिजाचे भास
ह्या अथांग गर्तेपुढती.

मिटलेल्या फूलकळ्यांचे
पसरती दीर्घ उच्छ्वास
अंधार वेढूनि घेतो
उरलेसुरले अवकाश.

तुटलेल्या संध्याकाळी
क्षणभरात दृश्य बदलते
मी पुन्हा रोवते ‘असणे’
अन क्षणात बहरून येते.

हातात दीप घेताना
मन शुभंकरोती गाते
तुळशीच्या सांजदिव्याने
गाभारा उजळत जाते.
मेघ दाटून येतात आणि अंधार होऊन जातो सारा.
सळसळ सळसळ करू लागते माझ्यामधली माझी छाया.
मुक्त विजेचे क्षितिजावरती तांडव चाले लखलखीतसे.
घुमडघुमड हे नभ सामोरे निमंत्रकाचे दूत जसे.

कोण पुकारे? भान हरपूनि, सरसर सरसर धावत जाते.
वर्षावाच्या धुंद सरींना अंगाखांद्यावरी झेलते.
पाण्याच्या थारोळ्या मधुनी थबडक थबडक कशी नाचते.
पाऊस म्हणजे जीवन सारे अशी हरवते अशी बहरते.

हात चिमुकले भिजले थिजले अन स्वप्नाची कोरी नाव.
अशी सोडते पाण्यामध्ये; जणु स्वप्नांना मिळतो गाव!
क्षणात पाणी अन चिखलाचा असा उडविते राळ कुणी.
विरून जाती लाटा स्वप्ने वर स्मरणांचा भार उरी.

तरी सदोदित जाण मनी तू स्वप्नच असते खरे निरंतर.
संपून जाते अनवट धुंदी स्वप्नाच्या पूर्तिनंतर.
किती डगमगो, वाहो, थांबो नकोस विसरू नाव सोडणे .
आणिक विसरायाचे नाही जलधारांनी चिंब नहाणे.
दूरवरून कुठूनशी
सोनसळी केशरी ओढणी घेऊन
केसांच्या मुलायम बटा सांभाळत
मनामध्ये अशी
उतरत उतरत आलीस,
थोडं थांबलीस,
हसलीस जीवघेणी
आणि पुन्हा निघालीस सोडून
जणु मोरपीशी स्पर्श करून
एक कविता भेटून गेली.....
सावळ्या रंगाची एक सांज
मन कातर कातर करून गेली....
चल लोणचं घालुयात

तुझ्या थंडपणाचं

आणि माझ्या हायपरनेसचं,

मग मुरवत ठेवूयात एकमेकांत

वीस-पंचवीस-तीस वर्ष?

वापरता येत नसलेल्या गोष्टी

बाजूलाच काढून ठेवायच्या झाल्या

तर उत्तरार्धातलं बेचव आयुष्य तरी किमान

थोडंफार चविष्ट करूयात.

काही अपरिहार्य गोष्टींना

एखादा पर्याय देऊन बघुयात.
रोज एक नवी कविता
रूजवावीशी वाटते तुझ्यासाठी!
आणि वाटतं बहरून यावं
छानसं काहीतरी तुझ्यामाझ्यात.
सुगंध! जो व्यापून राहील आयुष्य अन्
सार्थक होईल माझ्या असण्याचं.
पण सुगंधाच्याही किती छटा
अन् किती व्याप्ती.
केवड्याच्या मदोन्मत्त झाडाभोवती
सळसळून येतात नाग
आणि विळखा बसतो भयावह,
काळाकभिन्न!
सगळेच सोहळे नसतात
पहाटेच्या प्राजक्तासारखे
मंगल, प्रसन्न वगैरे वगैरे...
दूरवरून कुठून
सूर लहरत आले.
तुझ्या पाव्याने माधवा
शब्द निळेशार झाले.

तुझा काटेरी मुगुट
तुझा भरजरी शेला.
कशी लांघली अंतरे
एका धुनेने केशवा.

अशा समुद्रकिनारी
अशी आर्त हाक कृष्णा.
सागराचा का तुकडा
यमुनेने हिरावला?

तुझे पूर्णत्व अपूर्ण
तुज ज्ञात जे अनंता.
तुझ्या अथांगतेसाठी
माझ्या दुःखाचा किनारा.

तुझा सावळासा रंग
साज मोरपीशी त्याला
तुझा शेला जर्दरंगी
पूरी रंगले श्रीरंगा.

कधी काजळ रेखिता
थरथरतो हा हात
तुझी प्रतिमा मोहना
सामावली ह्या डोळ्यात.

तुझा रास मनोहारी
तुझा मोह लडिवाळ.
तुझे नसणे निर्गुणा
चीरवेदना सगुण.

माझे चिरंतन दुःख
तुझे नसणे अटळ
तुझ्या मुरलीने कान्हा
झाला विरह वेल्हाळ.

निळाईला स्पर्श करता येत नाही.
ऊंचाईला मापता येत नाही.
आपण त्याचा भाग होऊ शकत नाही.
आणि झालीच कृपावृष्टी तरी;
आपल्या वाटेला कितिसं आणि कुठपर्यंत येतं आभाळ?
अथांगतेचा थांग शोधत जाताना
पंख थकणार, तुटणार, हुळहुळणार...
आपलं सामान्यत्व इतकं तर छळणारच!
अशा वेळेस पंखांवर न मावणारा आभाळाचा एक तुकडा घेऊन
आपलं (सामान्य) गाणं चोचीत घेऊन बसायचं
ह्याव्यतिरिक्त काय करू शकणार ..
तूच सांग...

Two Roads

पिवळ्याशा रानात दुभंगून विलगे झुडुपांमधुनी वाट.
हरवे पहिली वळणावरती पांथ उभा मी भेदक निरखत .

वेधक दोन्ही जरी भासल्या आणि ओढीले दोघींनीही
खेद असे कि दोन्हीवरती पथ आक्रमणे शक्यच नाही.

गवताच्या लाटांत बुडाली दुसरीही तितकीच मनोहर
आणि कदाचित तिचे आमंत्रण जरा वाजवी जास्तच सुंदर.

सारखाच सुकल्या पानांचा जरी गालीचा दोन्हींवरती
जी नव्हती रुळली मळलेली चोखाळून मी गेलो पुढती.

जरी राखिला मागे आहे चाचपण्याला उरला रस्ता
वाटांवर अवलंबुन वाटा कसे फिरावे पुढती जाता!

युगांपासून कुठेतरी हे उसासून सांगावे म्हटले.
माझ्या निवडीतूनच केवळ हे दिसते आहे ते घडले.

निष्पत्ती ही झाली कारण दोन भिन्नशा वाटा दिसता
वर्दळ नव्हती ज्या रस्त्यावर गेलो वगळून मळला रस्ता.


मूळ कविता : Robert Frost
अनुवाद : विभावरी बिडवे
मूळ कविता

The Road Not Taken

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;

Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same,

And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back.

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I—
I took the one less traveled by,
And that has made all the difference.

- Robert Frost

हा अनुवाद आहे Robert Frost च्या प्रसिद्ध The Road Not Taken ह्या कवितेचा.  वाचताना आणि अनुवाद करतानाही दोन तीन ठिकाणी अडखळायला झालं.
कवितेत कवीला दिसते ती एक पायवाट आहे आणि दुसरी गवत झुडुपे ह्यांनी झाकली गेलेली कोणी न वापरलेली वाट आहे. मात्र पुढच्या कडव्यात कवीला त्या वाटा सारख्याच दिसतात पानांनी झाकलेल्या. कदाचित दुसऱ्या वाटेवरही झाडं, सावली त्यामुळे पडणारी पानं (resources) सारखेच आहेत असं म्हणायचं असावं.
पुढे येणारा मूळ कवितेतला sigh हा शब्द जो आनंदासाठी आणि दुःखासाठीही वापरला जातो. शेवटच्या कडव्यातील “And that has made all the difference” ह्याही ओळीत तो difference सकारात्मक आहे कि नकारात्मक हे कळत नाहीये. ह्या दोन्ही ठिकाणी मी गोंधळले तेंव्हा मला दोन्ही अर्थाने ती तशी वाटावी हेच त्यातलं काव्य वाटलं. त्यामुळे अनुवादात ते तसंच ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.